गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (16:13 IST)

इथे लुटा हायकिंगचा आनंद

उत्तराखंड हे निसर्गाने नटलेलं सुंदर असं राज्य. उत्तराखंड धार्मिक पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे हिंदू धर्मियांची महत्त्वाची तीर्थस्थानं आहेत. यासोबतच इथे निसर्गाचा आनंदही लुटता येईल. भटकंतीदरम्यान काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर हायकिंगचा पर्याय आहे. उत्तराखंडमधली अनेक ठिकाणं हायकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. अशाच काही ठिकाणांविषयी...

* इथल्या चोपता या गावात काही काळ घालवता येईल. गर्दीपासून लांब निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर तुम्ही चोपताला जाऊ शकता. इथे हायकिंगची बरीच ठिकाणं आहेत.
* कुमाऊँ पर्वतरांगांमध्ये वसलेलं बिनसरही अनोखं आहे. हे स्थान समुद्रसपाटीपासून 2420 मीटरवर आहे. इथे हायकिंग करताना हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन करता येईल.
*चंपावत येथील बाणासूरच्या किल्ल्याला भेट देता येईल. बाणासुराच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा किल्ला बांधण्यात आला होता. बाणासूर हा बली या वानर राजाचा मुलगा होता आणि भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता, असं म्हटलं जातं. हा किल्ला हायकिंगचं परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
* मसुरीला जाणारे पर्यटक जॉर्ज एव्हरेस्ट हाउसपर्यंत हायकिंग करू शकतात. इथल्या गांधी मार्केटपासून या हाउसपर्यंत जायला सहा किलोमीटर अंतर कापावं लागतं. या ठिकाणाहून दून खोर्‍याचं मनोहारी दर्शन घडतं. मग काय, काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर उत्तराखंडला जायला हरकत नाही.
सुहास साळुंखे