गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (16:13 IST)

व्यथा-बळीराजाच्या आणि... : चिंतनीय लेखसंग्रह!

दिलीप देशपांडे हे नाव सर्वदूर परिचित असे आहे. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रातून वैविध्यपूर्ण विषयांवर चौफेर लेखन करणारे अशी देशपांडे यांची ओळख आहे.
 
'सारांश' हा त्यांचा पहिला लेखसंग्रह आणि नुकताच प्रकाशित झालेला 'व्यथा- बळीराजाच्या... आणि...' हा त्यांचा दुसरा लेखसंग्रह! यावरून लेख लिहिण्यावर त्यांची किती हुकुमत आहे हे लक्षात येते. लेख लिहिणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही कारण जो विषय निवडतो त्या विषयाचा सखोल अभ्यास नि चिंतन, मनन करून नंतर शब्दात मांडावे लागते. काही विषय हे समाज जीवनाशी निगडित असतात अशा विषयांवर लिहिताना फार विचार करून आणि बारकाईने लिहावे लागते. एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर समाज मन दु:खित होण्याची शक्यता असते. परंतु लेखक देशपांडे यांनी ह्या साऱ्या गोष्टी सांभाळून प्रत्येक विषयाला न्याय दिलेला आहे त्यामुळे हा लेखसंग्रह वाचनीय, विचार प्रवर्तक असा झाला आहे.
 
संग्रहाचे शीर्षक आणि मुखपृष्ठ पाहता शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी लेख असणार हे लक्षात येते. कष्टकरी शेतकरी आणि नंतर नैसर्गिक कोप होऊ नये, निसर्गाची कृपा व्हावी म्हणून आकाशाकडे हात जोडून पाहणारा शेतकरी हे मुखपृष्ठ सारं काही स्पष्ट करणारे आहे. शॉपिज़न या संस्थेने अंत्यत आकर्षक आणि देखण्या स्वरूपात हा संग्रह प्रकाशित केला आहे.‌
 
लेखक देशपांडे ह्यांनी ३६ वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्षेत्रीय अधिकारी आणि वसुली अधिकारी म्हणून काम केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांशी, त्यांच्या अडीअडचणीशी त्यांचा अत्यंत जवळून संबंध आला आहे. यातून शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या संकटांचा सामना त्यांनी जवळून अनुभवला आहे. नुसताच पाहिला, अनुभवला असे नाही तर या समस्यांना लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्याची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले आहे.
 
या संग्रहात एकूण चोवीस लेख असून त्यापैकी चौदा लेख शेतकरी संदर्भातील आहेत. शेती आणि शेतकरी म्हटलं की, एक नाव ठळकपणे समोर येते ते म्हणजे शरद जोशी! या संग्रहात 'भिक नको हवे घामाचे दाम' हा  समीक्षात्मक लेख आहे. वसुंधरा काशिकर यांनी लिहिलेल्या 'शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा' या पुस्तकाची देशपांडे यांनी केलेली समीक्षा आहे. एकदा शरद जोशी यांच्याशी देशपांडे यांची बडनेरा रेल्वेस्थानकावर भेट झाली असताना देशपांडे वसुली अधिकारी आहेत हे समजताच जोशी एक मोलाचा सल्ला देताना म्हणतात, 'देशपांडे साहेब, आमचा शेतकरी गरीब आहे. कर्जवसुली करताना फार कठोरपणाने नका करत जाऊ. सहानुभूतीने घेत जा.'
 
'बळीराजाच्या व्यथा समजून घ्या..' ह्या लेखात शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयावर चर्चा करताना लेखक म्हणतात,'मशागती पासून ते उत्पादित मालाचा पैसा हातात पडण्यापर्यंतची जी व्यवस्था, प्रक्रिया (सिस्टिम) आहे, ती जर बघितली तर आपल्या सहज लक्षात येते...' अत्यंत बारकाईने केलले निरीक्षण आहे. बि-बियाणे खरेदीपासून ते माल विकून दाम हातात येईपर्यंत जो प्रवास आहे अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक, लुबाडणूक होते त्यामुळे शेतकरी अनेकदा रडकुंडीला येतो नि मग नको ते पाऊल उचलतो.
 
हमीभाव! शेतकऱ्यांनी कष्टाने, घाम गाळून पिकविलेल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. कधी हा अधिकार सरकारकडे, कधी हे कार्य व्यापारी तर कधी दलाल करतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, शेतकऱ्यांचा माल शेतात, झाडांवर डौलत असताना भाव भरतीवर असतात परंतु तोच दृष्ट लागणारा माल जेव्हा शेतातून घरी आणि बाजारपेठेच्या रस्त्यावर असतो तेव्हा मालाच्या भावाला अचानक ओहोटी लागते हे न समजणारे अर्थशास्त्र आपण अजून किती वर्षे राबविणार आहोत हे न कळे. या समस्येवर लेखक देशपांडे यांनी 'हमीभावाचे न जुळणारे समीकरण' या लेखात सविस्तर, वास्तव चर्चा केली आहे.
 
