मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:26 IST)

आदित्य ठाकरे जिथून लढतील तो वरळी विधानसभा मतदारसंघ कसा आहे

हर्षल आकुडे
  
अखेर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
ही घोषणा शिवसेनेसाठीही राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक आहे. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलं नव्हतं. ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढवत नसल्यावरून विरोधक अनेकवेळा टीकाही करायचे. पण आता एक वेगळं चित्र आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

"ठाकरे परिवारातला कुणी निवडणूक लढवणार नाही, हे जरी सत्य असलं तरी, इतिहास घडवताना कधीकधी नियम बाजूला ठेवावे लागतात. बाळासाहेबांनाही वाटायचं की समाजकारण व्यवस्थित करायचं असेल तर राजकारणाच्या खवळत्या समुद्रात स्वतःच उतरावं लागेल," असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आदित्य यांच्या घोषणेनंतर म्हणाले.
आधी आपल्या जनआशीर्वाद यात्रेद्वारे महाराष्ट्राचा दौरा करणारे आदित्य हे मुंबईच्या वरळी मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत.
शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबई हाच पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या 20 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. मुंबई तसंच कोकण पट्ट्यातूनच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येत असल्याची आतापर्यंतची आकडेवारी आहे.

मग वरळीचीच निवड का?
आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली. 2014 साली इथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. हेच सचिन अहिर आता शिवसेनेत सामिल झाले आहेत.

तसंच 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली असावी.

मुंबईतील वरिष्ठ पत्रकार आणि "बाळ ठाकरे अॅंड द राईज ऑफ द शिवसेना" पुस्तकाचे लेखक वैभव पुरंदरे यांच्या मते, "आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना साहजिकच सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करणार, यात शंका नाही. त्यामुळेच वरळीचा विचार केला गेला असावा."

"युती होवो किंवा न होवो, या मतदारसंघात आदित्य यांना उभं करायचं याची तयारी शिवसेनेने पूर्वीपासूनच केली होती. या भागात शिवसेनेचं कामही चांगलं आहे. इथली यंग ब्रिगेड शिवसेनेच्या पाठीशी असल्यामुळेच या मतदारसंघाची निवड करण्यात आली. इथून आदित्य चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात," असं मुंबई 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहयोगी संपादक संजय व्हनमाने यांनी सांगितलं.

वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राची छोटी आवृत्ती असल्याचं संजय व्हनमाने सांगतात. "वरळीमध्ये गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर होत्या. या परिसराला एकेकाळी गिरणगावही म्हणलं जायचं. गिरण्या बंद पडल्यानंतर वरळीमध्ये टोलेजंग इमारती, 5 स्टार हॉटेल्स, मल्टीप्लेक्स उभे राहिले आणि पुढच्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला."

"वरळीमध्ये मोठमोठ्या चाळी आहेत. रेसकोर्स,ऑर्थर रोड जेल आहे, सर्वांत मोठा धोबीघाट आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजरातमधले अनेक नागरिक याठिकाणी राहायला आले आहेत. संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या या भागात पाहायला मिळते," असं ते पुढे सांगतात.
"सीताराम, मोरारजी, मफतलाल, डॉन मिल यासारख्या अनेक गिरण्या या मतदारसंघात आणि आजुबाजूला आहेत. मध्यंतरी संपामुळे अनेक गिरण्या बंद पडल्या आणि इथले बरेच मतदार उपनगरात, कल्याण-डोंबिवलीकडे वळले. पण तरीसुद्धा मराठी मतदारच या भागात महत्त्वाचा मानला जातो," असं संजय व्हनमाने सांगतात.

मतदारसंघातील प्रश्न कोणते ?

"बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध, हे दोन प्रमुख प्रश्न वरळी मतदारसंघात आहेत. त्याशिवाय मुंबईतील इतर मतदारसंघातील समस्यांप्रमाणेच इथेही समस्या आहेत," असंही संजय व्हनमाने सांगतात.

निवडणुकीवर परिणाम काय?
आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरू शकतो, असं राजकीय विश्लेषक संतोष प्रधान सांगतात.

महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आधीपासूनच आहे. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे जास्त काही बदल घडणार नसल्याचं प्रधान यांना वाटतं.

"शिवसेनेत बऱ्याच वर्षांपासून काम करणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत नवं नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या स्वरूपात पुढे येईल. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलं जात आहे. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असलं तरी वर्षानुवर्षं काम करणाऱ्या काही नेत्यांना हा निर्णय निराश करू शकतो. सत्ता मिळाल्यानंतर नव्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व नेत्यांना मान्य करावं लागेल," असंही ते सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना विधिमंडळ नेते बनवल्यानंतर अनेक प्रस्थापित नेत्यांच्या ते पचनी पडलं नव्हतं. अशीच परिस्थिती शिवसेनेत निर्माण होऊ शकते, असं प्रधान सांगतात.

सुनील शिंदे काय करतील?
"वरळीचे विद्यमान आमदार असलेले सुनील शिंदे आपली जागा आदित्य ठाकरे यांना देणार आहेत. त्यांना विधान परिषद अथवा इतर एखादं मोठं पद देऊन समाधानी करण्यात येईल," असं संजय व्हनमाने सांगतात.

ते सांगतात, "सुनील शिंदे हे हाडाचे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी नगरसेवक पदापासून आमदारकीपर्यंत मजल मारली आहे. अनेक कार्यक्रमातं ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत हिरीरीने सहभागी होतात. सुनील शिंदे बंडखोरी करण्याची कोणतीही शक्यता नाही."