गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (16:28 IST)

चांद्रयान – 2 ची कमान सांभाळण्याऱ्या दोन महिला शास्त्रज्ञ कोण?

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्रो) पुन्हा चंद्रावर आपलं यान पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी ऑक्टोबर 2008 मध्ये इस्रो चांद्रयान -1 या यानाला चंद्रावर पाठवलं होतं.
 
इस्रोने यावेळी चांद्रयान -2ची घोषणा केली असून या यानाला 15 जुलैला सकाळी 2.51 वाजता आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटाहून प्रक्षेपित केलं जाईल.
 
इस्रोची ही अंतराळ मोहीम खास आहे कारण यंदा मोहिमेची धुरा दोन महिला शास्त्रज्ञांच्या हातात आहे. रितू करिधल या संपूर्ण मिशनच्या डायरेक्टर आहेत तर एम. वनिता प्रोजेक्ट डायरेक्टर.
 
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान- 2 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की आम्ही महिला आणि पुरुष यांच्यात काहीही भेदभाव करत नाही. इस्रोमध्ये जवळपास 30 टक्के महिला काम करतात.
 
इस्रोच्या एखाद्या मोहिमेत महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी मंगळयान मोहिमेतही आठ महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
रॉकेट वुमन ऑफ इंडिया
चांद्रयान - 2 च्या मिशन डायरेक्टर रितू करिधल यांना रॉकेट वूमन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. त्या मंगळयान मोहिमेच्या म्हणजेच 'मार्स ऑर्बिटर मिशन'च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या. त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
 
2007 साली त्यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्टचं पारितोषिकही मिळालं आहे.
 
करिधल यांना लहानपणापासूनच विज्ञानात रस होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, "चंद्राच्या रोज वाढत किंवा कमी होत जाणाऱ्या आकाराबद्दल मला कुतूहल होतं. मला अंतराळातल्या लपलेल्या गोष्टींविषयी जाणून घ्यायचं होतं."
 
भौतिकशास्त्र आणि गणित हे रितूंचे आवडते विषय आहेत. त्या लहान असताना नासा आणि इस्रोच्या सगळ्या प्रकल्पांविषयी वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांची कात्रणं जमा करत. त्या कात्रणांचा अभ्यास करून अवकाश विज्ञानाच्या लहानसहान गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत.
 
विज्ञान आणि अवकाश यांच्याबद्दल असणारी ओढच त्यांना इस्रो पर्यंत घेऊन आली. त्या सांगतात, "पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर मी इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. माझं सिलेक्शन झालं आणि मी इस्रोची वैज्ञानिक बनले."
 
आपल्या 20-21 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी इस्रोच्या अनेक प्रकल्पांवर काम केलं.
 
स्टार प्लसच्या एका कार्यक्रमात बोलताना रितू म्हणाल्या होत्या, "माझ्या आईवडिलांनी 20 वर्षांपूर्वी मला जो आत्मविश्वास दिला होता तो आज अनेक जण आपल्या मुलींना देत आहे. त्यांना प्रोत्साहन देत आहे. पण तरी मला वाटतं की आपल्या देशातल्या मुलींच्या मनात आपण ही भावना रूजवू शकलो की मुली भले शहरातल्या असतील किंवा खेड्यातल्या, त्यांना घरच्यांचा पाठिंबा असेल तर त्या काहीही करू शकतात."
 
एम वनिता
एम वनिता चांद्रयान - 2 मोहिमेत प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. वनिता यांच्याकडे डिजाईन इंजिनिअरिंगची डिग्री आहे. त्यांना अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून 2006 साली बेस्ट वुमन सायंटिस्टचं पारितोषिक मिळालं आहे. त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केलं आहे.
 
वैज्ञानिक विषयांच्या जाणकार पल्लव बागला सांगतात की, प्रोजेक्ट डायरेक्टरवर मोहिमेची सगळी जबाबदारी असते. एका मोहिमेचा एकच प्रोजेक्ट डिरेक्टर असतो, तर मिशन डिरेक्टर अनेक असू शकतात, जसं की ऑर्बिट डिरेक्टर, सॅटेलाईट डिरेक्टर.
 
वनिता यांना या मोहिमेच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल.
 
काय आहे चांद्रयान - 2 मोहीम
इस्रोने यावेळी चांद्रयान -2ची घोषणा केली असून या यानाला 15 जुलैला सकाळी 2.51 वाजता आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटाहून प्रक्षेपित केलं जाईल. या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण खर्च हा 600 कोटीपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
 
3.8 टन वजन असलेल्या चांद्रयान-2 ला जीएसएलवी मार्क-तीन वरून अंतराळात प्रक्षेपित केलं जाईल.
 
चांद्रयान-2 ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचं नवं लँडर आहे आणि एक 'प्रज्ञान' या नावाचं रोव्हर आहे. या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. असं लॅंडिंग अवघड आहे असं म्हटलं जातं.
 
चांद्रयान-2 ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचं नवं लँडर आहे आणि एक 'प्रज्ञान' या नावाचं रोव्हर आहे. या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. असं लॅंडिंग अवघड आहे असं म्हटलं जातं.
 
असं झालं तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल. आणि म्हणूनच ही मोहीम भारतासाठी महत्त्वाची आहे. याद्वारे भारत चंद्राविषयी अजून संशोधन करू शकेल. इस्रोला वाटतं की ही मोहीम यशस्वी ठरेल.