शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (21:19 IST)

प्रजासत्ताक दिनाची शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नेमकी कशी असेल?

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून उद्या (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
 
अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी झाल्याने शेतकरी संघटनांचे नेतेही चकित झाले आहेत. कोणत्याही शेतकरी संघटनेशी संलग्न नसलेले शेतकरी स्वत:हून दिल्लीत पोहोचले आहेत.
 
शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये इंधन भरू नका, असं पेट्रोल पंपचालकांना सांगण्यात आल्याच्या बातम्या उत्तर प्रदेशातून येत आहेत.
 
पंजाब आणि हरियाणाच्या स्थानिकांनी मिळून दिल्लीला जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी इंधन आणि खाण्यापिण्याच्या सोयीसुविधा पुरवल्या आहेत.
 
कंडी किसान संघर्ष समिचीचे उपाध्यक्ष जरनैल सिंह गढदीवाला यांनी सांगितलं की, एका ट्रॅक्टरमध्ये 15 हजाराचं डिझल टाकलं जाऊ शकतं. सगळी व्यवस्था लोक स्वत:च्या स्वत: करत आहेत.
 
जेव्हा आत्मसन्मानाची गोष्ट असते तेव्हा आंदोलनासाठी कोणाच्या निमंत्रणाची आवश्यकता उरत नाही.
 
दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर दिवसरात्र जा ये करत आहेत. पंजाबमध्ये रस्त्यावर लंगर लागले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर्समध्ये मोफत पेट्रोल टाकलं जात आहे.
 
चाळीसहून अधिक शेतकरी संघटनांचं संयुक्त संघटनेनुसार, दिल्लीसीमेवर सिंघू, टिकरी, गाजीपूर, पलवल आणि शाहजहाँपूर या सीमेलगतच्या भागातून ट्रॅक्टर परेड निघेल.
 
दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमधील ठरलेल्या नियोजनानुसार 26 जानेवारीला राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची परेड सुरू होईल. शंभर किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर ही परेड थांबेल.
 
यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी वॉररुम तयार करण्यात आली आहे. ट्रॅक्टर परेडसाठी आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करण्याचं काम इथून सुरू आहे.
 
शेतकरी नेत्यांनुसार, प्रत्येक वॉररुममध्ये 40 जणांचा चमू तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये डॉक्टर, सुरक्षाव्यवस्था, सोशल मीडिया व्यवस्थापक यांचा समावेश आहे. ज्या परिसरातून ट्रॅक्टर परेड जाईल तिथे 40 रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.
 
ही परेड शांततामय पद्धतीने व्हावी यासाठी 2500 स्वयंसेवकांना तैनात करण्यात आलं आहे. त्यांना बॅज आणि ओळखपत्र देण्यात आलं आहे.
 
आंदोलनात सहभागी होणाऱ्या माजी सैनिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काहीजणांना खास कर्तव्यावर नेमण्यात आलं आहे.
 
सिंघू आणि टिकरी सीमेनजीक बॅरिकेड हटवण्यास दिल्ली पोलिसांनी होकार दिला. शांततामय पद्धतीने ट्रॅक्टर परेड आयोजित केली जाईल आणि सगळी माणसं आणि ट्रॅक्टर आंदोलनस्थळी परततील या हमीनंतर दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली आहे.
 
'कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यासाठी'

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तामिळनाडू येथे निवडणुकीचा प्रचार करत असताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. त्यांना बाजारपेठाही नको आहेत. ते केवळ त्यांच्या पाच किंवा सहा मित्रांना गहू, तांदूळ आणि धान्याची साठवणूक करण्याचा अधिकार देत आहेत.
 
त्यांना लाखो टन धान्य साठवण्याचा अधिकार असेल आणि शेतकरी याबाबत प्रश्नही उपस्थित करू शकणार नाहीत. याप्रकरणी शेतकरी कोर्टातही दाद मागू शकणार नाहीत."
 
"शेतकरी नवीन कृषी कायद्यांमुळे समाधानी नसून आजही दिल्लीच्या सीमेवर त्यांचे आंदोलन कायम आहे. "त्यांचे भविष्य धोक्यात असल्याची त्यांना कल्पना आहे." अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.