शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मतदानाचा सातवा टप्पा, मोदींसह अनेक हाय-प्रोफाईल उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसमवेत सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून 59 जागांवर मतदान होत आहे.
 
उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या 13 जागांवर, बिहार आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी आठ जागांवर, पश्चिम बंगालमधील नऊ, हिमाचल प्रदेशमधील चार, झारखंडमधील तीन आणि केंद्र शासित प्रदेश चंदीगढमध्ये एका जागेवर मतदान होत आहे.
 
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते पश्चिम बंगालवर. कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाला कलम 324 चा वापर करावा लागला आणि पश्चिम बंगालच्या नऊ जागांवरील प्रचार निर्धारित वेळेच्या 19 तास आधीच संपविण्यात आला.
 
या टप्प्यात 10 कोटी मतदार मतदान करतील. 909 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात होईल.
 
दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून मतदानाचा अधिकार बजावला.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
माजी केंद्रीय मंत्री आणि आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी लुधियानामधील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पाटण्यामध्ये मतदान केलं.
 
भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.
 
हाय-प्रोफाईल लढती
शेवटच्या टप्प्यांत सर्वांचं लक्ष असेल ते वाराणसी मतदारसंघाकडे. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय आणि समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव आहेत.
 
गोरखपूर मतदारसंघातून भाजपनं प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. सप-बसप आघाडीनं रामभुआल निषाद आणि काँग्रेसच्या मधुसूदन तिवारी यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिलीये.
 
बिहारच्या पटना साहिब मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या बिहारमधील सासाराममधून निवडणूक लढवत आहेत.
 
पंजाबमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी अमृतसरमधून निवडणूक लढत आहेत. गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल आणि चंदीगढमधून अभिनेत्री किरण खेर या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 
उत्तर प्रदेशमधील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार अफजाल अन्सारींचं आव्हान आहे.
 
झारखंडमधील दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन निवडणूक लढवत आहेत.