गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शनिवार, 3 डिसेंबर 2022 (14:08 IST)

ओसामा बिन लादेन ने त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक प्रयोग का केले होते?

"मुस्लिम समुदायात कुत्रे पाळणं निषिद्ध मानलं जायचं, पण माझे पती  ओसामा बिन लादेन यांनी युरोप मधून सफार आणि झायर नावाची दोन जर्मन शेफर्ड कुत्री मागवली होती. उमरने मला खार्तूममध्ये असताना सांगितलं की, त्याचे वडील कुत्र्यांना गोंजारत होते. हे ऐकून मी हैराणच झाले. कारण माझे पती इस्लामचे कट्टर अनुयायी होते. आणि मुस्लिमांनी कुत्र्यांपासून दूर राहावं असं इस्लाममध्ये सांगितलंय."
 
हा किस्सा आहे 'ग्रोइंग अप बिन लादेन: ओसामाज वाईफ अँड सन टेक अस इनसाइड देअर सिक्रेट वर्ल्ड' या पुस्तकातला. आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत नजवा बिन लादेन.
 
ओसामा बिन लादेनची पहिली पत्नी नजवाने 2015 मध्ये मुलगा उमर बिन लादेन आणि लेखक जॉन सॅसो सोबत या पुस्तकाचं लिखाण पूर्ण केलं. या पुस्तकाच्या 17 व्या चाप्टरमध्ये ओसामाच्या श्वानप्रेमाविषयी सविस्तर लिहिलंय.
 
नजवा पुढे लिहिते, "या दोन कुत्र्यांमधला एक कुत्रा चोरीला गेल्यावर खूपच मनस्ताप झाला होता. तर दुसऱ्या कुत्र्याला कसला तरी असाध्य रोग जडल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला."
 
हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जवळपास 7 वर्षांनी ओसामाचा मुलगा उमर बिन लादेनने 'द सन' या वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, माझ्या वडिलांनी, ओसामा बिन लादेनने त्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांचं परीक्षण केलं होतं.
 
2011 मध्ये अमेरिकेन सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून लष्करी कारवाई करत ओसामा बिन लादेनला ठार मारलं. लादेनला ठार केल्यानंतर  लादेनच्या साथीदारांनी रासायनिक शस्त्रांची चाचणी केल्याचे दावे करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर उमर म्हटला होता की, "होय, मी हे पाहिलं होतं."
 
उमर म्हणाला होता की, "त्यांनी माझ्या कुत्र्यावर सुद्धा याची चाचणी केली होती. मला हे बिलकुल आवडलं नव्हतं. मला या वाईट आठवणी विसरून जायच्या आहेत. हे माझ्यासाठी अवघड आहे, कारण आपल्याला नेहमीच या गोष्टी आठवत राहतात."
 
उमर जेव्हा त्याच्या वडिलांसोबत अफगाणिस्तानात राहायचा, तेव्हा त्याच्याकडे बॉबी नावाचा कुत्रा होता. बॉबीला गार्ड डॉगप्रमाणे ट्रेन केलं जायचं. पुस्तकात असंही म्हटलंय की, "बॉबीचा लवकरच मृत्यू झाला, पण तो कशाने झाला याविषयी कोणालाच माहीत नव्हतं."
 
उमर बिन लादेन कोण आहे?
2010 च्या जानेवारी महिन्यात एका रात्री ओसामा बिन लादेनचा चौथा मुलगा उमरने न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर लेखक आणि इन्व्हेस्टीगेटिव्ह जर्नलिस्ट असलेल्या गाय लॉसन यांना दमास्कसमधील नाईट क्लबमध्ये बोलावलं होतं.
 
रोलिंग स्टोन मासिकात "ओसामास सन : द डार्क, ट्विस्टेड जर्नी ऑफ उमर बिन लादेन" नावाची कव्हर स्टोरी छापून आली आहे. ही स्टोरी गाय लॉसन यांनी कव्हर केली होती. त्यातच या भेटीचा उल्लेख सापडतो.
 
"या नाईट क्लबच्या बेसमेंटमध्ये मंद प्रकाश होता. तिथं डझनभर अरबी पुरुष व्हिस्कीचे घोट रिचवत पोल-डान्स पाहत होते. तिथंच असलेला उमर सॉफ्ट ड्रिंकचा प्याला तोंडाला लावत म्हटला, "रशियन महिला खूप सुंदर असतात, अगदी बाहुल्यांसारख्या."
 
गाय लॉसन आणि उमर यांची भेट झाली तेव्हा ओसामा बिन लादेन जिवंत होता. पण तो नेमका कुठं लपून बसलाय याची कोणालाच काहीच खबरबात नव्हती. साहजिकच, त्यावेळी तो जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादीही होता. कारण अमेरिका खूप दिवसांपासून त्याच्या शोधात होती.
 
खूप वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेन त्याच्या कुटुंबासह अफगाणिस्तानातील तोराबोरा पर्वतराजींमध्ये राहत होता. त्यावेळी तरुण असलेला उमरही त्याच्यासोबत राहायचा. ओसामाने त्याच्या  'ग्लोबल जिहाद'साठी उमरला त्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं. आणि हे त्याच्या जवळच्या लोकांना माहिती होतं.
 
