मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (23:03 IST)

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.ते मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते.त्यांच्या देशमुखी वर्तनामुळे देशमुख हे आडनाव मिळाले.गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्या कडे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता.त्यांनी या विषयावर एकूण 10 पुस्तके लिहिली आहे त्यांना संस्कृत,फारसी,हिंदी,गुजराती भाषेचे चांगले ज्ञान होते.इंग्रजी शिक्षण घेणारे 19 व्या शतकातील पहिले नवशिक्षित गोपाळ हरी होते.त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचाअभ्यास केला.वयाच्या 21व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले.सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत या साठीची त्यांची तळमळ होती.
लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधली पाहिजे.असे त्यांना वाटायचे.अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगायचे.
 लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती,अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा,असे त्यांचे स्पष्ट विचार होते आणि ते तसे त्यांनी मांडले देखील.
समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे सर्वांसाठी  महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे असे त्यांना वाटत असे.
आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली.
लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं. 9ऑक्टोबर1892 रोजी त्यांचे निधन झाले.
 
त्यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे 39 ग्रंथ लिहिले.लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते.जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.लोकहितवादी हे हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.भारतखंड पर्व,पाणीपत ची लढाई,हिंदुस्थानाचा इतिहास,गुजरात देशाचा इतिहास,लंकेचा इतिहास,सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास,हे काही त्यांची साहित्ये आहेत.
सामाजिक कार्ये-
गोपाळ हरी देशमुखांनीपुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. ते गुजरातमधील अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी देखील होते.त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता.त्यांनी आर्यसमाज पंथाचा स्वीकार केला होता.समाजातील बालविवाह, हुंडाप्रथा आणि बहुपत्नीकत्व या वाईट प्रथांवर त्यांचा विरोध होता.त्यांनी अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना केली.
हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य केले.
गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना सुरु केला.
गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन केले.
गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत केली.
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग असे काही सामाजिक कार्ये केले.
पुरस्कार -
दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना ब्रिटिश शासनाने राव बहादूर ही पदवी देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि राव बहाद्दूर या पदवीने गौरवान्वित केले.
त्यांना ब्रिटिश सरकार ने फर्स्ट क्लास सरदार म्हणून मान्यता दिली.