गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (21:57 IST)

सत्यजित रे यांनी 'शोले' पाहून अमजद खानची निवड 'शतरंज के खिलाडी'मधील नवाबाच्या भूमिकेसाठी केलेली

आज सत्यजीत रे यांचा जन्मदिन आहे. भारतातील महान चित्रपट दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना होते. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ऑस्कर देण्यात आला होता. तर भारत सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी भारतरत्न प्रदान केला होता. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख..
 
हा किस्सा आहे ऑक्टोबर 1976 सालचा. त्याकाळी आपल्या कारकिर्दीची नुकतीच सुरुवात करणाऱ्या जावेद सिद्दिकींचा एकदिवस फोन वाजला.
 
तो फोन होता प्रसिद्ध पटकथा लेखिका शमा झैदी यांचा. त्यांनी जावेद यांना निरोप दिला की, सत्यजित रेंना तुम्हाला भेटायचं आहे. त्यावेळी सत्यजित रे हे नाव जागतिक चित्रपटसृष्टीत गाजत होतं.
 
जावेद सत्यजित रेंना भेटायला गेले. तेव्हा सहा फूट चार इंच उंच असणाऱ्या व्यक्तीकडे जावेद बघतच राहिले. म्हणजे चित्रपट सृष्टीत ज्या माणसाचं नाव इतकं मोठं आहे ती व्यक्ती प्रत्यक्षातही इतकी उंच असेल अशी जावेद यांना कल्पना देखील नव्हती.
 
सत्यजित रे यांचे चाहते त्यांना 'माणिकदा' या नावाने देखील हाक मारायचे. सत्यजित रेंनी जावेद यांना बसायला खुर्ची दिली आणि म्हणले की, "मी असं ऐकलंय की तुम्ही चांगल्या कथा लिहिता."
 
यावर जावेद नम्रपणे म्हणाले, "मी कथांपेक्षा स्तंभलेखन अधिक केलंय."
 
"मी चांगल्या कथा लिहितो का? याविषयी मला काहीच कल्पना नाही," जावेद म्हणाले.
 
हे ऐकताच सत्यजित रे जागेवरून उठले आणि उशीवर ठेवलेली प्लॅस्टिकची फाईल त्यांच्या दिशेने सरकवली. रे म्हणाले की, या फाईलमध्ये प्रेमचंद यांची 'शतरंज के खिलाडी' नावाची कथा आहे आणि तुम्ही याचे संवाद लिहिणार आहात.

'शतरंज के खिलाडी'चे संवाद लिहिण्यासाठी सत्यजित रे यांना राजेंद्र सिंग बेदी यांचं नाव सुचविण्यात आलं होतं. तर दुसऱ्या बाजूला चित्रपटाचे नायक संजीव कुमार यांचं म्हणणं होतं की, चित्रपटाचे संवाद गुलजार यांच्याकडून लिहून घ्यावेत. शबाना आझमींना वाटत होतं की, त्यांच्या भूमिकेला त्यांचे वडील कैफी आझमीच न्याय देऊ शकतील.
 
बेदी आणि गुलजार हे चांगले लेखक असल्याचं रे यांना मान्य होतं. पण दोघेही मूळचे पंजाबचे असल्याने अवध प्रांताच्या पार्श्वभूमीवर बनणाऱ्या चित्रपटातील संवादांना ते न्याय देतील असं रे यांना वाटत नव्हतं.
 
यातच कैफी आझमी आणि रे यांची एक बैठक देखील झाली. पण कैफी आझमी यांनी उर्दूशिवाय इतर कोणत्याही भाषेला प्राधान्य दिलं नव्हतं. तर रे यांना इंग्रजी आणि बांग्लाशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती.
 
