शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (21:27 IST)

करण जोहरचा 'कॉफी विथ करण' शो घेणार निरोप? 'हे' एपिसोड ठरले होते वादग्रस्त

करण जोहर सूत्रसंचालन करत असलेला 'कॉफी विथ करण' हा शो बंद होणार आहे. स्वतः करण जोहरने याबाबत ट्वीट करून त्याची घोषणा केली.
 
'कॉफी विथ करण' हा शो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. करणने आपल्या सूत्रसंचालनातून या कार्यक्रमाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
 
विशेषतः सेलिब्रिटींचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, सध्याच्या मुद्द्यांवर त्यांचं मत या गोष्टींवर 'कॉफी विथ करण' कार्यक्रमाची रुपरेषा आधारलेली होती. 'कॉफी विथ करण'मध्ये सेलिब्रिटींनी केलेली वक्तव्ये अनेकवेळा वादग्रस्त ठरून त्याच्या अनेकवेळा बातम्याही व्हायच्या.
 
शोमधील वक्तव्यांवरून 'कॉफी विथ करण' तसंच सूत्रसंचालक करण जोहर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही व्हायची. पण तहीही शोला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली होती.
कॉफी विथ करण'चे आतापर्यंत 6 सीझन प्रदर्शित झाले होते.
 
'कॉफी विथ करण' शो बंद होत असल्याची घोषणा करताना करण म्हणाला, "हॅलो, 'कॉफी विथ करण' हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा भाग राहिला आहे. याचे आता 6 हंगाम झाले आहेत. हा कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याला भारतीय पॉप इंडस्ट्री संस्कृतीत वेगळं स्थान मिळालं. पण अतिशय जड अंतःकरणाने मी हा शो बंद होत असल्याची घोषणा करत आहे. 'कॉफी विथ करण' आता पुन्हा परतणार नाही."
 
अर्थात, यामध्ये ट्विस्ट असल्याचं ट्वीट करण जोहर यानं केलं आहे.
 
'कॉफी विथ करण' टेलिव्हिजनवरून निरोप घेत आहे. मात्र या कार्यक्रमाचा सातवा सीझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत आहे, असं करण जोहरनं म्हटलं आहे.
देशातील मोठ्ठे फिल्म स्टार्स या कार्यक्रमात हजेरी लावतील, काही सिक्रेटस उघड करतील असंही करणनं त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
हार्दिक पांड्याचं 'ते' वक्तव्य आणि करणची माफी
करण जोहर यांच्यावर वेळोवेळी होणाऱ्या टीकेमागे ते सूत्रसंचालन करत असलेल्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमाचा मोठा हात आहे.
 
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल तसंच महिलांबद्दल मतं व्यक्त केली. हार्दिक आणि भारतीय संघातील त्याचा मित्र क्रिकेटपटू लोकेश राहुल हे दोघे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा हार्दिकने या कार्यक्रमादरम्यान केला. माझ्या घरचे पुढारलेल्या विचारांचे आहेत. स्वत:च्या व्हर्जिनिटीबद्दलही आईवडिलांना सांगितलं आहे, असा खुलासा हार्दिकने केला.
 
मात्र, या कार्यक्रमानंतर महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल हार्दिक पंड्या, के. एल. राहुल आणि करण जोहर यांच्यावर संपूर्ण देशांतून टीका झाली. पांड्या आणि राहुल यांना बीसीसीआयने निलंबितही केलं. अखेर त्या दोघांना माफी मागावी लागली.
 
करण जोहरनेही या प्रसंगानंतर आपल्याला कार्यक्रमात त्यांच्याकडून असं काही वक्तव्य केलं जाईल याची माहितीही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, माझ्या कार्यक्रमात असा प्रकार घडल्याने मी माफी मागतोय असंही तो म्हणाला होता. करणने माफी मागितल्यावर या प्रकरणावरचा पडदा पडला मात्र, आजही यावरून त्याच्यावर टीका होतेय.
 
