सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (12:07 IST)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : मनिष भानुशाली, किरण गोसावी हे स्वतंत्र साक्षीदार, NCB चे स्पष्टीकरण

आर्यन खानला ज्या रेडमध्ये ताब्यात घेण्यात आलं त्या रेडमध्ये NCB बरोबर भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
 
त्यानंतर आता NCB ने पत्रकार परिषद घेऊन मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हे स्वतंत्र साक्षीदार होते असं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
2 ऑक्टोबर रोजी NCB ने कॉर्डिला क्रुझवर छापा मारला त्यात आठ जणांना अटक करण्यात आली. NCB च्या टीमसोबत काही स्वतंत्र साक्षीदार होते त्यापैकी मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हजर होते असं NCBचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
NCB ने केलेली कारवाई ही कायदेशीर होती. त्यानुसारच स्वतंत्र साक्षीदारांना बरोबर नेण्यात आलं होतं. त्यानुसारच काही साक्षीदार आमच्याबरोबर होते, असं सिंह म्हणाले.
 
आमच्या संघटनेवर लावण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असं NCB ने म्हटलं आहे.
 
 
मुंबईजवळ एका क्रुझवर छापा टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCBकडून (Narcotics Control Bureau) ताब्यात घेण्यात आलं होतं.
 
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर मध्यरात्री छापा टाकला होता.
 
या कारवाईचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या फोटोमध्ये भाजपाचा मनिष भानुशाली हा कार्यकर्ता दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे.
 
ज्या व्यक्तीबाबत नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत त्या व्यक्तीने आपण त्या रात्री NCB सोबत होतो असं म्हटलं आहे.
 
मनिष भानुशालींने मान्य केलं आहे की फोटोत दिसणारी व्यक्ती आपणच आहोत.
 
"मी फक्त माझ्याकडे जी माहिती आहे ती एनसीबीली दिली. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कुठेही देशविघातक काम होत असेल तर ते रोखा असे आम्हाला संस्कार आहेत.
 
"केवळ देशाच्या फायद्याचा विचार करून मी त्या ठिकाणी हजर होतो. मी रेड टाकली नाही फक्त मी अधिकाऱ्यांसोबत गेलो," असं स्पष्टीकरण मनिष भानुशाली यांनी दिलं आहे.
 
आपण भाजपचे सामान्य कार्यकर्ते आहोत अशी कबुली भानुशाली यांनी एबीपी माझाला फोनवरुन बोलताना दिली आहे.
 
"क्रूझवर एक पार्टी होणार आहे अशी माहिती माझ्या हाती आली तेव्हा मी ती एनसीबीला दिली. माझं स्टेटमेंट घ्यायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो," असं भानुशाली यांनी सांगितलं.
 
नवाब मलिक काय म्हणाले?
मुंबईत NCBने 3 ऑक्टोबर रोजी मुंबई - गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे.
 
मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे.
 
तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही NCBचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे.
 
मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली, याचे उत्तर NCBने दिले पाहिजे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
 
नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "या छाप्यानंतर पकडलेल्या लोकांना एनसीबी आपल्या कार्यालयात नेल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्याचं दिसत होतं. आर्यन खानला एक व्यक्ती घेऊन जाताना फोटो प्रसिद्ध झाला आहे. ती व्यक्ती NCBची अधिकारी नसल्याचं NCBनं स्पष्ट केलं आहे. मग NCBचा या व्यक्तीशी काय संबंध आहे"
 
या व्यक्तीचं नाव K. P. गोसावी असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.
 
याबरोबरच मलिक यांनी अरबाज मर्चंटला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबद्दलही प्रश्न उपस्थित केला. "अरबाज मर्चंटला नेणाऱ्या व्यक्तीचं नाव मनिष भानुशाली असून तो भाजपाचा पदाधिकारी आहे,", असा आरोप मलिक यांनी केला.
 
"त्याच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आणि अनेक भाजपा नेत्यांबरोबर फोटो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
फोटोतील व्यक्ती आपणच आहोत असं मनिष भानुशालीने सांगितलं.
 
मनिष भानुशाली काय म्हणाले?
बीबीसीने मनीष भानुशाली यांच्याशी संपर्क केला. नवाब मलिकांच्या आरोपांवर त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
 
"मी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मला मिळालेली माहिती मी अधिकाऱ्यांना दिली होती," असं भानुशाली म्हणाले.
 
प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत भानुशाली यांनी ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचं मान्य केलं होतं.
 
"नवनवी नावं येत होती, मी माहिती एनसीबीकडे शेअर करत होतो. त्यांनी कारवाई चालू केली. कारवाई संपल्यावर माझी साक्ष नोंदवायची होती, म्हणून त्यांच्यासोबत बसून गेलो, विटनेस म्हणून सही करून परत आलो," असं ते म्हणाले.
 
अमली पदार्थाचे फोटो कोठे काढले?
सध्या के. पी. गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
 
भानुशाली हा 21 आणि 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. 21 सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते.
 
त्यानंतर 28 तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता?
 
मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
 
"क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो देखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हीडिओ का नाही काढले गेले?" असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
 
सुशांतसिंह प्रकरणाचा उल्लेख
एनसीबीच्या कारवाईवर बोलताना नवाब मलिक यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचाही उल्लेख केला.
 
ते म्हणाले, "सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देखील एनसीबीचे कार्यालय चर्चेत आले होते. त्यावेळी देखील बॉलिवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. सेलिब्रिटींना त्यात दाखवून बॉलिवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे, हे दाखविण्यात आले."
 
आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरु असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
 
"आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे" असं मलिक म्हणाले.
 
भाजपचं प्रत्युत्तर
एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या नवाब मलिकांना भाजपाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.
 
नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई होत असल्यामुळे ते या पद्धतीचे आरोप NCBवर करत असल्याचं दरेकर म्हणाले. मनिष भानुशाली नावाच्या व्यक्तीला भेटल्याचं आठवत नाही असंही ते म्हणाले.
 
सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही जातो तेव्हा अनेकजण फोटो काढले जातात. प्रत्येकाची तपासणी करता येत नाही. NCBवर थेट शंका उपस्थित करणं योग्य नाही, असं दरेकर म्हणाले. साप म्हणत भुई धोपटायचं हा मलिकांचा जुना प्रकार आहे. आपल्या जावयावर कारवाई होत असल्यामुळे NCBच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.