गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (14:53 IST)

"सारांश" || चिंतनीय, वाचनीय, लेखसंग्रह ||

saransh marathi book
वृत्तपत्र हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. राज्य, देश प्रदेश, जग, यातल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतात  त्यामध्ये वर्तमानपत्रे खूप मोठी भूमिका बजावतात. पेपर बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. बातमी पुरवणारी अनेक माध्यमे आता उपलब्ध आहेत. तरी वर्तमानपत्र हे अजूनही सर्वात जास्त विश्वासार्ह समजले जाते. वृत्तपत्रात अग्रलेखाला अनन्यसाधारण महत्त्व असते. वृत्तपत्राच्या ध्येय धोरणानुसार बातमी दिली जाते. बातमीतली, घटनेतली सत्यासत्यता पडताळणी जाते.. तितकाच महत्त्वाचा असतो अग्रलेखाच्या बाजूचा लेख. त्याला सेकंड आर्टिकलही म्हणतात. समाजातल्या ज्वलंत विषयावर आसूड ओढले जातात. चर्चा घडते. उहापोह होतो.
 
"सारांश" हे श्री दिलीप देशपांडे यांच्या अशाच लेखांचे एक अप्रतिम असे संकलन आहे. त्यांचे लेख मी नेहमीच वाचत असतो, ते आस्वादकाच्या भूमिकेतून. पण आता श्री देशपांडे मला चिकित्सक करत आहेत. अर्थात दोन्ही भूमिका मला आनंद देतात.
 
या 21 लेख संग्रहाच्या पुस्तकात अग्रस्थानी आहे शेगांव निवासी गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त लिहिलेला लेख. लेखक स्वतः हे महाराज यांचे भक्त आहेत. नागपूरच्या गणानाम् त्वां या महाराजांना वाहिलेल्या मासिकाचा त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण करीत असलेले कार्य हे सद्गुरू आणि महाराजांचा आशीर्वाद असेल तरच करता येणे शक्य आहे यावर देशपांडे आणि मी दोघांचाही दृढविश्वास आहे. महाराष्ट्राचा धर्म असलेल्या पंढरीच्या वारीवर ते खुप आत्मीयतेने लिहितात. रिंगणाचा अश्व आपल्या डोळ्यापुढे नर्तन करु लागतो, फेर धरतो. मनामध्ये भक्तीची तुळस फुलून येते.प्रस्तुत पुस्तकातले सगळे लेख लेखकाचा व्यासंग, दर्जा, शब्दकळा, यांचा परिचय करून देतात. ऐरणीवरच्या विषयाची निवड हे लेखकाचे वैशिष्ट्य आहे. या घडीचा विषय निवडणे ही सोपी गोष्ट नाही. नांदेड एकजूट ते दैनिक सामना मुंबई असा विस्तीर्ण कॅनवास ते रंगवतात तेव्हा त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येतो.
 
लेखक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकारी होते. वसुली तज्ञ म्हणून त्यांचा विशेष लौकिक होता. त्या अनुभवाचा प्रत्यय, बळीराजाने नाही केला पेरा तर... , जिल्हा बँका डबघाईला का आल्यात, जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, या (3,7,8 )या लेखामध्ये येतो. शेतीसाठी लागणारा पतपुरवठा कसा असावा ? त्याची गरज किती ? ती कधी पूर्ण झाली पाहिजे ? याचा अभ्यास पुर्ण ऊहापोह लेखक करतो. बळीराजाला होणारे त्रास, अडचणी, योग्य भाव न मिळाल्याने होणारी कुचंबणा, हे ते समर्थपणे अधोरेखित करतात. जिल्हा बँका डबघाईला का आल्यात यावर चर्चा करताना त्यांचा विशेष अभ्यास दिसून येतो. त्यांची शेती, शेतकऱ्या विषयी तळमळ कळकळ प्रकर्षाने जाणवते.
 
श्री देशपांडे हे स्वतः शेतकरी आहेत म्हणजे या प्रश्नाची जाण ही त्यांना थेट आहे. यात सांगोवांगीचा भाग नाहीच.
 
