बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2019 (11:11 IST)

नथुराम गोडसेचा विषय निघाल्यावर नरेंद्र मोदी बॅकफूटवर का जातात?

मोदी शाह आणि शैलीचं राजकारण आक्रमक आहे, त्यात उग्र भावना आहेत आणि आपल्या निर्णयांवर कधीही खेद व्यक्त न करणंही समाविष्ट आहे. परंतु प्रज्ञा ठाकूरने सेल्फ गोल करून दोघांनाही बॅकफूटवर पाठवलं आहे.
 
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कधी लाचार झालेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का? ते दोघंही प्रत्येक गोष्ट ठणकावून-वाजवून करतात. त्यावर कधीही खेद व्यक्त करत नाहीत की त्यांना त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.
 
गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल असो, सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर असो, न्यायाधीश लोया यांचा मृत्यू असो, अमित शाह यांच्याविरोधात असलेले अनेक आरोप, नोटाबंदी, लिचिंग किंवा बॉम्बस्फोट करून निरपराध लोकांचे प्राण घेण्याचा आरोप असणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला भोपाळमधून निवडणूक लढविण्याची संधी देण्याचा निर्णय. तुम्ही नरेंद्र मोदी आणि शाह यांना कधीही बॅकफूटवर गेलेलं पाहिलं नसेल.
 
कदाचित नथुराम गोडसे हे एकमेव असं व्यक्तिमत्त्व असेल ज्यानं मोदी आणि शाह यांच्यासारख्या आक्रमक राजकारण्यांना बॅकफूटवर पाठवलं असेल.
 
ज्या लोकांनी भगवा दहशतवाद संज्ञा वापरून हिंदू संस्कृतीला बदनाम केलं होतं त्यांना सांकेतिक प्रत्युत्तर देण्यासाठीच प्रज्ञा ठाकूरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला असं मोदी-शाह म्हणत होते.
 
पण आता त्याच प्रज्ञा ठाकूरमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वारंवार मान खाली घालावी लागत आहे. मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना आपण शाप दिला होता असं प्रज्ञा म्हणाल्या होत्या.
 
गुरूवारी त्यांनी गांधींचे मारेकरी गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहातील असं वक्तव्य केलं.
 
जो पक्ष देशभक्तीवर आपला कॉपीराइट सांगतो, ज्या पक्षाचे नेते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देऊन पाकिस्तानात स्थायिक होण्याचा सल्ला देतात, त्या पक्षाची एक हायप्रोफाईल उमेदवार महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणत असेल तर तर भाजप आणि संघ परिवाराचा राष्ट्रवाद आणि नथुराम गोडसेचा राष्ट्रवाद एकच आहे का प्रश्न विचारला जाणारच.
 
गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची देशभक्ती एकसारखीच आहे का असा प्रश्न विचारला जाणारच.
 
आता त्यात जर-तर ला कोणताच वाव राहिला नसल्याचे प्रज्ञा सिंहच्या विधानातून स्पष्ट झाले होते. प्रश्नांपासून वाचण्यासाठी मोदींना टेलिव्हिजनवर दिलेल्या मुलाखतीत या विधानावर, "त्यांनी माफी मागितली आहे, मी त्यांना (प्रज्ञा ठाकूर) मनापासून कधीच माफ करू शकणार नाही हा भाग वेगळा" अशी बाजू मांडावी लागली.
 
याच मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "ही गोष्ट खूप खराब आहे. हर प्रकारे निंदनीय आहे. कोणत्याही सभ्य समाजात अशा प्रकारच्या विचारांना स्थान असू नये."
 
पण भाषेच्या बाबतीत स्वतः मोदींचा रेकॉर्ड फार काही उजळ नाही. निवडणुकीच्या प्रचारात भाषेचा स्तर कमी करण्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. जेव्हा ते आपल्या भाषणात 'काँग्रेसची विधवा' असा उल्लेख करतात. तेव्हा त्यांचा इशारा कुणाकडे असतो. डिस्लेक्सिया असलेल्या मुलांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मोदी विचारतात की '40-50 वर्षाच्या मुलाचाही उपचार होऊ शकतो का?' त्यावेळी त्यांचा इशारा कुणाकडे असतो?
 
गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा ते म्हणतात 'हम दो हमारे पांच', किंवा रस्त्यावर पंक्चर काढणारे लोक, तेव्हा त्यांचा इशारा कुणाकडे होता? जेव्ह जनरल मुशर्रफ यांचं नाव ते घेत असत तेव्हा 'मियां' या शब्दावर जोर का देत असत? किंवा तत्कालीन निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांच्या पूर्ण नावाचा उच्चार जेम्स मायकल लिंगडोह असा करून ते लहान मुलांचं जनरल नॉलेज थोडीच वाढवत होते?
 
त्यामुळेच प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाला घृणास्पद म्हणणं आणि मनातून कधीच माफ न करण्याची घोषणा करणं हे मोदींच्या व्यक्तिमत्त्वाविरोधात तसेच त्यांच्या राजकारणाच्या शैलीविरोधात जाणारं आहे असं वाटतं.
 
हे विधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या राजकारणाचा पोत याविरुद्ध आहे. या आधी नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींसारख्या भाजप नेत्यांचं नाव घेता त्यांच्या विधानांवर टीका जरूर केली आहे. मात्र टोकाची विधानं करण्याबद्दल भाजप नेत्यांना त्यांनी माफी मागायला कधीही भाग पाडलं नाही.
 
वादग्रस्त मुद्द्यांवर ते मौन धारण करतात किंवा त्याचं सामान्यीकरण करत सांकेतिक भाषेत आपण त्या विधानांशी असहमत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात.
 
पण आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा बनलेल्या प्रज्ञा ठाकूरला माफी मागायला लावणं ते टाळू शकले नाहीत.

राजेश जोशी