त्यामुळे शबाना आझमी भाषांतरकार म्हणून काम करतील असा प्रस्ताव देण्यात आला. पण रे यांना हा प्रस्ताव काही रुचला नाही. शेवटी त्यांनी सांगितलं की, "मला मोठ्या नावांची गरज नाहीये. उर्दू आणि इंग्रजीवर समान प्रभुत्व असेल असा कोणताही नवखा व्यक्ती मला चालू शकतो."
 
सिद्दिकी यांनी उर्दू आणि इंग्रजीत संवाद लिहिले. आपल्याला चित्रपटाचे संवाद नीट लक्षात यावेत म्हणून सत्यजीत रेंनी हे संवाद बंगालीत लिहिले.
 
जावेद सिद्दिकी सांगतात, "मूळ पटकथा आणि मी लिहिलेले संवाद यातील फरक कळावा म्हणून माणिकदांनी सगळेच्या सगळे संवाद इंग्रजीत अनुवादित करून घेतले. त्यानंतर त्यांनी ते संवाद बंगालीमध्ये लिहिले आणि पुन्हा वाचून पाहिले."
 
जेव्हा सिद्दिकींनी सत्यजीत रे यांना या मागचे कारण विचारले तेव्हा रे म्हणाले, "भाषा कोणतीही असो, शब्दांना आपली स्वतःची एक लय असते आणि लय सुरात असली पाहिजे. जर एखादा सूर जरी चुकला तरी सगळं दृश्य निरर्थक ठरतं."
 
या चित्रपटात संजीव कुमार, अमजद खान, सईद जाफरी व्हिक्टर बॅनर्जी हे कलाकार होते.
 
सत्यजित रे यांच्या पत्नी बिजोया रे त्यांचं आत्मचरित्र 'माणिक अँड आय: माय लाईफ विथ सत्यजित रे' मध्ये लिहितात, "त्याकाळी व्हिक्टरने सत्यजित रे यांची भेट घेतली होती. तो दिसायला चांगला आणि शिक्षित होता. माणिकला त्याचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं. त्याने व्हिक्टरला सहज विचारलं, 'तुला उर्दू बोलता येतं का?' व्हिक्टरनेही पटकन हो म्हणून टाकलं. माणिकने लगेचच त्याला अवधचा नवाब वाजिद अली शाह यांच्या प्रधानांची भूमिका देऊ केली. नवाबाची भूमिका शोलेतील गब्बरसिंग गाजवणाऱ्या अमजद खान यांनी साकारली होती. तर त्यांच्या प्रधानाची भूमिका विक्टर यांनी साकारली होती."
 
"शूटिंग संपल्यावर व्हिक्टरने मला सांगितलं की, त्यावेळी त्याला उर्दूचा एक शब्दही येत नव्हता. पण रे यांनी विचारल्यावर दुसऱ्याच दिवसापासून त्याने चांगल्या उर्दू मास्टरची नेमणूक करून उर्दू शिकायला सुरुवात केली. उर्दूचा एक शब्द देखील माहीत नसताना केवळ रेंसोबत काम करायचं म्हणून त्याने मेहनत घेतली आणि चित्रपटात अस्खलित उर्दू बोलली."
 
हिशोबाच्या वहीसारखी स्क्रिप्ट
जावेद सिद्दीकी सांगतात, "किराणा दुकानात ज्या पद्धतीची हिशेबाची वही असते अगदी त्याच पद्धतीने सत्यजित रे यांची स्क्रिप्ट असायची. हलक्या बदामी रंगाच्या कागदांची वही ज्यावर लाल रंगाचं कव्हर असायचं. या वहीत उर्दू संवाद आणि त्याचं इंग्रजी आणि बंगाली भाषांतर असायचं."
 
"माणिकदा सेटवर कधीच मोठ्या आवाजात बोलायचे नाहीत. ते कलाकारांशी बोलताना देखील इतक्या सौम्य आवाजात बोलायचे की त्यांच्या बाजूला बसलं तरी चकार शब्द ऐकू यायचा नाही."
 
