शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (18:08 IST)

‘सा रे ग म प’ कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांची फेरनियुक्ती; स्पर्धकांच्या ऑनलाइन ऑडिशन्स जोरात सुरू!

गुणवान गायकांचा शोध घेणारा भव्य कार्यक्रम पुन्हा एकदा टीव्हीवर येणार; देशभरातील इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन ऑडिशन्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन गेल्या 25 वर्षांची देदिप्यमान परंपरा पुढे नेताना ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ या गुणवान गायकांचा शोध घेणार््या कार्यक्रमाने या क्षेत्रातील काही नामवंत गायकांना जगापुढे आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू ठेवला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाने श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, कमल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे यासारख्या आज दिग्गज पार्श्वगायक बनलेल्या कलाकारांना प्रेक्षकांपुढे आणले आहे. गतवर्षीच्या ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या दणदणीत यशानंतर ‘झी टीव्ही’ने आता पुन्हा एकदा आपला आजही सर्वाधिक लोकप्रिय ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. देशभरातील होतकरू गायकांना या कार्यक्रमामुळे आपली कला जनतेसमोर सादर करण्याची फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या होतकरू गायकांना आपली कला सादर करून भविष्यात या क्षेत्रातील नामवंत पार्श्वगायक बनण्याची संधी देण्यासाठी हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी या दोन नामवंत संगीतकारांची या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
 
आपल्या माध्यमाद्वारे देशातील काही गुणवान गायकांना प्रेक्षकांपुढे आणण्यासाठी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाने इच्छुक उमेदवारांच्या श्राव्य चाचण्या (ऑडिशन्स) मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत. सध्याच्या कोविद साथीमुळे असलेले निर्बंध लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी आपली ऑनलाइन ऑडिशन देण्याची सुविधा इच्छुकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी +91-98334 44443 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा किंवा अधिक माहितीसाठी saregamapaauditions.zee5.com/  या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.
 
‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यावर आनंदित झालेला संगीतकार, गायक, सुपरहिट मशीनवर संगीत तयार करणारा रॉकस्टार हिमेश रेशमिया म्हणाला, “सा रे ग म प कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करतानाचा माझा अनुभव फारच उत्तम आहे. मी यापूर्वी या कार्यक्रमाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये सहभागी झालो आहे. पण यंदाच्या आवृत्तीत मी काही अतिशय गुणी, तरूण आणि समर्थ गायकांना भेटण्याची अपेक्षा करतो. त्यांना राष्ट्रीय स्तरावर जनतेपुढे आणण्यास मी उत्सुक बनलो आहे. या कार्यक्रमाचा परीक्षक होण्यामागील खरं आकर्षण म्हणजे तुम्हाला देशातील काही अस्सल गुणवान आणि नव्या गायकांचा, अप्रशिक्षित आवाज ऐकायला मिळतो. किंबहुना परीक्षक म्हणून मला स्पर्धकांची एखाद्या गाण्यामागील हेतू लक्षात घेण्याची संधी मिळते आणि ही गोष्ट प्रेक्षकांनाही भावते. आता प्रेक्षकही या कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीचं स्वागत करण्यास आमच्याइतकेच उत्सुक असतील, अशी मी आशा करतो. या व्यासपिठावरून नव्या गुणी गायकांना जगापुढे आणण्याच्या संधीची मी प्रतीक्षा करीत असून सर्व इच्छुक स्पर्धकांनी मनापासून या ऑडिशन्समध्ये भाग घ्यावा, असं मी आवाहन करतो. कारण, कुणी सांगावं, कदाचित तुम्हीच उद्याचे सा रे ग म पचे नवे विजेते ठराल!”
 
रेशमियाच्या या उत्साही भावनेला दुजोरा देताना लोकप्रिय गायक आणि संगीतकार विशाल ददलानी म्हणाला, “मी सा रे ग म प कार्यक्रमाच्या माध्यमातूनच रिअॅलिटी टीव्हीशी जोडला गेलो आहे. त्यामुळे या कार्यक्रमात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून काम करणं म्हणजे माझ्या दृष्टीने स्वगृही परतण्यासारखं आहे. होतकरू गुणी गायकांना हेरून त्यांना नामवंत व्यावसायिक पार्श्वगायक बनविण्याचा मोठा इतिहास या कार्यक्रमाला लाभला आहे. आम्ही त्यात याच इतिहासाचा एक भाग होण्यासाठी सहभागी होतो. या कार्यक्रमाचं नाव आता घरोघरी पोहोचलं असून मी संगीतकार होण्याच्या आधीपासूनच या कार्यक्रमावर लोक प्रेम करीत आहेत. मी सा रे ग म प कार्यक्रमाचा एक भाग बनलो आहे, त्याचं कारण असं की त्यामुळे मला देशातील नव्या गायकांचे आवाज ऐकायला मिळतात आणि मग त्यातील गुणी गायकांचं रुपांतर उद्याच्या आत्मविश्वासू व्यावसायिक पार्श्वगायकांमध्ये करण्याची संधी मला मिळते. देशाच्या विविध भागांमधून सहभागी झालेल्या एकेका स्पर्धकाचा आवाज ऐकणं हा फार संपन्न करणारा अनुभव असतो. यंदाची आवृत्ती इतर आवृत्त्यांपेक्षा खूप मोठी असेल. देशातील होतकरू गायकांना मी इतकंच सांगीन की त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवून या कार्यक्रमाच्या दूरध्वनीवर एक मिस्ड कॉल द्यावा, म्हणजे आम्हाला तुम्हाला सा रे ग म पच्या व्यासपिठावर आणता येईल (हसतो).”
 
तेव्हा देशातील सर्व होतकरू पार्श्वगायकांसाठी हीच संधी असून त्यांनी ही संधी अजिबात दवडू नये. आपल्या सुरेल आवाजाने देशातील प्रेक्षकांची मने जिंकण्याचा आत्मविश्वास तुमच्यात असेल, तर ही संधी पकडा आणि भारताचा उद्याचा सुपरस्टार पार्श्वगायक बना.
 
भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक काळ सुरू असलेला गुणी गायकांचा शोध घेणारी स्पर्धा ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम लवकरच नवी आवृत्ती घेऊन येत आहे फक्त ‘झी टीव्ही’वर!