बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गुजरातमध्येही ‘पद्मावती’ प्रदर्शित होणार नाही

मध्यप्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होणार नाही. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी घोषणा केली आहे. चित्रपटाला होत असलेला तीव्र विरोध आणि पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
‘चित्रपटाचे कथानक आणि त्यातील काही दृष्यांवरून वाद सुरु आहेत. राजपूत संघटनांनी याला विरोध केला आहे. निवडणुका जवळ आल्याने आम्हाला कोणतेही वाद नकोत. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न मोठा आहे. म्हणूनच ‘पद्मावती’ चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रुपानी म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले. ‘आम्ही इतिहासाची मोडतोड करू देऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमचा विरोध नाही, पण आपल्या संस्कृतीशी छेडछाड केल्याचे खपवून घेतले जाणार नाही,’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले.