शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (19:59 IST)

आदित्य नारायणनं अलिबागच्या लोकांची हात जोडून माफी का मागितली?

प्राजक्ता पोळ
"मला हात जोडून अलिबागकरांची आणि इंडियन आयडॉलमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्यांची माफी मागायची आहे," असं गायक आणि निवेदक आदित्य नारायण यांनी म्हटलं आहे.
 
"माझा कुणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वतःच्या भावना त्या जागेशी जोडल्या गेल्या आहेत," अशी पोस्ट आदित्य नारायण यांनी सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
 
पण आदित्य नारायण यांच्यावर अलिबागकरांची माफी मागण्याची वेळ का आली?
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण 'इंडियन आयडॉल' या सिंगिंग रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचं शूटिंग सध्या दमणमध्ये सुरू आहे.
 
आदित्य नारायण यांनी नुकतंच एका एपिसोडमध्ये बोलताना 'अलिबाग से आया हूं क्या? असं एक वक्तव्य केलं.
मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या वक्तव्यावरून आदित्य नारायण यांनी तात्काळ माफी मागण्याची मागणी केली.
 
"आदित्य नारायण यांनी अलिबागकरांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे अलिबागकर नाराज झाले आहेत. त्यामुळे या शोच्या मंचावरून आदित्य नारायण यांनी माफी मागावी," असं अमेय खोपकर यांनी म्हटलंय.
त्यांनी म्हटलं, "ज्या शोमध्ये हे वाक्य उच्चारलं गेलं त्या शोच्या मंचावरून माफी मागितली पाहिजे. या संदर्भात प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्याशी माझं बोलणं झालं. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्यच्या तक्रारी येत असल्याची कल्पना मी त्यांना दिली. याआधी अनेकदा अलिबागकरांचा अपमान झालेला आहे वारंवार कल्पना देऊनही अलिबागकरांचा अपमान केला जातोय. हे सहन केलं जाणार नाही. आधी विनंती, मग ताकीद आणि शेवटी कानाखाली अशी आपल्या कामाची पद्धत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी," अशी धमकीच थेट अमेय खोपकर यांनी दिला आहे.
 
त्यानंतर आदित्य नारायण यांनी फेसबुक पोस्ट लिहीत माफी मागितली. पण 'अलीबागसे आया है क्या'? असं सहजपणे का म्हटलं जातं?त्यामुळे त्या शहरातल्या लोकांच्या भावना खरचं दुखावतात?
 
हे वाक्‍य खूप पूर्वीच्या काळापासून उच्चारलं जात असल्याचं काही जुने लोक सांगतात. पुढे सिनेमांमधूनही हे वाक्य कानावर पडायचं.
 
मूळच्या अलिबागचा असलेल्या नेहा घरत सांगतात, "माझे पणजोबा ही गोष्ट सांगायचे. साधारण 1950 च्या काळात ते अलिबागहून मुंबईला नोकरीला यायचे. त्यावेळी अलिबाग ते मुंबई हे अंतर बोटीनेच पार करता यायचं. त्यासाठी रस्ते नव्हते. त्यामुळे भाऊच्या धक्यावरून बोटीने अलिबाग आणि मुंबईचा प्रवास असायचा. त्यावेळी मुंबईचा संबंध नोकरी पुरताच यायचा. तिथे सुरू असलेल्या घडामोडींचा, इतर गोष्टींचा अलिबागहून येणार्‍या जाणार्‍यांचा फार संबंध यायचा नाही. त्यामुळे त्यांना फार काही माहिती नसायचं.
 
त्या काळात मुंबईत परप्रांतीयांची संख्या वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला फार काही माहिती नसली की त्याला अलिबागसे आया है क्या? असं विचारलं जायचं. त्या काळापासून हे वाक्‍य प्रचलित झालं."
 
मुंबईत काही वर्ष बँकेत नोकरी करून सध्या अलिबागमध्ये स्थायिक झालेले श्रीकांत लेले सांगतात,"90 च्या दशकात मी मुंबईत बँकेत नोकरी करत होतो. त्यावेळी काही सिनेमांमधून 'अलिबाग से आया है क्या? हा डायलॉग प्रसिद्ध झाला. सिनेमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत हा डायलॉग पोहोचला. तो सर्वत्र बोलला जाऊ लागला.
 
त्यावेळी माझ्या नोकरीच्या ठिकाणीही असं बोललं जायचं. मग मी मुद्दाम म्हणायचो, 'हां..! मै आलिबाग से आया हूँ और मुझे गर्व है." अजूनही हा 'डायलॉग' उच्चारला जातो म्हणजे त्याचा प्रसारमाध्यमांमधून किती प्रसार झाला आहे आणि किती खोलवर ते रूजलय हे लक्षात येतं."
 
अलिबागकरांचा अपमान होतो?
श्रीकांत लेले पुढे सांगतात, "पूर्वी या डायलॉगमुळे भांडणं, मारामाऱ्याही झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गावाबद्दल किंवा शहराबद्दल असं काही बोललं तर निश्चितपणे कोणाच्याही भावना दुखावल्या जातील. जे लोक अलिबागबद्दल असं बोलतात, त्यांना त्यांच्या गावाबद्दल किंवा शहराबद्दल असं बोललेलं चालणार आहे का? त्यांना ते आवडतील का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून पाहावा.
 
काही सेलिब्रिटी अशी वक्तव्यं करत असतील, तर अनेक सेलिब्रिटींच्याही अलिबागला जागा आहेत, त्यांचे बंगले आहेत. मग जेव्हा ते तिकडे येतात तेव्हा ते अलिबाग वरून आले आहेत असं बोललेलं त्यांना चालणार आहे का? किंवा त्यांना कसं वाटेल? याचाही विचार त्यांनी केला पाहिजे."
 
नेहा घरत सांगतात, " मी अनेक वर्षं मुंबईत राहते अलिबाग हे माझं गाव आहे. जेव्हा 'अलिबाग से आया है क्या? असं कोणी म्हणतं तेव्हा भावना दुखावल्या जातात. शाळेत असताना वगैरे असं कोणी म्हटलं तर वाईट वाटायचं. पण नंतर मला कोणी असं म्हटलं तर त्यांना हे कसं चुकीचं आहे हे पटवून द्यायचे. याबाबत काहींनी माझी माफीही मागितली आहे".
 
'अपमान मानू नका, मजा घ्या!'
कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. 'अलिबाग से आया है क्या?' हे वाक्य अलिबागकरांचा अवमान करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे यावर कोर्टाने बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
 
2019 साली मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि एन. एम. जमादार यांनी ही याचिका फेटाळून लावली होती.
 
"प्रत्येक समुदायावर विनोद केले जातात. संता-बंतावर, उत्तर भारतीयांवर, मद्रासी लोकांवर असे अनेक विनोद केले जातात. त्यामुळे यात वाईट वाटून न घेता त्यातून मजा घ्या," असं कोर्टाने म्हटलं होतं.