मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शत्रुघ्न विरुद्ध रविशंकर: एकाच जातीच्या दोन 'हायप्रोफाइल' उमेदवारांमध्ये कोण जिंकणार?

बॉलीवुड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यातल्या लढतीमुळे पाटणा साहिब लोकसभा सीट 'हॉट सीट' बनली आहे. सिन्हा आणि प्रसाद दोघेही कायस्थ समाजाचे आहेत आणि लोकसभेच्या या मतदारसंघात तब्बल पाच लाख कायस्थ मतदार आहेत.
 
या लोकसभा मतदारसंघातल्या या दोन हाय-प्रोफाईल उमेदवारांच्या चर्चेत भाजपचे राज्यसभा खासदार आर. के. सिन्हा यांच्यामुळेही रंगत आली आहे.
 
भारतीय जनता पक्षातर्फे रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
 
आर. के. सिन्हा उमेदवार नाहीत. मात्र, त्यांना किंवा त्यांचे पुत्र ऋतुराज सिन्हा यांना भाजपने तिकीट नाकारल्याने नाराजी आहे. त्यामुळे, आर. के. सिन्हा यांचे समर्थक रविशंकर प्रसाद यांच्या अडचणी वाढवतील, अशी चर्चा कायस्थ समाज आणि भाजप संघटनेत सुरू आहे.
कायस्थ समाजात दोन्ही उमेदवारांविषयी वेगवेगळी मतं आहेत.
 
डॉ. दिवाकर तेजस्वी म्हणतात, "आमचा समाज वस्तुनिष्ठता आणि बौद्धिकतेच्या आधारावर मत देतो. शत्रुघ्न सिन्हा वाजपेयी सरकारमधले मंत्री म्हणून यशस्वी ठरले नाही आणि खासदार म्हणूनही त्यांचा जनतेशी म्हणावा तितका संपर्क नाही."
 
बँक्वेट हॉलमध्ये काम करणारे राजकुमार सिन्हा यांच्या मते, "केंद्रात यावेळी नरेंद्र मोदी यांचंच सरकार येईल. मात्र, विरोधकही मजबूत असतील. माझी पसंती शत्रुघ्न सिन्हांना आहे कारण ते स्टार आहेत. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे."
 
हॉटेल आणि सिमेंट व्यापारी शैलेन्द्र प्रकाश सिन्हा अखिल भारतीय कायस्थ महासभचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश लाल यांचे पणतू आहेत.
 
ते म्हणतात, "शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा खासदार होते. त्यांचं काम लोकांनी बघितलं आहे. रविशंकर प्रसाद केंद्रात मंत्री आहेत. ते इथे ट्राय-हॉर्स असतील."
 
अखिल भारतीय कायस्थ महासभेची स्थापना 1887 साली झाली. या महासभेच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे नेते सुबोध कांत सहाय तर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन प्रसाद आहेत
 
विशेष म्हणजे काँग्रेस नेते सुबोध कांत सहाय शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आहेत तर महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि एनडीएचा घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन प्रसाद रविशंकर प्रसाद यांना उघड पाठिंबा देत आहेत.
 
राजीव रंजन प्रसाद 2015मध्ये भाजप उमेदवाराकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
राजीव रंजन प्रसाद म्हणतात, "महासभा निवडणूक काळात मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी मत द्यायला सांगत नाही. आज संयुक्त जनता दल एनडीएचा भाग आहे. त्यामुळे संयुक्त जनता दलाचा कार्यकर्ता म्हणून मी भाजप उमेदवाराला पाठिंबा देतोय."
 
कायस्थ महासभेचा दुसराही एक गट आहे. या गटाचं म्हणणं आहे की महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविनंदन सहाय हे आहेत आणि भाजप खासदार आर. के. सिन्हा आंतरराष्ट्रीय खजीनदार आहेत. रविनंदन सहाय यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची आहे. तर खासदार आर. के. सिन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत महासभेच्या भूमिकेविषयी रविनंद सहाय म्हणतात, "दोन्ही प्रमुख उमेदवार कायस्थ आहेत. त्यामुळे वैयक्तिक संबंधांमुळे समाज विभागला असू शकतो. महासभा एक बिगर-सरकारी संघटना आहे आणि एखाद्या विशिष्ट पक्षाला मत देण्यासाठीचं हे व्यासपीठही नाही. कुणाला मत द्यायचं हे समाजाच्या विवेकावर अवलंबून आहे."
 
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याआधी आर. के. सिन्हा यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी रविनंदन सहाय यांच्या गटाने केली होती. एक-दोन दिवसातच सुबोध कांत सहाय यांच्या गटाने त्याला विरोध केला होता.
 
या लोकसभा मतदारासंघातले काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
 
दिघा, कुम्हरार, पाटणा साहिब, फतुआ आणि बख्तियारपूर अशा पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात एकूण 20.51 लाख मतदार आहेत.
 
भाजपचे खासदार म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांनी दोनवेळा संसदेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रविशंकर प्रसाद यांची 2018 साली चौथ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागली.
 
राज्यसभेत त्यांचा कार्यकाळ 2014पर्यंत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळालेले रविशंकर प्रसाद आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा दोघांनाही विरोधाचा सामना करावा लागतोय.
 
एकूणच पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघात क्लिष्ट राजकीय पेच आहे. त्यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार नलीन वर्मा म्हणतात की दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगेल.
 
त्यांच्या मते, "शत्रुघ्न सिन्हा स्टार आहेत. सलग दोन वेळा खासदार होते. शिवाय त्यांची स्वतःची लोकप्रियताही आहे. दुसरीकडे रविशंकर प्रसाद त्या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत जिचं पाटण्यातलं स्थान भक्कम आहे. दोन्ही उमेदवारांच्या आघाड्या मजबूत आहेत."
 
आर. के. सिन्हा या निवडणुकीत तिसरा कोन असल्याचं ते मानत नाहीत. ते म्हणतात, "समर्थकांच्या भावनांवर सहसा नेत्यांचं नियंत्रण राहत नाही."