गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (14:14 IST)

आफ्रिकेतला छोटासा देश : बुरुंडी

'बुरुंडी' हा आफ्रिकेतला छोटासा देश. 'बुजुंबरा' ही या देशाची राजधानी. जगातल्या खूप गरीब देशांमध्ये बुरुंडीची गणना होते. 'किरुंडी' आणि 'फ्रेंच' या इथल्या अधिकृतभाषा. आकाराने छोटा असलेला बुरुंडी चारही बाजूंनी जमिनीने वेढला आहे. टांझानिया, कांगो आणि आरवंडा हे या देशाचे शेजारी. या देशाच्या इतिहासात डोकवायचं तर आपल्याला पंधराव्या शतकात जावं लागेल. या काळात बुरुंडीवर 'एमवानी' नावाच्या राजाचं राज्य होतं. संपूर्ण देश एमवानीच्या अधिपत्याखाली होता. शेतात राबणारे शेतकरी राजाला शेतसारा द्यायचे. त्या बदल्यात राजा त्यांचं रक्षण करायचा. 1856 मध्ये इथे युरोपियन लोकांचं आगमन झालं. पण तेव्हा कोणी बुरुंडीवर राज्य केलं नाही. 1899 मध्ये जर्मनीने या देशाचा ताबा घेतला. 1916 मध्ये इथे बेल्जियमची सत्ता आली. एक जुलै 1962 रोजी बुरुंडी स्वतंत्र झाला. यानंतरही या देशात स्थैर्य नव्हतं. 1990 च्या दशकात बुरुंडीमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. देशातले दोन गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. बुरुंडीतल्या हुतुस आणि तुटसी या गटांमध्ये बरीच अशांतता निर्माण झाली. हे युद्ध 2006 मध्ये संपलं. यात दीड लाख लोक मारले गेले. आज बुरुंडी काही प्रमाणात सावरलं आहे. या देशाचा बराच मोठा भाग डोंगराळ आहे. पूर्व भाग पठारी असून काही भाग सपाट आहे. इथे थोडे फार उद्योग आहेत. या देशात ब्लँकेट, बूट, साबण तयार होतात. अन्नावर प्रक्रिया करण्याचे उद्योगही आहेत. कॉफी, कापूस, चहा, मका, रताळी, केळी इथे पिकवली जातात. कॉफी, चहा, साखर यांची निर्यात केली जाते तर पेट्रोलियम पदार्थ, काही अन्नपदार्थ आयात केले जाते.