"भले ही अभिनेता त्यांच्यापासून लांब अंतरावर उभा असेल पण ते कधीच ओरडून बोलायचे नाहीत. ते त्या कलाकाराजवळ जाऊन त्याच्या कानात काहीतरी सांगायचे आणि लांब व्हायचे."
 
आणि वाजिद अली शाह यांचा बोका हरवला...
'शतरंज के खिलाडी' हा ऐतिहासिक पट होता. भारतातून इंग्रज पुन्हा ब्रिटनमध्ये परतणार होते. त्यावेळी सत्तांतरांचे वातावरण देशात होते, जे प्रांत इंग्रजांच्या ताब्यात आधीच आहेत ते इंग्रज आपल्याकडे औपचारिकृदष्ट्या घेऊन नव्याने स्थापित होणाऱ्या भारत सरकारकडे जाणार होते. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट होता आणि त्यामुळे अर्थातच तो काळ पूर्ण उभा करणे हे रे यांच्यासमोर आव्हान होते.
 
सत्यजीत रे आपल्या गरजांबद्दल इतके काटेकोर होते की त्यांनी त्यांच्या केजरीवाल नावाच्या मित्राकडून जुन्या जमावार शाली मिळवल्या आणि त्यांचा वापर चित्रिकरणादरम्यान केला.
 
चित्रपटात वापरण्यासाठी त्यांच्या केजरीवाल नावाच्या एका मित्राने त्यांना जुन्या जमावार शाली दिल्या होत्या.
 
वाजिद अली शाह यांना मांजरी पाळण्याची हौस होती.
 
बिजोया रे आपल्या आत्मचरित्रात लिहितात, "आम्ही चित्रपटासाठी एका मांजरीच्या शोधात होतो. आमची जुनी मैत्रिण जहां आरा चौधरी हिने आम्हाला तिचा बोका दिला, तशी आमची चिंता मिटली. पण या बोक्यामुळे आमच्यावर चांगलीच नामुष्की ओढावली."
"तर झालं असं की, शूटिंग पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी हा बोका गायब झाला. आम्ही ठिकठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र तो काही सापडला नाही. आपला आवडता बोका हरवल्यामुळे जहाँ आरा रडावलेली झाली होती."
 
"माणिकदांनी देखील शूटिंग थांबवलं, कारण वाजिद अली शाह यांच्यासोबत तो बोका कायम लागणार होता. तोच नव्हता, दुसऱ्या दिवशी जेव्हा बोका सापडल्याचं कळलं तेव्हा आमच्या जीवात जीव आला," असं बिजोया रे लिहितात.
 
दिवसातून एक चिकन सँडविच आणि मिष्टी दोई
सत्यजित रेंची आणखीन एक सवय म्हणजे ते सेटवर सकाळी पोहोचायचे आणि संध्याकाळी पॅकअप झाल्यावरच सेट सोडायचे.
 
जावेद सिद्दिकी सांगतात, "एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात चिकन सँडविच घेऊन ते आपल्या खुर्चीत बसायचे. त्यांच्या मांडीवर स्क्रिप्ट उघडलेली असायची आणि नजर त्या पानांवर रोखलेली असायची. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये ते केवळ एक चिकन सँडविच आणि मातीच्या कुल्हड मध्ये तयार केलेलं मिष्टी दही खायचे."
 
"त्यानंतर तोंडाची चव बदलावी म्हणून एखादी सिगारेट ओढायचे. कॅमेरामन असतानाही त्यांना स्वतःला कॅमेरा हाताळायचा असायचा. शॉट कितीही अवघड असला तरी ते कॅमेरामनला कॅमेऱ्याला हात लावू द्यायचे नाहीत. अगदी चित्रपटाचं एडिटिंग सुध्दा ते स्वतः करायचे."
 
महिलांप्रती असलेला आदर
या चित्रपटात नवाबाची भूमिका साकारलेले कलाकार सईद जाफरींनीही त्यांच्या 'सईद' या आत्मचरित्रात या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.
 
