शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (21:08 IST)

भारत-चीन सीमा तणाव : दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सिक्किमच्या नाकुला भागात झटापट

Indo-China border tensions:Clashesin Nakula area of Sikkim
सिक्किममधील नाकुला भागात भारत-चीन सीमेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्कराकडून दुजोरा देण्यात आला आहे.
 
भारतीय लष्करानं या संपूर्ण घटनेबद्दल निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, उत्तर सिक्किममधील नाकुला भागात 20 जानेवारीला भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांदरम्यान किरकोळ झटापट झाली. स्थानिक कमांडर्सनी नियमांचं पालन करत हा वाद मिटवूनही टाकला.
 
या संबंधीचं वार्तांकन करताना वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये, असंही लष्करानं माध्यमांना म्हटलं आहे.
 
एएफपी या वृत्तसंस्थेनं भारतीय माध्यमांमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टचा हवाला देत म्हटलं होतं की, या झटापटीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले आहेत.
 
ही कथित घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. उत्तर सिक्किम भागातील नाकुला सीमेजवळ काही चिनी सैनिक सीमारेषा ओलांडून येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच ही झटापट झाली.
 
भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार या झटापटीत चीनचे 20 सैनिक जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे चार भारतीय सैनिकही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
 
लडाखजवळ काही महिन्यांपासून सुरू असलेला सीमा वाद सोडविण्यासाठी रविवारी मोल्डो भागात कमांडर स्तरावरील चर्चेची 9वी फेरी पार पडली.
 
भारत आणि चीन दोन्ही देशांनी वादाचा मुद्दा असलेल्या ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावरुन कमांडर स्तरावर तसंच राजनयिक पातळीवरही चर्चा सुरू आहेत. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जी परिस्थिती होती, तीच आताही असल्याचं सांगितलं जात आहे.
 
दरम्यान, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, भारतीय हद्दीत चीन आपलं नियंत्रण वाढवत आहे. 
 
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नाव न घेता टोमणा मारला आहे. 'चीनबद्दल मि. 56 यांनी गेले अनेक महिने एक शब्दही उच्चारला नाहीये. आता तरी ते 'चीन' म्हणायला लागतील,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.