शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (17:18 IST)

लातूर जिल्हयातील ४६ गावे व १२ वाडयांना ५८ टँकरव्दारे पाणी पुरवठा

जिल्हयात काही पाणी विक्रेत्यांकडून भरमसाठ दर आकारुन पाणी नागरिकांना विक्री केले जात आहे. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षास तक्रारी दिल्यास संबंधित पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पाणी विक्रेत्यांनी योग्य दरानेच पाणी विक्री करावी, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. जिल्हयातील ४६ गावे व १२ वाडयांना ५८ टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून ३४५ गावे व ९६ वाडयांसाठी विहिर-विंधन विहिर अधिग्रहणाचे ६०६ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. तर पंचायत समिती स्तरावर १०६ प्रलंबित अधिग्रहण प्रस्ताव त्वरित निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या. त्याप्रमाणेच टंचाई २०१८-१९ अंतर्गत तात्पूरती पूरक नळ योजना (३१), नळ योजना विशेष दुरुस्ती (५२), विहीर खोलीकरण- गाळ काढणे (१८), नवीन विंधन विहीर घेणे व हातपंप बसविणे २०६ अशा एकूण ३०७ उपाय योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 
 
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पाणी टंचाई साप्ताहिक अहवाल, जिल्हा परिषद टंचाई अहवाल, पाणी टंचाई कृती आराखडा, टंचाई २०१८-१९ अंतर्गत मंजूर योजना, उपलब्ध पाणीसाठा, चारा उपलब्धता आदिची सविस्तर माहिती घेऊन संबंधित प्रत्येक शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापालिका आयुक्त सिंह व मुख्य कार्यकारी अधिेकारी डॉ. इटनकर यांनी ही महापालिका व जिल्हा परिषदेची टंचाईच्या अनुषंगाने माहिती देऊन मार्गदर्शन केले.