सईद जाफरी लिहितात, "माणिकदा त्यांच्या लाल पृष्ठाच्या वहीत सगळ्या शॉट्सचे स्केचेस काढून ठेवायचे. लाईटच्या बारकाव्यांवर त्यांचा कायम जोर असायचा. मी आणि संजीव शूटिंगची पूर्ण तयारी करून यायचो, त्यामुळे एकाच टेक मध्ये सगळे शॉट्स ओके व्हायचे."
 
"माणिकदा दारूला हात लावायचे नाहीत. त्यामुळे शूटिंग संपलं की ते थेट आपल्या घरी जायचे आणि दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगचे स्केच बनवायचे," असं सईद सांगतात.
 
"एकदा आम्ही लखनौच्या एका गावात शूटिंग करत होतो. कोणीतरी माझ्या पत्नीला, जेनिफरला माणिकदांचा स्टूल बसायला दिला. माणिकदा या स्टूलवर बसून कॅमेरा ऑपरेट करायचे आणि जेनिफरला याची काही कल्पना नव्हती. माणिकदांनी जेनिफरने स्टूलवरून उठण्याची बरीच वाट पाहिली, शेवटी लाजून तिला म्हणाले, "माय डियर जेनिफर, मी थोड्या वेळासाठी तुझा स्टूल घेऊ शकतो का?"
 
नर्तकीच्या शोधात सत्यजीत रे गेले 'रेडलाईट एरिया'त गेले
'शतरंज के खिलाडी' या चित्रपटात मुजरा करण्यासाठी सत्यजित रे एका तरुण नर्तकीच्या शोधात होते.
 
कोणीतरी माणिकदांना सांगितलं होतं की, कोलकत्त्याच्या रेड लाईट एरियातील सोनागाछी येथील एक महिला ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकते.
 
जावेद सिद्दीकी सांगतात की, "माणिकदांनी त्या महिलेला बोलावणं पाठवलं असतं तर ती आनंदाने आली असती. पण स्टुडिओत येण्यासाठी ती महिला अस्वस्थ झाली तर? या विचाराने रे यांनी तिला भेटायला जाणं योग्य समजलं."
 
"शरीर विक्रेयाचा व्यवसाय होणाऱ्या त्या गल्ल्या इतक्या अरुंद होत्या की, त्यांना गाडी बाहेरच थांबवावी गली. ते गाडीतून उतरले आणि गौहर-ए-मकसूदच्या घराकडे पायी निघाले. कोठ्यावर पोहोचताच त्यांनी पहिल्यांदा तिचा मुजरा पाहिला आणि मग तिच्याशी बोलले. रे तिथून बाहेर पडताच लोकांनी त्यांना ओळखलं आणि त्यांची झलक पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी जमली."
 
"आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपट कलाकारांना ज्या पद्धतीने घेरलं जातं त्या पद्धतीने न घेरता लोकांनी आदराने त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला. माणिकदा पुढे पुढे चालत होते आणि लोक त्यांच्या मागे मागे त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला आले."
 
पण या महिलेची नर्तिकेच्या भूमिकेसाठी निवड झाली नाही. 1970 च्या दशकात सत्यजीत रे दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यमसाठी ज्युरी म्हणून जात असत. त्यांनी तिथे पं. बिरजू महाराजांच्या शिष्या सास्वती सेन यांचे कथक नृत्य पाहिले होते. या भूमिकेसाठी इतक्या तपशालीची गरज असल्यामुळे माझी निवड करण्यात आली असावी असं सास्वती सेन यांनी द हिंदू फ्रंटलाईनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
 
खाण्याचे शौकीन मात्र आंब्याचा तिटकारा
सत्यजित रे खाण्याचे शौकीन होते. ते दर रविवारी सकाळी नाश्त्यासाठी कलकत्त्याच्या प्रसिद्ध फ्ल्युरी रेस्टॉरंटमध्ये जायचे.
 
