शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (15:25 IST)

पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेद्वारे लोकप्रिय मराठी अभिनेत्री वल्लरी विराज हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार!

साम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका त्यातील अत्यंत वेधक कथानकामुळे प्रेक्षकांची अतिशय लाडकी मालिका ठरली आहे. या मालिकेत आपल्या साम्राज्यात आपल्या सुजाण शासनाने शांती आणि समृद्धी प्रस्थापित करणार्‍या महाराणीची गोष्ट आहे, जिने आपल्या कर्तृत्त्वाने हे सिद्ध केले की, मनुष्य जन्माने नाही; तर आपल्या कर्माने मोठा होतो! एतशा संझगिरी, राजेश शृंगारपुरे, गौरव अमलानी, स्नेहलता वसईकर सारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या मालिकेने अहिल्याबाई होळकरांच्या कहाणीतून इतिहासाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन प्रेक्षकांना दिला आहे. या अभिनेत्यांच्या संचात आता दाखल होत आहे, मराठी अभिनेत्री वल्लरी विराज, जी तिच्या उत्तम अभिनयाबद्दल ओळखली जाते. रंगमंचावर देखील तिने आपली उपस्थिती नोंदवलेली आहे आणि आता पार्वतीची भूमिका करून ती हिंदी टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण करत आहे. पार्वतीच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकात आणखी नवी वळणे येतील!
 
आपल्या पदार्पणाबद्दल बोलतांना आनंदित झालेली वल्लरी म्हणते, “पुण्यश्लोक अहिल्याबाईसारख्या मालिकेत दाखल होताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या काळापेक्षा पुढे असलेल्या अजिंक्य महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्राचे सुंदर चित्रण करून या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळावले आहे. सामाजिक रूढी आणि पितृसत्ताक विचारसरणीचा प्रचंड पगडा असलेल्या काळात अहिल्याबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करून महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन दिले. मी जेव्हा ही गोष्ट ऐकली, तेव्हा मी हे काम स्वीकारायचे ठरवले. कारण ही मालिका फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन नाही, तर प्रबोधन देखील करते. त्यामुळे या भव्य मालिकेच्या माध्यमातून पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे. पार्वतीची व्यक्तिरेखा करणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, कारण तिची मूल्ये माझ्यापेक्षा फारच वेगळी आहेत. काळाच्या दृष्टीने देखील आमच्यात फार मोठे अंतर आहे. त्यामुळे 21व्या शतकातील स्त्रीने 18व्या शतकातील विचारसरणी समजून घेणे हे कठीण काम होते. पण मालिकेची पटकथा आणि माझ्यासाठी योजलेली व्यक्तिरेखा मला ज्या पद्धतीने सांगण्यात, समजावून देण्यात आली, ती मला खूपच आवडली. अर्थात, मी त्यावर काम केले. एक अभिनेत्री म्हणून मला कोणतीही भूमिका पाण्यासारखे होऊन साकारावी लागते. पार्वतीची मानसिकता समजून घेण्यासाठी, सर्वात आधी एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याबाबतच्या क्षमतेविषयी माझ्या मनात असलेली शंका मला दूर करावी लागली. तो काळ, प्राचीन भारतातील स्त्रिया, कुटुंब व्यवस्था या गोष्टी मी हळूहळू समजत गेले, आणि तेव्हा मला पार्वतीची व्यक्तिरेखा अधिक चांगली उमगली. शिवाय, अत्यंत मनमोकळे कलाकार आणि सहज सामावून घेणारा संच असल्याने त्याचा मला खूप फायदा झाला. माझ्यातील त्रुटी दूर करण्यास त्यांनी मला मदत केली आणि अशाप्रकारे मी पार्वती जिवंत करू शकले. मला आशा वाटते की, प्रेक्षकांना माझा परफॉर्मन्स आवडेल आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेचे निष्ठावान प्रेक्षक मला देखील स्वीकारतील व माझ्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करतील.”
 
आगामी भागांमध्ये, प्रेक्षक पार्वतीला भेटतील, जी एक अत्यंत सरळमार्गी आणि निखळ मनाची मुलगी आहे. साधेपणात वाढलेल्या पार्वतीचे हृदय सोन्यासारखे लख्ख आहे. कोणाच्याहीबद्दल ती वाईट विचार करत नाही. आणि इतर कोणत्याही मुलीप्रमाणे, आपल्या प्रिन्स चार्मिंगला भेटण्याची स्वप्नं ती बघते! माळवा राज्यात तिचे आगमन पाहुण्याच्या रूपात होते. खंडेरावाशी झालेल्या पहिल्या भेटीत ती त्याच्या दर्शनाने अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. पार्वतीच्या आगमनामुळे खंडेराव आणि अहिल्या यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होतील का? अहिल्या ही परिस्थिती कशी हाताळेल?

बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!