14 वर्षांनंतर 'बंटी और बबली'चा येणार सीक्वल
अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांचा चित्रपट 'बंटी और बबली' 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटातील ऐश्र्वर्या राय बच्चनवर चित्रित झालेलं गाणं कजरा रे आजही रसिकांच्या ओठांवर रुळताना पाहायला मिळतं. या गाण्यात ऐश्र्वर्यासोबत अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले होते. आता 14 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याबाबत बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंटी और बबलीच्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चनऐवजी सैफ अली खान व राणी मुखर्जी हीजोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
स्पॉटबॉयच्या माहितीनुसार, सैफ अली खानने अभिषेक बच्चनच्या जागी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर राणी मुखर्जी व सैफ अली खान या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील आठवड्यात बनारस व बुलंदशहरमध्ये सुरूवात करणार आहेत. सैफ व राणी यांनी यापूर्वी हम तुम, तारा रम पम आणि थोडा प्यार थोडा मॅजिक या चित्रपटात काम केलं आहे. ते दोघे जर एकत्र काम करणार असतील तर तब्बल 11 वर्षांनी एकत्र येणार आहेत. बंटी और बबलीच्या सीक्वलची निर्मिती यशराज फिल्म्स करणार आहे. बंटी और बबली चित्रपटाच्या सीक्वलची अधिकृतरीत्या घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.