कंगनानं जेव्हा करणला 'मुव्ही माफिया' म्हटलं होतं...
कॉफी विथ करणच्या अशाच एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगना रणौत हीने करणनेच तिला इंडस्ट्रीमध्ये अॅटीट्यूड दाखवल्याचं म्हटलं. यावेळी भविष्यात जर तिच्यावर चरित्रपट करण्यात आला तर त्यात 'मुव्ही माफिया'ची भूमिका करण जोहर बेतलेली असेल. तसंच, बॉलीवूडमध्ये बाहेरून आलेल्यांबद्दल असहिष्णू वागणाऱ्याची ही भूमिका असेल असंही कंगना म्हणाली होती.
कंगणाने थेट अशी टीका केल्यानंतर करणला तिची तिथेच माफीही मागावी लागली. करण जोहर घराणेशाहीचा समर्थक असल्याचं कंगणाने तेव्हा म्हटल्यावर बॉलीवूडमधली घराणेशाही तेव्हा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
 
मीरा कपूरने घेतली होती करणची विकेट
अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनीही एकदा 'कॉफी विथ करण'च्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा भाग म्हणून करणने काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
 
मात्र, यातला रँक इन ऑर्डर ऑफ टॅलेंटचा प्रश्न मिरानेच करणला विचारला. तिने यात अभिनेत्यांच्या यादीत अनेक अभिनेत्यांची नावं घेतली आणि शाहीदचं नाव टाळलं.
 
यावर शाहीदने तिला त्याचं नाव का नाही घेतलं असा प्रश्न केला. यावर करण त्याच्या कोणत्याच कार्यक्रमात तुला पसंती देत नसल्याचं शाहीदला सांगितलं. यावर करणला आश्चर्यचकीत होण्यापलिकडे काही करता आलं नाही.
 
यावेळी मीराने करणला घराणेशाहीवरूनही चिमटे काढले होते.
 
सोनम-दीपिकानं उडवली होती रणबीर कपूरची खिल्ली
'कॉफी विथ करण'च्या तिसऱ्या सीझनमध्ये सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यावेळी दीपिका आणि रणबीर कपूरचं नातं तुटल्याच्या चर्चा होत्या. दीपिकानं यावेळी जी वक्तव्यं केली होती, त्यावरून रणबीरबद्दलचा तिचा कडवटपणा स्पष्ट होत होता. सोनमनंही रणबीरवर निशाणा साधला होता.
 
रणबीरनं कंडोमचा प्रचार करायला हवा, असं दीपिकानं म्हटलं होतं. त्यानं आपल्या 'बॉयफ्रेंड स्कील्स'वर काम करण्याची गरज असल्याचा टोलाही दीपिका-सोनमनं लगावला होता.
 
या एपिसोडनंतर दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी या एपिसोडवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
 
प्रियंका चोप्रा आणि करीना कपूरमधला वाद
'कॉफी विथ करण'च्या तिसऱ्या सीझनमध्ये करीना कपूरनं प्रियंका चोप्राच्या इंग्लिश अॅक्सेंटवर टिप्पणी केली होती. तिनं हा अॅक्सेंट कुठून आणलाय, असं करिनानं म्हटलं होतं.
 
नंतर जेव्हा प्रियंका या शोमधल्या एका एपिसोडमध्ये आली होती, तेव्हा तिनेही करिनाच्या त्या टोल्याला लक्षात ठेवून प्रत्युत्तर दिलं होतं. 'जिथून करिनाच्या बॉयफ्रेंडनं हा अॅक्सेंट शिकलाय, तिथूनच मी पण शिकलीये' असं प्रियंकानं म्हटलं होतं. करिना कपूर आणि सैफ अली खान तेव्हा एकमेकांना डेट करत होते.
 
अर्थात, यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि सहाव्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये या दोघीही पाहुण्या म्हणून एकत्र आल्या होत्या.