1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (12:51 IST)

भन्साळींच्या आगामी चित्रपटात रणवीरऐवजी हृतिक?

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा सर्वात आवडता अभिनेता रणवीर सिंह असून भन्साळी यांनी रणवीरसोबत आतापर्यंत तीन चित्रपट केले. हे तिन्ही चित्रपट तुफान गाजले. भन्साळी यांनी रणवीरला 'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि त्यानंतर 'पद्मावत' या तिन्ही चित्रपटात संधी दिली. या संधीचे रणवीरने सोने केले. बॉक्स ऑफिसवर या तिन्ही चित्रपटांनी कोट्यवधींचा गल्ला कावला. दीपिका- रणवीर ही भन्साळींची जोडी हिट ठरली पण, आता भन्साळींच्या आगामी चित्रपटात ही जोडी दिसणार नाही. भन्साळी 'पद्मावत'च्या दमदार यशानंतर लवकरच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणार आहेत. भन्साळी यांनी या चित्रपटात रणवीरच्या नावाऐवजी हृतिकच्या नावाचा विचार केला असल्याचे वृत्त आहे. रणवीरऐवजी हृतिक या चित्रपटासाठी सर्वोत्तम ठरू शकतो अशी आशा भन्साळींना आहे म्हणूनच या चित्रपटासाठी हृतिकला त्यांनी गळ घातली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिकनेही या चित्रपटासाठी लागलीच होकार भरला असल्याचेही म्हटले जात आहे. भन्साळींच्या 'गुजारिश' चित्रपटात हृतिकने मुख्य भूमिका साकारली होती. तूर्तास या चित्रपटाचे नाव 'प्रिन्स' असे निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. अर्थात हृतिक नावावरून या चित्रपटात एखादी ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.