शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (13:39 IST)

आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा जयसिंग राजपूत कोण आहे?

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (23 डिसेंबर) चांगलाच गाजला. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जयसिंह राजपूत याला कर्नाटकातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे.
 
या धमकी प्रकरणाचं कनेक्शन कर्नाटकात असल्यामुळं याचं आणखी काही कनेक्शन आहे का, याचा शोध घेण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
 
आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जयसिंह राजपूत याला कर्नाटकातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बेंगळुरूतून त्याला अटक केली आहे.
 
त्यामुळं हा जयसिंह राजपूत नेमका कोण आहे? त्याने धमकी नेमकी का दिली, यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
 
प्रकरण काय आहे?
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फोन लागला नाही म्हणून त्यांना मेसेजद्वारे धमकी दिली होती.
 
'तूने सुशांत सिंह राजपूत को मारा, अगला नंबर तेरा है' अशा प्रकारची धमकी आदित्य ठाकरेंना देण्यात आली होती. या धमकीनंतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
 
त्यावर मुंबई पोलिसांनी तपास केला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलनं बेंगळुरूमधून ही धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक केली आहे.
 
एसआयटीची स्थापना
आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीनंतर जयसिंग राजपूतला बंगळुरू येथे अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईतही आणलं आहे. त्या आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
 
नेत्यांना ज्या धमक्या येतात याबाबत राज्यस्तरावर एक SIT ची स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामार्फत अशा सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे.
 
जयसिंग राजपूत कोण आहे?
मुंबई पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केलेल्या जयसिंग राजपूत यानं तो सुशांतसिंह राजपूत याचा फॅन असल्याचा दावा केला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
 
सुशांतसिंह राजपूतच्या हत्येमागे आदित्य ठाकरे यांचा हात होता, असा आरोप जयसिंह राजपूतनं केला असल्याचं टीव्ही 9 च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
 
कर्नाटक कनेक्शनवर सत्ताधाऱ्यांचं बोट
विधानसभेत गुरुवारी या विषयावर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. धमकी देणारा आरोपी कर्नाटकात सापडला. कर्नाटकात सापडल्यानंतर अनेक तर्कवितर्क आपल्या मनात येऊ शकतात, असं सुनील प्रभू यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
 
"दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येचं कनेक्शनही कर्नटकात होतं. तेव्हापासून आतापर्यंत भाजपचं सरकार आहे. यात कोणतं कनेक्शन आहे, धमकी देणाऱ्यांच्या पाठिशी कोण आहे याची माहिती देणं गरजेचं आहे," असंही सुनील प्रभू यावेळी म्हणाले.
 
तर सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या आडून अनेक नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. रिया चक्रवर्तीवर दबाव आणून तिला अडकवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत आत्महत्या झाली आणि त्याचा गुन्हा बिहारमध्ये नोंद झाला. त्याच्या तपासाला येणारे पोलिस मर्सिडिझ आणि बीएमडबल्यूमधून फिरत होते. ती गाडी भाजपच्या एका नेत्याची होती, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
 
या नेत्याचं नाव निलोत्पल उत्पल आहे. उत्पल सोन्याचा स्मगलर आहे. तेव्हापासून आतापर्यंत सुशांत प्रकरण सोशल मीडियात ट्रेंड आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रेंड करण्यासाठी महिन्याला तीस लाख पुरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
 
तसंच या सगळ्याच्या मागे कुठेतरी कर्नाटक कनेक्शन आहे. एसआयटी नेमून सोशल मीडियावर बदनामीसारख्या विषयाचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच सनातनसारख्या संस्था या मागे आहेत असा आरोपही त्यांनी केला.
 
राजकीय वळण नको - फडणवीस
विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या धमकीच्या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी हा गंभीर विषय असून त्यावर राजकारण करू नये असं म्हटलं.
 
"आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा मी निषेध करतो. अशा धमकी देणाऱ्यांना ठेचलंच पाहिजे. मात्र, सुनील प्रभूंनी एवढ्या गंभीर प्रकरणाला राजकीय वळण देण्याटा प्रयत्न केला."
 
"यापैकी महाराष्ट्रात दोन हत्या झाल्या. त्यांचे आरोपी महाराष्ट्रातले होते. गुन्हेगार कुठलेही असले तरी गुन्हेगार असतात. प्रत्येक प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा नसतो. सनातनचा विषय असेल तर दोन वर्षांपासून तुमचं सरकार आहे तुम्ही कारवाई का करत नाही?" असा सवाल फडणवीस यांनी केला.