सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (16:08 IST)

अभिनेत्री महिमा चौधरीच्या चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे

अनुपम यांनी महिमाचा व्हीडिओ शेअर केला .या व्हीडिओत महिमा चौधरी सांगते की अनुपम खेर यांनी एका प्रोजेक्टमध्ये काम करायला त्यांना बोलावलं आणि मग महिमा चौधरींनी अनुपम खेर यांना तिच्या आजाराची माहिती दिली. हे सांगताना महिमा चौधरी भावूक झाली.अनुपम खेर यांनी महिमा चौधरींला कॅन्सरशी लढणारी हिरो म्हटलं.
 
महिलांना मिळेल प्रेरणा
अनुपम यांनी महिमाचा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, "मी एक महिन्या आधी माझ्या 525 व्या चित्रपटासाठी महिमा चौधरीला विचारणा केली. तेव्हा मी अमेरिकेत होतो. आम्ही छान बोललो आणि तेव्हा मला कळलं की ती स्तनांच्या कॅन्सरशी झुंज देत आहे. आयुष्य जगण्याची तिची पद्धत अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते."
 
1990 मध्ये मिस इंडिया ची विजेती.
परदेस चित्रपटात गंगा ही भूमिका निभावणाऱ्या महिमा चौधरीला विसरणं सहजासहजी शक्य नाही. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1973 ला दार्जिलिंगमध्ये झाला. तिने डाऊन हिल स्कुलमधून शिक्षण घेतलं. पुढचं शिक्षण लोरेटो कॉलेज दार्जिलिंगमधून पूर्ण केलं.
 
1990 मध्ये तिने शिक्षण सोडून मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीच्या काही काळासाठी तिने मॉडेल म्हणून काम केलं. त्या ऐश्वर्या राय बरोबर पेप्सीच्या एका जाहिरातीत होत्या. 1990 मध्ये त्या मिस इंडियाच्या विजेती होती.
 
सुभाष घई यांनी दिला मोठा ब्रेक
सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक म्युझिक चॅनेलमध्ये वीजे म्हणून काम केलं. सुभाष घईंनी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि हिरोईन म्हणून त्यांना घेण्याचा विचार पक्का केला. 1997 मध्ये आलेल्या परदेस चित्रपटात महिमाला ब्रेक दिला. या चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला.
 
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्या दाग द फायर चित्रपटात दिसली. त्यानंतर तिने अनेक आव्हानात्मक भूमिका केल्या. लज्जा चित्रपचटात ती एका दमदार भूमिकेत होती. हुंड्यांसाठी लग्न मोडूनसुद्धा वडिलांचा स्वाभिमान तिने या चित्रपटात जपला होता. त्यानंतर ये तेरा घर ये मेरा घर, दिल है तुम्हारा, धडकन, कुरुक्षेत्र, बागबान सारख्या चित्रपटात तिने काम केलं. 2016 मध्ये बंगाली क्राईम थ्रिलर डार्क चॉकलेट मध्येही तिने काम केलं.
 
लिएंडर पेस वर प्रेम
महिमा चौधरीने पहिलाच चित्रपट परदेस ने अनेकांच्या मनात महिमाचं स्थान निर्माण केलं. मात्र तिच्या मनात स्थान निर्माण केलं ते लिएंडर पेस ने. टेनिसपटू लिएंडर पेस आणि महिमा एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर लिएंडर पेसची अभिनेत्री रिया पिल्लेशी जवळीक वाढली आणि या नात्याचा महिमा संपला.
 
लग्न आणि घटस्फोट
महिमाने 2006 साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. तिचं नाव एरियाना आहे. 2013 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2011 पर्यंत त्यांचं सगळं सुरळीत होतं. मात्र त्यांच्यात मतभेद होते. महिमाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचं आणि तिच्या नवऱ्याचं अजिबात पटत नव्हतं. या लग्नात ती आनंदी नव्हती. कठीण दिवसात नवऱ्याने साथ दिली नाही असा महिमाचा दावा होता.
 
महिमा आता त्यांची मुलगी एरियाना बरोबर राहते. घटस्फोटानंतर तिने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.
 
... आणि तो अपघात
1999 मध्ये प्रकाश झा यांच्या दिल क्या करे या चित्रपटात ती काम करत होती. तेव्हा ती बंगळूरूला होती. एक दिवस शूटिंगला जाताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. ती इतकी जोरदार होती की कारच्या काचा फुटून तिच्या चेहऱ्यात घुसल्या. ती जिवंत राहील की नाही अशी परिस्थिती होती.
 
एका मुलाखतीत तिने सांगितलं की हा अपघात झाल्यानंतर कोणीही हॉस्पिटलमध्ये नेत नव्हतं. कसंबसं ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा तिथे अजय देवगण आणि तिची आई आले. जेव्हा तिने आरशात बघण्यासाठी चेहरा पाहिला तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. तिच्या चेहराभर टाके होते. जेव्हा डॉक्टरांनी सर्जरी केली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काचेचे 67 तुकडे होते.
 
या अपघातानंतर तिला स्वत:कडे प्रचंड लक्ष द्यावं लागलं. तिला सूर्यप्रकाशात येण्यासाठी मनाई होती. तिच्या खोलीत अंधार असायचा. याचं कारण असं की तिच्या चेहऱ्यावर उजेड, UV किरणं येऊ नयेत याची खबरदारी तिला घ्यावी लागली. तिचा चेहराही अनेक दिवस ती पाहत नव्हती.
 
जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट होते. तिचा चेहरा खराब झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. या अपघाताने ती पूर्ण खचली. तरी तिने धीर सोडला नाही. या आघातातून सावरायला तिला खूप वेळ लागला.
 
अपघातानंतर अजय देवगणने महिमाची साथ सोडली नाही. अजय तिला भेटायला जात असे. अजय देवगण ने तिला त्याच्या एका चित्रपटात कामंही दिलं. मात्र तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. मग महिमाने चित्रपट क्षेत्रातून संन्यासच घेतला.
 
आता कॅन्सरच्या रुपात तिच्यावर आणखी संकट आलं आहे. या संकटालाही ती नक्कीच तोंड देईल.