सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (12:43 IST)

मला कायमच सिनेमांच्या माध्यमातून सांस्कृतिक बदल घडवणारी अभिनेत्री व्हायचं होतं- भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर या तरुण आणि आश्वासक बॉलिवूड अभिनेत्रीने कायमच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक व्यक्तीरेखेतला जिवंतपणा कौतुकास्पद असतो. प्रत्येक सिनेमामध्ये केलेल्या एकापेक्षा एक सरस अभिनयामुळे आज ती हिंदी सिनेमा क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक समजली जाते. दृढनिश्चयी स्वभाव आणि मेहनत घेण्याची तयारी यांमुळे सिनेमा क्षेत्रात पर्दापणापासूनच ती इतरांपेक्षा वेगळी ठरली. 
 
भूमीमध्ये अभिनयाचं वेड खोलवर रूजलेलं आहे. आपलं काम आणि अभिनयाविषयी वाटणारं प्रेम व्यक्त करत भूमी म्हणाली, ‘मला कामात बुडून जायला आवडतं. आपण अभिनेत्री आहोत आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण चिरकाल राहाणाऱ्या व्यक्तीरेखा तयार करण्यासाठी खर्च करतोय ही गोष्ट माझ्यासाठी सुखावह आहे. अभिनय हा खूप वेगळा आणि खास व्यवसाय आहे. त्याच्याकडे अतिशय गांभीर्यानं पाहावं लागतं. सिनेमाच्या सेटवर पाऊल ठेवल्या क्षणापासून माझं मन कृतज्ञतेनं भरून जातं. आपलं काम अजरामर राहाणार आहे ही गोष्ट मला दिलासा देते. म्हणूनच कोणत्याही सिनेमासाठी 200 टक्के योगदान देण्यावर माझा भर असतो.’
 
भूमी पेडणेकरनं परत एकदा आपल्या असामान्य अभिनयाने समीक्षक तसेच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. प्रत्येक भूमिकेच्या अंतरंगात शिरून वेगळे पैलू पुढे आणण्याचं तिचं कसब, अभिनयातला सच्चेपणा प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. प्रत्येक भूमिका साकारताना चौकटीबाहेरचा विचार करून त्यातले बारकावे शोधण्याची तिची हातोटी तिच्या मेहनतीची साक्ष देणारी आहे. 
 
भूमी म्हणाली, ‘आपल्या प्रत्येक सिनेमातून कायमस्वरुपी ठसा उमटेल याची मी दक्षता घेते, कारण सिनेमा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. आज आम्ही ज्याची निर्मिती करतोय, ते कायम लक्षात ठेवलं जाईल आणि काळाच्या कसोटीवर त्याची सतत परीक्षा घेतली जाईल. आम्हाला त्या निर्मितीतून काय म्हणायचं होतं, हे वारंवार तपासलं जाईल. कला अमर असते.’ 
 
‘दम लगा के हैशा या पहिल्या सिनेमापासूनच भूमीला प्रेक्षकांची साथ मिळाली आहे. आज तिनं स्वतंत्र स्थान तयार केलं आहे.’ ‘मला कायमच सिनेमांच्या माध्यमातून सांस्कृतिक परिणाम घडवून आणणारी अभिनेत्री व्हायचं होतं. म्हणूनच प्रेरणा देणाऱ्या सिनेमांचीच मी निवड करते आणि त्यासाठी सर्वोत्तम योगदान देते.’ भूमी पुढे म्हणाली, ‘या सिनेमांतून मी स्वतःचा वारसा तयार करत आहे आणि मी जे काम करते त्याचा मला अभिमान वाटतो.’
 
अभिनय कुशल कलाकार असण्याबरोबरच भूमी एक सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिकसुद्धा आहे. पर्यावरणाविषयी त्यांना तळमळ वाटते आणि ती त्यासंबंधित मुद्द्यावर कायम हिरीरीने आपली मतं व्यक्त करत असतात.