पण 2001 मध्ये अमेरिकेत अतिरेकी हल्ल्याची योजना आखणारा ओसामा बिन लादेन हा जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनण्याआधीच उमरने त्याच्या बापाचं घर सोडलं.
 
उमर आता 41 वर्षांचा आहे. ओसामाला सौदी अरेबिया सोडावं लागल्याने उमर 1991 ते 1996 पर्यंत त्याच्या वडिलांसोबत सुदानमध्ये राहत होता. वडिलांपासून बाजूला गेल्यावर उमरने कबूल केलं होतं की, त्याला अल-कायदाच्या ट्रेनींग कॅम्पमध्ये शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
 
'ग्रोइंग अप बिन लादेन: ओसामाज वाईफ अँड सन टेक अस इनसाइड देअर सिक्रेट वर्ल्ड' या आपल्या चरित्रात उमर लिहितो, "मी  अल-कायदा मधून बाहेर पडलो कारण मला नागरिकांची हत्या करणं मान्य नव्हतं. मला माहित होतं की, माझ्या या निर्णयावर माझे वडील खुश नाहीयेत, पण तरीही त्यांनी माझा निर्णय स्वीकारून मला जायला सांगितलं."
 
त्यानंतर उमरने सौदी अरेबिया गाठलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 2006 मध्ये त्याने युरोपला जाण्याचा विचार केला.
 
याच दरम्यान, उमरने लग्न केलं आणि त्याचा घटस्फोटही झाला होता. या लग्नातून त्याला एक मुलगा होता. 
 
बीबीसी वनने 2006 मध्ये एक बातमी दिली होती. त्यात म्हटलं होतं की, त्याच वर्षी इजिप्तमध्ये उमरची भेट जेम्स फेलिक्स-ब्राऊन नामक स्त्रीशी झाली. ही स्त्री ब्रिटिश नागरिक होती, शिवाय ती उमरपेक्षा 24 वर्षांनी मोठी होती आणि तिला पाच नातवंडं होती.
 
त्या दोघांनी तिथंच लग्न केलं आणि जेम्सचं नाव झैना असं ठेवलं. जेद्दाहमध्ये काही महिने घालवल्यानंतर ते दोघेही ब्रिटनला गेले.
 
उमर त्याच्या पुस्तकात लिहितो की, "युरोपमध्ये गेल्या मला बऱ्याच अडचणी आल्या पण लग्नानंतर माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. मला माझ्या आयुष्यात नेमकं काय हवंय हे जाणून घ्यायचं होतं."
 
एपी या वृत्तसंस्थेने 2008 साली दिलेल्या बातमीनुसार, "उमरला शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करायचं होतं."
 
याच काळात उमरने काही मुलाखती दिल्या. या मुलाखतींमधून लादेन कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल जगाला आणखीन माहिती मिळत गेली.
 
व्हॅनिटी फेअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत उमरने सांगितलं होतं की, "माझे आजोबा मोहम्मद बिन अवाद बिन लादेन इतके श्रीमंत होते की, ते चार लग्न करून चारही बायकांना घटस्फोट दयायचे. आणि पुन्हा चार लग्न करायचे. या सगळ्या लग्नांमधून त्यांना इतक्या बायका, इतकी मुलं आणि नातवंडं झाली की, आमचे कोणाचेच संबंध म्हणावे तसे चांगले राहिले नाहीत."
 
उमर आता त्याची पत्नी झैनासोबत फ्रान्समधील नॉर्मंडीमध्ये राहतो. तो पेशाने व्यावसायिक चित्रकार आहे. त्याची कला आणि नॉर्मंडीचे पर्वत त्याच्यासाठी एका थेरेपीप्रमाणे काम करतात असं त्याचं म्हणणं आहे.
 
हल्लीच ब्रिटनच्या 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत उमर सांगतो, "2 मे 2011 मध्ये अमेरिकन नेव्ही सीलने माझ्या वडिलांना पाकिस्तानमधील सेफहाऊसमध्ये ठार केलं तेव्हा मी कतारमध्ये होतो".
 
पण अमेरिकेने त्याच्या वडिलांचा मृतदेह समुद्रात टाकलाय यावर त्याचा विश्वास नाहीये.
 
तो म्हणतो, "त्यांनी माझ्या वडिलांसोबत नेमकं काय केलंय मला माहिती नाही. पण त्यांनी त्यांचा मृतदेह नक्कीच समुद्रात टाकलेला नाही. मला असं वाटतंय त्यांनी तो मृतदेह लोकांना दाखवण्यासाठी अमेरिकेत नेला असणार."
 
आपल्या वडिलांविषयी उमर एकदा म्हटला होता की, "ते एक चांगले वडील होते, पण आमचे मार्ग वेगवेगळे होते."
 
पण 2010 च्या त्या रात्री दमास्कसच्या बारमध्ये मिणमिणत्या प्रकाशात उमरने गाय लॉसनसमोर आपलं हृदय रिकामं केलं होतं.
 
रोलिंग स्टोन मॅगझिनच्या कव्हर स्टोरीनुसार, उमर म्हणाला होता की, "मी या रशियन पोल-डान्सर्सशी बऱ्याचदा बोललोय. मी माझं नाव सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाही. मला माहिती आहे की, गरिबीमुळे त्यांना असं नाचावं लागतंय. माझ्या वडिलांनी त्यांची (रशियाची) अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. आणि आता ते अमेरिकेसोबतही तेच करत आहेत."