1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

गुजरात पाणी संकट : इथं पाण्याचे टँकर ठरवतात लग्नाचा मुहूर्त

सामान्यपणे ज्योतिषी लग्नाची तारीख ठरवतात. पण, गुजरातच्या भारत-पाक सीमेपासून 40 किमी अंतरावरील भाखरी गावात सध्या वेगळं चित्रं पाहायला मिळत आहे. इथं पाण्याच्या टँकरच्या उपलब्धतेनुसार लग्नाची तारीख ठरवली जात आहेत.
 
सध्या गुजरातला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भाखरीमधील एकमेव तलाव कोरडा पडला आहे. इथं माणसं आणि जनावरांना पिण्याचं पाणी मिळणं जिकिरीचं झालं आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आता या गावात पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. गावापासून 25 किलोमीटरच्या अंतरापासून पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत, असं गावातल्या पिराबाई जोशी सांगतात.
 
"प्रत्येक टँकरसाठी आम्हाला 2000 रुपये मोजावे लागतात. महिन्याला आम्हाला जवळपास 2 ते 4 टँकर लागतात, त्यासाठी 8,000 रुपयांचा खर्च येतो. या गावातील लग्नासाठी पाण्याचे टँकर ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. जर ते आम्हाला इथं मिळाले नाही, तर त्यासाठी 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल," त्या पुढे सांगतात.
 
आधी टँकर, मग लग्नाचा मुहूर्त
बीबीसी गुजराती टीम या गावात पोहोचली तेव्हा अमराजी यांच्या कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. त्यांनी पिण्याचं आणि स्वयंपाकासाठीचं पाणी बाहेरून मागवलं होतं. अधिक तपशिलात बोलण्यासाठी त्यांनी नकार दिला.
 
या गावातील भिखा भाईंनी सांगितलं की, "पिण्यासाठीच नव्हे तर स्वयंपाकासाठीही आम्हाला स्वच्छ पाणी लागतं. मोठा समारंभ असेल तर आम्ही 10 टँकर मागवतो, छोट्या समारंभासाठी 5 टँकर मागवतो."
 
या गावातील अल्केश जोशी केटरिंगचा व्यवसाय करतात. ते सांगतात, "तुम्ही पाण्याशिवाय लग्नाची तयारी कशी करू शकता? पाणी ही इथली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे." भाखरीचे माजी सरपंच पुंजीराम जोशी सांगतात, "हिवाळ्यात आमच्याकडे पाणी असतं, पण उन्हाळ्यात नाही. यामुळे अनेक शेतकरी पेरणी करू शकत नाही."
 
दुष्काळ जीवनाचा भाग
गेल्या काही वर्षांपासून हा दुष्काळ अनुभवत आहे. हा दुष्काळ इथल्या संस्कृतीमध्येही दिसतो.
 
"इथल्या लोकांना पाण्याच्या कमतरतेची इतकी सवय झाली आहे की, पाण्याचे टँकर स्वस्त मिळतील म्हणून लग्नाचा हंगाम संपल्यानंतर तारीख ठरवतात," असं या गावातल्या लोकांनी सांगितलं.
 
या लोकांनी गावापासून काही अंतरावर गाईंसाठी निवारा तयार केला आहे, जेणेकरून त्यांना दुष्काळापासून वाचवता येईल.
'जनावरं जे पितात, तेच पाणी आम्ही पितो'
भाखरी गावातील महिला पाण्याच्या शोधासाठी 45 डिग्री तापमानात बाहेर पडताना दिसतात.
 
"आज पिण्याचं पाणी येणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली, तेव्हा हातातला स्वयंपाक सोडून आम्ही इथं पोहोचलो. आम्हाला दोन-तीन दिवसांनी मिळून फक्त 15 मिनिटं पाणी मिळतं," असं भाखरीच्या दिवाळीबेन यांनी सांगितलं.
 
तर पाणी भरण्यासाठी आलेल्या लक्ष्मी म्हणतात, "इथल्या जवळपास प्रत्येक घरात पाण्याचे नळ आहेत, पण त्यात पाणी नाही. जनावरं जे पाणी पितात, तेच आम्ही पितो. यामुळेच गावातले अनेक लोक आजारी पडले आहेत."
 
"यंदा आम्ही भीषण दुष्काळाचा सामना करत आहोत आणि कुणीच आम्हाला मदत करत नाहीये. आम्हाला शेतीसुद्धा करता येत नाहीये. गाई निवाऱ्यात आहेत, पण बैलांचं आणि शेळी-मेंढ्यांचं काय? हे पशुधन अक्षरश: तरफडून मरत आहेत," शेजारच्या जलोया गावातील रहिवासी विजयसिंह परमार सांगतात.
 
जलोया आणि भाखरी या दोन्ही गावातील लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
 
भारत-पाकच्या सीमेवरील थराद गावापासून तुम्ही वावकडे गेल्यास तर तुम्हाला ओसाड जमीन दिसेल. इतकंच नाही तर जनावरांचे प्रेतंही तुमच्या नजरेस पडतील.
 
या ठिकाणापासून 7 किलोमीटर अंतरावर तुम्हाला पाकिस्तानच्या गावातील प्रकाश दिसू शकतो.
 
सुरुवातीच्या काळात या गावातील काही लोक चुकून पाकिस्तानच्या सीमेवर जात, पण आता सीमेवर तारेचं कुंपण बनवण्यात आलं आहे.
 
"आम्ही पाकिस्तानच्या जवळ असल्यामुळे इकडे काही उद्योगधंदे नाहीत. त्यातच दुष्काळाची भर पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलोया गाव पाकिस्तानपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. जलोयाजवळील सीमा पाहण्यासाठी सरकारनं लोकांसाठी सुविधा केंद्र निर्माण केलं आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक रस्ता बांधण्यात आला आहे, पण तो खराब झाला आहे," विजयसिंह परमार सांगतात.
 
"हे वर्षं आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. आम्ही गाईंना आश्रयगृहात पाठवलं आहे, पण बैलांचा फार मोठा प्रश्न आहे. जे काही मिळेल, त्यावर बैलांना गुजराण करावी लागत आहे. सरकारनं पुरवलेला चारा घ्यायचा म्हटल्यास आम्हाला 30 किलोमीटर प्रवास करावा लागतो. दुधाचं उत्पादन तर निम्म्यावर आलं आहे. यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे," परमार पुढे सांगतात.
 
जलोया गावातील मेघजी राबडी आणि शिवांज राबडी सांगतात, "आमच्यासाठी जनावरं ही आमच्या मुलांसारखी आहेत. या उन्हात आम्ही त्यांना बाहेर पाठवू शकत नाही. सरकार गाई आणि बैलांसाठी चारा देतं, पण शेळी-मेंढ्यांसाठी नव्हे. शेळ्या-मेंढ्याचं पोषण करणं, आमच्यासाठी खरंच अवघड काम आहे."
 
गुजरातचे उपमुख्यमंत्री नीतीन पटेल यांनी या विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते म्हटले, "गुजरातच्या सीमावर्ती गावात सरकारचं काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल आणि प्रश्न सोडवला जाईल."
 
या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील धरणं आणि कालव्यांचाही उल्लेख केला. असं असलं तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातमधील धरणांमध्ये कमी पाणी आहे."
जोपर्यंत पाण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तरी इथल्या ग्रामस्थांसाठी पाणी म्हणजे दिवास्वप्न असणार आहे.