गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (20:44 IST)

शमिता शेट्टी म्हणते, मी जर 'आंटी' असेन तर, तुम्ही...

shamita shetty
बॉलिवुड अभिनेत्री शमिता शेट्टी ही काही महिन्यांपूर्वी 'बिग बॉस'च्या सीझन-15 मध्ये सहभागी झाली होती. त्याआधी ती 'बिग बॉस' ओटीटीमध्येही दिसली होती. बिग बॉसच्या सीझन-15 मध्ये शमिता टॉप 5 पर्यंत पोहोचली होती.
 
'बिग बॉस'च्या घरात शमिता शेट्टीला अनेकदा 'एज शेमिंग'ला म्हणजेच वयावरून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांनाही सामोरं जावं लागलं होतं. बिग बॉस-15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी यांच्यात अनेकदा वाद आणि भांडणंही झाली. शोमध्ये असताना आणि बाहेर पडल्यावरही ती याबद्दल बोलली होती.
 
बीबीसी हिंदीने शमिता शेट्टीसोबत संवाद साधला. यावेळी शमिता शेट्टीनं 'एज शेमिंग'सोबतच डिप्रेशन, बिग बॉस आणि आपल्या कुटुंबाबद्दलही मोकळेपणानं चर्चा केली.
 
'जर मी आंटी असेन तर...'
'बिग बॉस'च्या घरात माझ्या वाढत्या वयावरून जे शब्द वापरले गेले तेच शब्द मला नंतर बाहेर पडल्यावरही ऐकायला मिळाले, असं शमिता शेट्टीने म्हटलं.
 
"मी थोडा काळ दुःखी झाले होते. जे लोक माझ्यावर अशी शेरेबाजी करत होते, ते सगळे सुशिक्षित होते आणि बाहेरच्या जगात स्वतःला वेगळं दाखवायचे. ते खूप सहजपणे हे सगळं विसरून जातात. पण या सगळ्यातून तुम्ही काय संदेश देता? अशाच लोकांमुळे 'बिग बॉस'च्या घरात माझ्यासाठी वयावरून नको ते शब्द वापरले गेले. असं का बोललं गेलं हेच मला कळत नव्हतं. कारण तिथे काही लोक माझ्याच वयाचे होते. त्यामुळे जर तुम्ही मला आंटी म्हणत असाल तर तुम्हीही अंकल आहात."
 
आता मी या सगळ्यामधून बाहेर पडलीये, असंही शमिता सांगते.
 
'बिग बॉस' माझ्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी
गेल्या वर्षीच 'बिग बॉस' ओटीटी हा कार्यक्रम सुरू झाला. शमिता शेट्टीही यामध्ये सहभागी झाली होती. त्याच काळात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत होते. पोर्नोग्राफिक फिल्म बनविण्याच्या आणि अॅपच्या माध्यमातून त्या प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आलं होतं.
 
शमिता तिची बहीण शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांच्या अतिशय जवळ आहे. त्यामुळे शिल्पा आणि तिचं कुटुंब अडचणीत असताना शमिता 'बिग बॉस' ओटीटीमध्ये का गेली?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना शमितानं म्हटलं, "मी या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी माझ्या कुटुंबाचीही इच्छा होती. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर शोमध्ये जाण्याची कमिटमेंट खूप आधीच दिली होती. त्यामुळे शोमध्ये सहभागी होणं माझ्या व्यावसायिक बांधिलकीचाही भाग होता. या सगळ्या काळात माझ्याबद्दलही खूप गोष्टी बोलल्या जात होत्या. कदाचित म्हणून मी या शोमध्ये जावं, त्या घरात राहावं अशी माझ्या कुटुंबाचीही इच्छा होती."
 
ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे, असा विचार मीसुद्धा केला.
 
फिल्मी पार्श्वभूमी असेल तर अडचणी वाढतात...
चित्रपटांच्या संख्येचा विचार केला तर शमिताचं करिअर फार मोठं नव्हतं. स्वतः शमिताही म्हणते की, चांगले चित्रपट मिळाले नाहीत याची मला कायम खंत आहे.
 
शमिताची बहीण शिल्पा तुलनेत गाजलेली अभिनेत्री होती. तुमच्या घरातील व्यक्ती चित्रपटसृष्टीतली असेल तर गोष्टी अधिक सोप्या होतात का? असा प्रश्न विचारल्यानंतर शमिता म्हणते, "माझ्या मते गोष्टी अधिक कठीण होतात. जेव्हा तुमची पार्श्वभूमी चित्रपटाशी संबंधित असेल आणि कुटुंबातील एखादा सदस्य इंडस्ट्रीतला असेल तर तुमची तुलना त्याच्याशी होत राहते. अशी तुलना का होते हेच मला समजत नाही. कारण दोन व्यक्ती एकसारख्या नसतात."
 
शिल्पा शेट्टीसोबत होणाऱ्या तुलनेबाबत शमिता शेट्टी म्हणते, "प्रत्येकजण आपलं नशीब सोबत घेऊन येतो. नशीब ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि माझं नशीब माझ्यासोबत नसेल. मला अधिक काम मिळालं नाही किंवा चांगलं काम मिळालं नाही. एका कलाकारासाठी आपली क्रिएटीव्हीटी व्यक्त करता न येणं हे जास्त त्रासदायक असतं."
 
'डिप्रेशनमध्ये तुम्हाला रोज संघर्ष करावा लागतो'
एक काळ असाही होता जेव्हा शमिता शेट्टीला डिप्रेशनचा सामना करावा लागला. सुरुवातीला आपल्यासोबत काय होतंय हेच तिला कळलं नाही.
 
शमिता सांगते, "त्यावेळी मी रिलेशनशिपमध्ये होते. ती व्यक्ती खूप चांगली होती. तो मला सांगायचा की, तुझं सगळं काही ठीक नाही सुरू आहे. तो टप्पा असा असतो जेव्हा काही गोष्टी तुमच्या स्वतःच्या लक्षात येत नाहीत.
 
माझ्यासोबत काय होतंय हे मलाही कळलं नव्हतं. त्या काळात माझ्या कुटुंबानं मला खूप आधार दिला. तो काळ खूप कठीण होता. मुळात जे होतंय ते स्वीकारणं हा पहिला टप्पा असतो. जे लोक डिप्रेशनमध्ये असतात त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा लढाई असतो."
 
तुम्हाला नैराश्य आलंय, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात हे जेव्हा इतरांना कळतं तेव्हा त्यांना वाटतं की, तुम्ही कमकुवत आहात. पण जे लोक नैराश्याचा सामना करून त्यातून बाहेर पडले आहेत, ते खरंतर खूप खंबीर आहेत हे समजून घेण्याची गरज असल्याचंही शमिता म्हणते.
 
स्वतःसाठी ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या करता न आल्यानं आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचं शमिता सांगते.
 
"माझे चित्रपट आणि इतर गोष्टींमध्ये खूप गॅप होता. माझी ही इच्छा नव्हती. पण मला चांगलं कामच मिळत नव्हतं. केवळ दिसत राहायचं म्हणून मला काम करायचं नव्हतं. यादरम्यान मी काही शो करून पैसे कमावत होते, स्वतःचं घर चालवत होते. तुम्ही चित्रपट करत नसाल तर पैसे कमवत नसता, रिकामे असता असं काही लोकांना वाटतं. पण तसं नाहीये."