कर्ज आणि शेतकरी ह्या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू! प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कधी पूर्णतः कोरा होईल हे परमेश्वरालाही न सुटणारे कोडे आहे. विविध बँका आणि संस्था यांच्याकडून होणारा कर्ज पुरवठा एकतर पुरेसा होत नाही आणि वेळेवर कधीच होत नाही. कर्जाची रक्कम वेळीच शेतकऱ्यांच्या हातात पडली तर नडलेला शेतकरी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी इतरत्र हात पसरून वेगळा मार्ग स्वीकारणार नाही. याविषयावर लेखक सविस्तर चर्चा करुन कर्ज वितरणातील त्रुटी सोबतच खते- बियाण्यातील भ्रष्टाचार यावरही प्रकाश टाकतात. लेखक बँकेत वसुली अधिकारी होते त्यामुळे शेती, शेतकरी आणि त्यांच्या संदर्भातील प्रत्येक गोष्टीवर ते अधिकारवाणीने नि सानुभव टिप्पणी करताना मागेपुढे पाहत नाहीत. अनेक विषयातील बारकावे ते सहजतेने उलगडून दाखवतात. शिवाय ते एक महत्त्वाचे सत्य उजागर करतात, 'कर्ज बुडवण्याची शेतकऱ्याची मुळातच इच्छा नसते परंतु त्याला पिकत नाही आणि पिकले तर भाव मिळत नाही अशी कोंडी निर्माण करणारी अवस्था असते.' हा मुद्दा आपल्याला तेव्हा पटतो जेव्हा एखादा शेतकरी मेहनतीने पिकविलेला माल विक्रीला घेऊन जातो नि तिथे हिशोबाच्या आकड्यात गरगरताना वापस येतो तेव्हा अंगावर असलेली मजुरी द्यायला एक खडकू खिशात नसतो ती परिस्थिती किती केवलवाणी नि भयाण असते. असा शेतकरी कर्ज चुकवेल तरी कसा? त्यासाठी तो पुन्हा पुन्हा दरवर्षी नव्याने कर्जाच्या दलदलीत फसत जातो ही शोकांतिका कधी संपणार आहे?
 
सरकार, व्यापारी, दलाल यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांवर निसर्गाची कशी अवकृपा होते हेही लेखक लक्षात आणून देतात. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी तर कधी रुसलेला पाऊस हे सांगताना आपण प्रगतीकडे वाटचाल करीत असलो तरी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे ही बाबही लेखक निदर्शनास आणून देतात. दिलीप देशपांडे केवळ समस्या मांडून मोकळे होत नाहीत तर त्यावर मार्गही सुचवितात. शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी ज्या योजना जाहीर करते त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा जेव्हा पोहोचतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते ही बाब प्रखरतेने लेखक व्यक्त करतात.
 
आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती, वेळ आहे कृषी विभागाच्या नियंत्रणाची, शेतकऱ्याचे जीवनच संघर्षमय, राजकारणांच्या संवेदना बधिर झाल्या का?, जिल्हा बँका - राष्ट्रीयकृत बँका आणि शेतकरी, या नभाने या भुईला दान द्यावे इत्यादी लेखांमधून दिलीप देशपांडे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करून योग्य उपाय सुचवले आहेत.
        
सध्या आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत तेव्हा आपण काय कमावले आणि काय गमावले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे असे लेखक सुचवतात ते आवश्यक आहे. केवळ उदोउदो करून चालणार नाही किंवा निव्वळ टीका करूनही चालणार नाही. पंचाहत्तर वर्षे हा फार मोठा कालखंड आहे. या कालखंडात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. दोन्ही बाबींवर चर्चा होऊन त्यातील अमृत पुढील पिढीपर्यंत हस्तांतर करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच आहे. याच विषयाचा लेख वाचनीय आहे.
 
महाराष्ट्रातील दारिद्र्याची शोधयात्रा या लेखात याच विषयावर सांगोपांग चर्चा करताना हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या 'दारिद्र्याची शोधयात्रा' या पुस्तकाची ओळख करून देताना लेखक वास्तव परिस्थिती मांडतात.
 
'वाचाल तर समृद्ध व्हाल' हा लेख लेखकाने अत्यंत पोटतिडकीने लिहिला असल्याचे जाणवते. कारण आज सर्वत्र असा एक सूर ऐकायला मिळतो तो म्हणजे वाचनाची आवड कमी होत चालली आहे. नेमका हाच धागा पकडून लेखकाने अनेक गावातून, राज्यात, देशात आणि अगदी परदेशात सुरू असलेल्या वाचन संस्कृती संवर्धनाची विस्तृत माहिती दिली आहे. वाचनाच्या संदर्भात लेखकाने दोन्ही बाजूंवर सखोल प्रकाश टाकला आहे.
 
'एक चांगला माणूस- अनिल अवचट, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. रामदास कामत, स्वामी विवेकानंद, मी नथूराम गोडसे या व्यक्तिमत्वाशी खूप छान, अभ्यासयुक्त अशी माहिती लेखक दिलीप देशपांडे यांनी मांडली आहे. यावरून त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा, वैविध्यपूर्ण विषयाची माहिती संग्रहित करुन ती सुयोग्य, साध्या, सोप्या शब्दांत व्यक्त करण्याची तळमळ लक्षात येते.
 
'लाभले आम्हांस भाग्य... बोलतो मराठी' हा लेख जसा मराठीची थोरवी गाणारा आहे तसाच तो मराठी भाषेची परिस्थिती यावर दोन्ही बाजूंनी प्रकाश टाकणारा आहे. लेख चिंतनीय नि मननीय आहे. एकंदरीत संग्रहात समाविष्ट लेख वाचनीय आहेत. श्री दिलीप देशपांडे यांच्या आगामी लेखनास भरपूर शुभेच्छा!
                    
व्यथा- बळीराजाच्या आणि... लेखसंग्रह
लेखक : दिलीप देशपांडे
प्रकाशक: शॉपिज़न
पृष्ठसंख्या: ११३
मूल्य : ₹ २६८/-
आस्वादक: नागेश सू. शेवाळकर,
पुणे
(९४२३१३९०७१)