शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जून 2018 (15:18 IST)

हिरण्यकेशीचा उगम

आजर्‍यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा रस्ता दाट जंगलाच्या दिशेने जातो. साधारणतः 3 किलोमीटरचा रस्ता संपला की, छोट्या साकवावरून पलीकडे जावं लागतं. तिथून गेलं की, हिरण्यकेशी मंदिरासह याच नावाने प्रचलित असलेल्या नदीच्या उगमाची भेट होते. तुम्ही पावसाळ्यात गेला तर मन प्रसन्न करणारी सफर तुम्ही नक्कीच अनुभवता.
 
सावंतवाडीपासून 35 कि.मी. वर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेला परिसर. कोणत्याही ऋतूत एक-दोन दिवस निसर्ग सान्निधत घालविणसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. हंगामात दणदणीत पाऊस तुमचे मन मोहून घेतो. जून ते ऑक्टोबरदरम्यान 750 सें.मी.च्या आसपास पाऊस पडतो. एखाद्या सफारीत धुक्याची दुलई पसरलेली दिसेल. क्षणात धुकं आणि क्षणात लखलखीत हिरवाईचा नजारा पाहायला मिळतो.
 
आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हिरण्याकेशी हे एक आहे. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीत्या भेटीला येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. मुख्य रस्तपासून साधारण 3 कि.मी. अंतर आतमध्ये जावे लागते. वाटेत छोटी दोन गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता उंचसखल आणि वळणावळणाचा. रस्ता संपला की, पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेल्या पायवाटा. तिथे गाडी थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढे जायचं. लोखंडी साकव पार केला की, एकदम पेव्हिंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. चार पायर्‍या चढून गेल्यावर हिरण्यकेशी देवीचे मंदिर दिसू लागते.
मंदिरगुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्याने सदोदित भरलेले असते.
 
शेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्रोत पूर्वाभिमुख आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेशते. रातीर्थाजवळून गावं गावं ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.
 
म. अ. खाडिलकर