रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (08:51 IST)

इतनी शक्ती हमे देना दाता’ या गाण्याच्या गायिका पुष्पा पागधरे अत्यंत बिकट परिस्थितीत सरकारकडे मदतीची याचना

‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे आजही अनेकांच्या तोंडीपाठ आहे. अजरामर असे हे गीत अनेकांच्या हृदयात आणि मनात कायम आहे. एवढेच नाही तर हे गाणे अनेक शाळांमध्ये प्रार्थनेच्या स्वरुपात गायले जाते.हे गाणे गाणाऱ्या पुष्पाबाई पागधरे सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. कारण, हे गाणे गाण्यासाठी त्यांना अवघे २५० रुपये मानधन मिळाले होते. अद्यापही त्यांना रॉयल्टी मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.

परंतु काहीवेळा तर एकेकाळी वलयांकित असलेल्या कलाकाराला उतारवयात हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागते. अशीच काहीशी स्थिती एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या गायिकेची झाली असून त्या गायिकेचे नाव पुष्पा पागधरे असे आहे.एकेकाळी ‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता ‘ हे गाणे गाऊन प्रसिद्धी मिळवलेल्या गायिका पुष्पा पागधरे या सध्या आर्थिक संकटात असून त्याची परिस्थिती बिकट आहे. ८० वर्षीय गायिका पुष्पाबाई यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार रुपयांच्या पेन्शन तथा कलाकार मानधन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

एवढेच नाही तर पुष्पाबाई यांना ‘इतनी शक्ती हमे देना दाता ‘ या गाण्यासाठी रॉयल्टी न मिळाल्याने त्या नाराज आहेत. त्याच्या गाण्यांची दृश्ये कोटींमध्ये आहेत. मात्र गायिकेला रॉयल्टी मिळाली असती तर तिला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. याबद्दल त्या म्हणाल्या की, मला माझ्या गाण्यांसाठी योग्य रॉयल्टी सुद्धा मिळाली नाही. मी पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे.परंतु सरकारऐवजी नातेवाईकांनी मला मदत केली आहे. इतमी शक्ती हमे देना या गाण्याचे संगीतकार कुलदीप सिंग आहेत. पुष्पाबाईंनी मोहम्मद रफींसोबतही गाणे गायले आहे. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी लिहिलेली गाणी देखील गायली आहेत.

सध्या त्यांचा संगीत उद्योगातील कोणत्याही कलाकाराशी संपर्क नाही.पुष्पा पागधरे यांचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथे झाला असून त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील सातपाटी असून त्यांच्या वडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे सोपे नव्हते. पुष्पाबाईंच्या वडलांचे मनोर, वाडा येथे भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पा वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.

पुषा पागधरे यांना हे गाणे जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांसमोर म्हणायची संधी मिळाली. पुष्पा पागधरे यांना ‘बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही’ (ज्योतिबाचा नवस),‘रुसला का हो मनमोहना’ (आयत्या बिळात नागोबा) या दोन गाण्यांसाठी पार्श्वगायनासाठीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तसेच २०१७ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार देखील मिळाला आहे. परंतु सध्या त्या निराधार अवस्थेत बिकट आर्थिक परिस्थितीत जीवन व्यतीत करीत आहेत.