गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (11:20 IST)

योग दिवस: ‘मी 59व्या वर्षी योगासनं सुरू केली आणि आज 12 वर्षांनी मला कसलाही त्रास नाही'

मी रमा जयंत जोग. योग शिबिराच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी देशभर प्रवास करताना 2017मध्ये मला मणक्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. MRI केल्यावर तिसऱ्या क्रमांकाचा मणका सरकला होता, तर चार, पाच आणि सहा क्रमांकचे मणके दबले होते.
 
डॉक्टरांनी तीन महिने आराम करायचा सल्ला दिला होता. या काळातही ट्रॅक्शन लाऊन मी दोन-दोन तास योग प्राणायाम करायचे. या काळात मला किंचितही वेदना झाल्या नाहीत, हे मला आवर्जून सांगायचं आहे.
 
केवळ योग साधनेमुळेच मी मेरूदंडाची किचकट शस्त्रक्रिया टाळू शकले. योग प्राणायामामुळे मानसिक बळ प्राप्त होतं तर योगासनानं शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते.
 
जून 2007मध्ये रामदेव महाराज यांच्या योग शिबिरात मी सहभागी झाले. मी जेव्हा योग करायला सुरुवात केली तेव्हा माझं वय 59 होतं. योग सुरू केल्यानंतर म्हणजे 59 ते 69 वयापर्यंतच्या 10 वर्षांच्या कलावधीत मला साधी सर्दी किंवा तापही आला नाही. या दरम्यान मी आंदोलनात सहभागी झाले, देशभर शिबिरं घेतली.
 
मला कुठल्याही टप्प्यावर थकवा जाणवला नाही, कधी नैराश्य आलं नाही. रोज योग करत असल्यामुळे एक उत्साह संचारला होता.
 
58व्या वर्षी माणूस निवृत्त्त होतो, पण माझं खरं कार्य 59व्या वर्षापासून सुरू झालं. हे सर्व काही योगा केल्यामुळे शक्य झालं. आज माझं वय 71 आहे, पण मला कसलाही त्रास जाणवत नाही. मी रोज योग करते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सत्तत प्रयत्नशील असते.
 
'मृत्यूचंही भय नाही'
योग केल्यामुळे काय होतं तर माणसाला कसलीही भीती वाटत नाही. मला आताच्या क्षणाला मृत्यूचंही भय उरलेलं नाही.
 
योग ही एक उत्तम विद्या आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते यामुळे साध्य होऊ शकतं. सर्व पालकांनी लहानपणापूसन आपल्या मुलांना योगाची गोडी लावली पाहिजे. भविष्यात चांगली पिढी घडवायची असेल तर मुलांना योगाची सवय लावणं ही पालकांनी जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे.
 
तरुणांनो, ईश्वरानं तुम्हाला जे शरीर दिलं आहे, ते चांगल्या कार्यासाठी वापरायचं आहे. ते रोगी करून, कुटुंबाला दुःखी करून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही नियमित योग केलात, तर तुमचं व्यक्तिमत्त्वही सुधारेल आणि तुम्हाला ठरवलेलं ध्येयही सहज गाठता येऊ शकेल.
 
योगामुळे तुम्ही आत्मस्पर्धा करायला सुरुवात करता, आत्मस्पर्धेमुळे आपल्याला नैराश्य येत नाही. योगामुळे आत्महत्या करण्याच्या इच्छेपासून माणूस परावृत्त्व होऊन आपोआप सदकार्याकडे वळू शकतो. यामुळे मनुष्य दीनदुबळा राहत नाही, सर्व संकटांवर मात करून तो पुढे सकरत असतो.
 
'वयाचं बंधन झाली'
सर्वांना माझं सांगणं आहे की, योग सुरू करण्याचं कुठलंही वय नाही. त्याचबरोबर योगासनं कुठेही व कधीही करता येतात. योगाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर मी सलग पाच वर्ष संपूर्ण रत्नागिरी जिल्हा पिंजून काढला. योगा घराघरात पोहोचवण्यासाठी सतत प्रवास केला.
 
माझा नियमित योग सुरूच होता. सध्या मी महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणीची सदस्य म्हणून कार्य करतेय. माझ्यावर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मी शिबिरं घेते आणि महिलांना योगामुळे होणारे फायदे सांगून त्यांनी योगाकडे प्रवृत्त करते.
 
योगामुळे शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, यश, संपत्ती आणि हवं असलेलं सर्व मिळू शकतं. योग प्राणायम केल्यानं मन शांत राहतं, तर योगासनं केल्यामुळे शरीर लवचिक होतं आणि त्यामुळे नियमित योग करावा.
 
एक तास योग केलात तर पुढचे 18 तास पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू शकता. योग केल्यामुळे तुम्ही भारताला महान बनवालच, तुम्ही स्वतःही महान बनाल.

रमा जयंत जोग