मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2023 (16:41 IST)

तिने मोदींना मुस्लिमांवरून प्रश्न विचारला, मोदी समर्थकांनी तिला ट्रोल केलं, व्हाईट हाऊस म्हणतं...

अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलची एक पत्रकार सबरीना सिद्दीकी यांना भारताचे पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारल्यामुळे ऑनलाईन ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.
 
सोमवारी, 26 जूनला व्हाईट हाऊसने याचा निषेध केला आहे.
 
सबरीना यांनी मोदींना त्यांच्या सरकारकडून अल्पसंख्यकांसोबत केला जाणारा कथित भेदभाव आणि मानवाधिकाराशी संबंधित रेकॉर्डवर प्रश्न विचारला होता.
 
वॉशिंग्टनमध्ये असणारं व्हाईट हाऊस अमेरिकन राष्ट्रपतींचं अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान आहे. याला अमेरिकेचं सत्ता केंद्रही समजलं जातं.
 
26 जूनला व्हाईट हाऊसच्या एका पत्रकार परिषदेत एनबीसी या चॅनलच्या पत्रकार केली ओ’डोनल यांनी सबरीना यांच्या ऑनलाईन छळाबाबत प्रश्न विचारला.
 
त्यांनी व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांना विचारलं, “मी थोडक्यात एक वेगळा प्रश्न विचारू इच्छिते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या आमच्या सहकारी पत्रकाराने पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारला होता. यानंतर भारतातले लोक त्यांना ऑनलाईन ट्रोल करत आहेत.”
 
“यात काही नेतेही आहेत जे मोदी सरकारचे समर्थक आहेत. सबरीनाला यासाठी लक्ष्य केलं जातंय की त्या मुस्लीम आहेत आणि त्यांनी याच संबंधी प्रश्न विचारला होता. लोकशाही देशाच्या नेत्याला प्रश्न विचारल्यामुळे जर अशा प्रकारचा छळ सहन करावा लागत असेल तर याबद्दल व्हाईट हाऊसची काय प्रतिक्रिया आहे?”
 
याचं उत्तर देताना किर्बी म्हणाले, “आम्हाला या ऑनलाईन ट्रोलिंगबद्दल कल्पना आहे. हे चुकीचं आहे. आम्ही पत्रकारांच्या अशा प्रकारच्या छळाचा निषेध करतो. पत्रकार कुठलेही असले, कोणत्याही पार्श्वभूमीतून येणारे असले तरी त्यांचा अशा प्रकारे छळ करणं अयोग्य आहे. लोकशाही मुल्यांच्या विपरीत आहे हे.”
 
सबरीना सिद्दीकी यांनी काय विचारलं होतं?
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
 
या पत्रकार परिषदेत बायडन यांना भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत होणाऱ्या भेदभावावर प्रश्न विचारण्यात आला. वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांनं हा प्रश्न विचारला, त्यावर आम्ही लोकशाही मूल्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असं उत्तर यावेळी बायडन यांनी दिलं.
 
त्यानंतर हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला.
 
भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला जाते. ते थांबवण्यासाठी तुमचं सरकार काय पावलं उचलत आहे, असा सवाल विचारण्यात आला.
 
त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, “तुम्ही म्हणता की तुम्ही ऐकलंय की भारत लोकशाही देश आहे. ऐकलं नाही, भारत लोकशाहीच देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. संविधानाच्या रुपात आमच्या पूर्वजांनी त्याला शब्दस्वरूप दिलं आहे. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला आमच्या लोकशाहीत जागा नाही.”
 
“ज्या ठिकाणी मानवी मूल्यांना जागा नाही तिथं लोकशाही असू शकत नाही. धर्म किंवा जातीच्या आधारे भारतात कुठलाही भेदभाव नाही. सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांना दिला जातोय, त्यात कुठलाही भेदभाव नाही.”
 
प्रश्न विचारल्यानंतर ट्रोलिंग
जेव्हा सबरीना सिद्दीकी यांनी हा प्रश्न मोदींना विचारला त्यानंतर काही वेळातच त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू झालं.
 
भाजप समर्थक असणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सने सबरीना सिद्दीकी यांना ‘भारतविरोधी’, ‘पाकिस्तानी’ अशी विशेषणं लावली.
 
सबरीना मुस्लीम असल्यामुळेही त्यांना ट्रोल करण्यात आलं.
 
सबरीना यांनी पाकिस्तानच्या झेंड्याचे जे फोटो पोस्ट केले होते, त्याचे स्क्रीन शॉट्सही ट्रोलर्सनी शेअर केले आणि सबरीन यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
 
ट्रोलिंग वाढू लागलं तसं सबरीना यांनी ट्विटरवर आपल्या वडिलांसोबत काढलेला 2011 सालचा फोटो पोस्ट केला. या फोटोत त्या भारताच्या मॅचदरम्यान भारताची जर्सी घातलेल्या आपल्या वडिलांसोबत दिसत आहेत.
 
सबरीना यांनी ट्वीट केलं की, “आता काही लोक माझ्या खाजगी आयुष्यावरून काहीतरी सिद्ध करू पाहात आहेत. तेव्हा मला वाटतं की पूर्ण चित्र समोर उभं केलं पाहिजे. अनेकादा ओळख जितकी सोपी वाटते तितकीच गुंतागुंतीची असते.”
 
सोशल मीडियावर असेही फोटो आहेत ज्यात सबरीना टीम इंडियाची जर्सी घालून भारतीय टीमला पाठिंबा देत आहेत.
 
सबरीना याचं हे ट्वीट अनेक काँग्रेस नेत्यांनी रिट्वीट करत मोदी सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला.
 
सबरीना यांच्या ऑनलाईन छळाचा इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिलनेही निषेध केला आहे.
 
त्यांनी ट्वीट केलं, “(लोकांप्रति) उत्तरदायित्व असणाऱ्या नेत्यांना प्रश्न विचारण्यात पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वतःचं काम केलं म्हणून पत्रकारांचा कधीही छळ होता कामा नये. आम्ही सबरीने आणि अशा धमक्या मिळणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या बाजूने उभे आहोत.”
 
कोण आहे सबरीना सिद्दीकी?
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार सबरीना सर सैय्यद अहमद खान यांच्या कुटुंबातल्या आहेत. सबरीन दीर्घ काळापासून व्हाईट हाऊस कव्हर करणाऱ्या रिपोर्टर आहेत आणि बायडन प्रशासनालाही कव्हर करत आहेत.
 
या वर्षी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी यूक्रेनचा ऐतिहासिक दौरा केला. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पत्रकारांमध्ये सबरीनाही होत्या.
 
2019 साली वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नोकरी सुरू करण्याआधी त्यांनी द गार्डियन या वृत्तपत्रासाठी राष्ट्राध्यक्ष निवडणुका आणि व्हाईट हाऊस कव्हर केलं आहे.
 
सिद्दीकी यांनी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पदवी घेतली आहे आणि त्या आपल्या पती आणि मुलीसह वॉशिंग्टनमध्ये राहातात.