गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2019 (11:05 IST)

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते : केजरीवाल

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षारक्षकाने केली होती, तसंच मला सुरक्षा देणारे दिल्ली पोलीस अधिकारीच माझी हत्या करू शकतात अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांच्या विधानाचा भाजपने निषेध केला आहे.
 
केजरीवाल म्हणाले, "एक दिवस इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) यांच्याकडून माझी हत्या केली जाऊ शकते. भाजप माझ्या जिवावर उठली आहे तेच सुरक्षारक्षकांकडून माझी हत्या करवून घेऊ शकतात," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
 
आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी केजरीवाल पंजाब दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
"ते माझी हत्या करतील आणि एखाद्या असंतुष्ट कार्यकर्त्यानं हे काम केलं असा दावा करतील," असंही ते म्हणाले.
 
दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील अनेक मोठ्या नेत्यांना दिल्ली पोलीस सुरक्षा देत आहे. त्यांच्या रक्षणासाठी संबंधित पथक कटिबद्ध आहे. ज्याप्रमाणे इतर नेत्यांच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे त्याप्रमाणेच केजरीवाल यांचीही जबाबदारी पोलिसांवर आहे.