युरोपियन खाद्यपदार्थाबरोबरच त्यांना बंगाली खाद्यपदार्थही आवडायचे. लुची, तुरीची डाळ आणि बैगुन भाजा हे त्यांच्या विशेष आवडीचे पदार्थ होते.
 
सत्यजीर रेंच्या पत्नी बिजोया रे त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "सत्यजीत बेक किंवा ग्रील केलेले मासेच खायचे. माझ्या सासूबाई त्यांना रोहू माशाचा एकतरी तुकडा आणून द्यायच्या. पण तो मासा नेहमीच मिळायचा नाही."
 
"त्यांना बारीक झिंग्याची ऍलर्जी होती. त्यांना अंडी प्रचंड आवडायची. विशेषत: अंड्यातील पिवळा बलक त्यांना खूप आवडायचा. त्यांना फळांविषयी फारसं प्रेम नव्हतं. आंब्याचा वास तर त्यांना अजिबात आवडत नव्हता. आम्हाला आंबे खूप आवडायचे. पण माणिकने सांगितलं होतं की, मी जेवणाच्या टेबलवरून उठलो की मगच तुम्ही आंबे खा."
 
"माझ्या मुलालाही आंबे आवडत नाहीत पण त्याला स्ट्रॉबेरी, चेरी आणि आलूबुखार अशी फळं आवडतात. माणिकला तर ही फळं देखील आवडायची नाहीत."
 
सिक्कीमवर बनवलेल्या माहितीपटांवर बंदी
सत्यजित रे यांनी सिक्कीमवर माहितीपट बनवला होता. सिक्कीमच्या चोग्याल यांनी 1971 साली रेंना माहितीपट बनवण्याची जबाबदारी दिली होती.
 
त्यावेळी सिक्कीमवर भारताचं नियंत्रण नव्हतं. 1975 मध्ये जेव्हा सिक्कीम भारतात विलीन झालं तेव्हा या माहितीपटावर बंदी घालण्यात आली, कारण त्यात सिक्कीमच्या सार्वभौमत्वाविषयी चर्चा करण्यात आली होती.
 
2010 सालच्या सप्टेंबर महिन्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बंदी उठवली. पुढे नोव्हेंबर 2010 मध्ये कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा माहितीपट दाखवण्यात आला. पण त्यानंतर हा माहितीपट इतरत्र दाखवण्यापूर्वीच सिक्कीम उच्च न्यायालयाकडून पुन्हा बंदी घालण्याचा आदेश आला.
 
ऑड्रे हेपबर्नने दिला ऑस्कर
 
सत्यजित रे यांना त्यांच्या कामाबद्दल 'लाइफ टाईम अॅचिव्हमेंट ऑस्कर' पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याचं कळताच आपल्याला हा पुरस्कार हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नच्या हस्ते देण्यात यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
 
त्यांच्या इच्छेचा मान राखून ऑड्रे हेपबर्नने 30 मार्च 1992 रोजी या पुरस्काराची घोषणा केली. रे यांची प्रकृती चांगली नव्हती त्यामुळे ते रुग्णालयात होते. त्यांच्यापर्यंत हा पुरस्कार पोहचवण्यासाठी सोहळ्याच्याच आधी हॉलिवूडचे प्रतिनिधी म्हणून लेखक निर्माते अल श्वार्झ आले होते. त्यांनी ही ट्रॉफी सत्यजीत रे यांच्याकडे पोहोचवली आणि त्यांची एक व्हीडिओ मुलाखत घेतली. त्यात त्यांनी या पुरस्कारावेळी आभार मानले होते. हीच चित्रफीत ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या वेळी त्यांचे आभाराचे भाषण म्हणून दाखवली होती.
 
बिजोया यांनी आत्मचरित्रात लिहिलंय की, "ऑस्करची ट्रॉफी खूप जड होती. माणिक यांचे डॉक्टर बक्षी यांनी ती ट्रॉफी खालून धरली नसती तर माणिकच्या हातून ती पडली असती. ऑस्कर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला."
 
योगायोगाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच म्हणजे 23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित रे यांचं निधन झाले.
 
त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, जानेवारी 1993 मध्ये ऑड्रे हेपबर्नचंही निधन झालं.
 
सत्यजीत रे यांचा 'तिसरा डोळा'
'शतरंज के खिलाडी' मध्ये अमजद खान येण्यापूर्वी या दोघांची कधीच भेट झाली नव्हती. त्यांनी अमजद खान यांना शोले चित्रपटात पहिल्यांदा पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी अमजद यांचं चित्र काढलं. या चित्रात त्यांनी अमजद यांच्या कानात आणि गळ्यात हिऱ्यांचे हार काढले, डोक्यावर भरतकाम केलेली टोपी दाखवली. ते चित्र पाहताच लोकांच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द म्हणजे जान-ए-आलम वाजिद अली शाह.
 
असं म्हणतात की, सत्यजित रे यांच्याकडे तिसरा डोळा होता. एखाद्या गोष्टीकडे कोणाचं लक्षही नसेल पण रे यांचं त्या गोष्टीकडे लक्ष जात असे.
 
जावेद सिद्दिकी एक किस्सा सांगतात की, "ते एकदा स्टुडिओमध्ये मीर रोशन अली यांच्या घराचा सेट बघायला गेले होते. पण त्यांना घराच्या भिंती स्वच्छ दिसल्या. त्यांचं लक्ष एका बादलीकडे गेलं, ज्यात रंगाचे ब्रश सुकवण्यासाठी ठेवले होते. त्यांनी त्या घाणेरड्या पाण्यातले ब्रश उचलले आणि स्वच्छ भिंतीना रंग दिला."
 
'डामडौल मिरवायची सवय '
काही लोकांना असं वाटायचं की सत्यजीत रे यांना स्वतःचा डामडौल दाखवण्याची सवय होती.
 
एकदा एका पत्रकाराने त्यांचा 'अपूर संसार' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना विचारलं होतं की, या चित्रपटात अनेक ट्रॅकिंग शॉट्स आहेत. तुमच्या पहिल्या 'पाथेर पांचाली' चित्रपटात फक्त स्थिर शॉट्स घेण्यात आले होते. तुमची शूटिंगची शैली बदलण्यामागचं नेमकं कारण काय होतं?
 
यावर रे म्हणाले, "पाथेर पांचालीच्या दिवसांत माझ्याकडे ट्रॉली विकत घेण्यासाठी पैसे नव्हते."
 
त्याचप्रमाणे टॅक्सी ड्रायव्हरवर आधारित 'अभिजन' हा चित्रपट पाहिल्यानंतर एका पत्रकाराने विचारलं की, टॅक्सीचा रियर व्ह्यू आरसा फुटलेला दाखवून तुम्हाला टॅक्सी ड्रायव्हरवरचा संपलेला अहंकार दाखवायचा प्रयत्न केला होता का?
 
यावर सत्यजित रे यांनी त्या रिपोर्टरकडे आश्चर्यानं पाहिलं आणि त्यांच्या कला दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्त यांच्याकडे वळून म्हणाले, "बंसी, आपण खरचं फुटलेला आरसा दाखवला होता का?"
 
एका कवीने रचलेल्या ओळी सत्यजित रे यांना तंतोतंत लागू पडतात...
 
'फ़साने यूँ तो मोहब्बत के सच हैं पर कुछ-कुछ
 
बढ़ा भी देते हैं हम ज़ेब-ए-दास्तान के लिए'
 
याचा थोडक्यात आशय असा की 'प्रेमाचे किस्से तर खरेच असतात, पण त्यात आपण आपल्या मनाचंही त्यात थोडं घालतोच ना.'
 
 
 
Published By- Priya Dixit