गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (07:56 IST)

सफर निसर्गरम्य बूंदीची

rajasthan bundi
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये  गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी. 

बूंदी शहराच्या सभोवताली अरवली पर्वतारांगा आहेत. या पर्वतारांगांच्या मधोमध वसलेलं बूंदी आपल्याला आकर्षित करतं. राजस्थानातली बरीचशी शहरं किल्ले आणि महालांसाठी प्रसिद्ध आहेत. पण बूंदी खास चित्रकलेसाठी ओळखलं जातं. इथल्या चित्रकलेला खूप प्राचीन इतिहास आहे. कलेची आवड असणार्‍यांना इथे सुंदर अशा चित्रकृती बघता येतील.

बूंदीमध्ये किल्लेही आहेत. इथला एक किल्ला दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. या किल्ल्याचा वरचा भाग तारागड म्हणून ओळखला जातो आणि खालच्या भागाला फक्त गड असं म्हणतात. 1242 मध्ये राव देवाजीने या शहराची स्थापना केली. बूंदा मीणा या सरदाराच्या नावावरून या शहराला बूंदी हे नाव पडल्याचं म्हटलं जातं. या शहरातलं हाथी पोल हे द्वार भव्यतेचं प्रतीक आहे. हे द्वार स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाही आहे. हे द्वार बूंदीतलं एक खास आकर्षण आहे. पावसाळ्यात या शहराचं सौंदर्य अधिकच खुलतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही इथे जाता येईल. कोटा शहरापासून बूंदी फक्त 35 किलोमीटरवर आहे. साधारण तासाभरात कोटाहून बूंदीला जातायेईल. त्यामुळे राजस्थानला   गेल्यावर बूंदीची सैर नक्की करा.
अभय अरविंद