सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (13:29 IST)

रणकपूरचे जैन मंदिर

अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ उदपूरपासून 85 कि.मी. अंतरावर मघाई नदीच्या काठावर पंधराव्या शतकातील संगमरवरातील एक शिल्पकाव्य 'शांति आणि पवित्रता' यांचा संदेश देत उभे आहे. 'कला कलेसाठी' या सिद्धांताला छेद देत 'कला जीवनासाठी' या सिद्धांताचा दृष्टांत हे महातीर्थ देत. भारतीय वास्तुकला पंधराव्या शतकात किती उच्च कोटीला पोहोचली होती आणि या भूमीतील वास्तुरचनाकार किती सिद्धहस्त होते, याचे प्रमाण म्हणजे रणकपूरचे जैन मंदिर होय.
 
या मंदिरासमोर उभे राहिले की, सर्वप्रथम नजरेत भरते ती भव्यता. अंदाजे 30 फूट उंच पाषाणावर मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. 48 हजार स्क्वेअर फूट जागेवर निर्मिेले हे शिल्प 1444 खांबांचे आहे. यातील प्रत्येक खांबावर अप्रतिम सूक्ष्म कला कुसर असून प्रत्येक खांब वेगळा आहे. मंदिराला चार दरवाजे आहेत. गर्भगृहात चार दिशांना दर्शन देणार जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ किंवा ऋषभदेव यांच्या 72 इंच उंचीच्या चार प्रतिमा विराजमान आहेत.
दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरही अशाच चार दिशांना दर्शन देणार्‍या प्रतिमा आहेत. म्हणून या चैत्यासस 'चौमुखा जिनप्रसाद' या नावात ओळखले जाते. जिन म्हणजे जिंकणारा आणि इंद्रियावर विजय  मिळविणारा तो जैन.
 
76 छोटी मंदिरे, घुमट आणि शिखरांनी बनवलेली चार मोठी मंदिर चारदिशांना चार महाप्रसाद जशी एकूण 84 मंदिर या महाप्रांगणात आहेत. या रचनेविषयी भारतातील एक पुरातत्त्ववेत्ता 'जेम्स फर्ग्युसन' म्हणतात की, प्रत्येक विभागाचे वैविध्य, त्यांच्या रचनेतील सौंदर्य हे 1444 खांब असूनही वेगवेगळे आणि स्वर्गीय आहे. वेगवेगळ्या उंचीवरील घुमट आणि शिखरे यांचा समतोल, छताशी घातलेला मेळ आणि प्रकाशाच्या  प्रवेशासाठी केलेली योजना हे सर्व मिळून एक अप्रतिम प्रभाव निर्माण करतात.
 
विशेष म्हणजे 1444 खांबांधून मूर्तीचे दर्शन कुठूनही व्यवस्थित होते आणि पूर्ण मंदिरात आल्हाददायक वातावरण निर्माण करते. पंधराव्या शतकात राणा कुम्भ यांच्या   मंत्रिमंडळात मंत्री धरणाशाह होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्याच काळात आचार्य सोमसुंदर सुरी हे प्रभावशाली जैन आचार्य होते. धरणाशाह आचार्यांच्या उपदेशाने प्रभावित झाले आणि त्यांनी तरुणवातच अनेक धार्मिक व्रते अंगिकारिली. त्यांच्या म मनात भगवान ऋषभदेव यांचे भव्य मंदिर बांधावे, अशी भावना जागृत झाली आणि त्यंनी ती पूर्णत्वाला नेली.
म. अ. खाडिलकर