ना. धों. महानोर, आरती प्रभू, अशोकजी परांजपे (चार पाच सहा) या लेखांमधून त्यांचा साहित्यिक वर्तुळातला वावर दिसून येतो. ना. धों. महानोर, आणि अशोकजी परांजपे, अशा थोर साहित्यिकांचा प्रत्यक्ष सहवास लेखकाला लाभला हे भाग्यच म्हणायचे. आरती प्रभू हे मराठी काव्याला पडलेले स्वप्न असेच म्हणावे लागेल. कितीतरी तरल अर्थवाही स्वप्नमग्न, गुढ आणि अथांग कविता त्यांनी लिहिल्या. त्यातल्या अनेक कविता मंगेशकरांचे संगीत लतादीदी आणि आशाताई यांचा स्वर असा अप्रतिम मिलाफ होऊन येतात आणि मनावर गारुड करतात. त्यातल्या वेदना मनाला चटका लावतात.सुन्न करतात. मनावरच्या खपल्या काढतात. काळजात ठसठसतात, कारण त्या आपल्या असतात. लेखक स्वतः कवी आणि कविमनाचे आहेत. त्यामुळे खानोलकरांनवर  लिहिताना ते अजून हळवे होतात. अनेक कलावंतांनी आरती प्रभू यांच्या विषयी काढलेले उद्गार वाचतांना आपणही नकळत हळवे होतो. तसेच अशोक जी परांजपे यांच्यावरचा लेख वाचताना होते. अशोकजी परांजपे हे लोककलेचे चालते बोलते विद्यापीठ होते.आय. एन.टी.(इंडियन नँशनल थिएटर) चा इतिहास हा त्यांच्या उल्लेखाशिवाय सुरू होत नाही आणि संपणार ही नाही. अनेक ग्रामीण कलावंत त्यांनी प्रकाशझोतात आणले. आदरणीय महानोर अनेकांचे प्रेरणास्थान. कवी, गीतकार, विचारवंत, प्रगतिशील शेतकरी, विधानपरिषद सदस्य, म्हणून राजकारणी, आणि समाजकारणी, असे उत्तुंग व्यक्तिमत्व लेखकाने प्रत्यक्ष भेटून त्यांचे हे पैलू पाहिले आहे. अभ्यासले आहे.
 
आपण जरी लेखक कवी पत्रकार कलावंत अधिकारी वगैरे कुणीही असलो तरी समाजाचाच एक भाग असतो. सामान्य ग्राहक असतो. ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क कोणते आहेत ? आपण कुठल्या बाबींचे भान बाळगले पाहिजे ? याची माहिती लेखक देतो. आणि सुजाण ग्राहक होण्याची प्रेरणा ही देतो. समाजात अनेक अभियाने होत असतात .राबविण्यात येतात. त्यांचे यशापयश सर्वस्वी जनतेच्या लोकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागा वरच अवलंबून असते. प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध हवेत ही रास्त मागणी सामाजिक जाणिवेतून आलेली दिसते, याच जाणिवेतून ज्येष्ठांना सन्मानाची संध्याकाळ मिळाली पाहिजे हा विचार मांडला जातो. मोबाईलच्या अतिवापरा मुळे संवाद हरवून गेला आहे. ही आता फक्त लेखकाचीच नव्हे तर प्रत्येक सुजाण नागरिकांची खंत आहे. अर्थात हा तंत्रज्ञानाचा नाही तर वापरकर्त्यांचा  पराभव आहे.
आजकाल अनेक दिवस डेज साजरे होत असतात ही केवळ औपचारिकता आहे असे लेखकाला जाणवते. त्यातला फोलपणा त्यांना अस्वस्थ करतो. काय केले म्हणजे ते दिवस सार्थकी लागतील यावर आपले मत मांडतात.
 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. जबाबदारीचे भान ठेवून हे शस्त्र वापरले गेले पाहिजे. त्याचे अर्थशास्त्र नीति पूर्वक  सांभाळे पाहिजे. या प्रकारच्या भावना दर्पण दिनानिमित्त ते व्यक्त करतात.
 
साहित्य संमेलनामध्ये वृत्त माध्यमातून होणाऱ्या मनोराजनीकरणाचा आढावा घेताना अनेक मान्यवर लेखक पत्रकारांच्या मताची चर्चा केली गेली आहे. त्यात समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न दिसतो. किराणा दुकानातून वाइनला विक्रीला परवानगी देणाऱ्या शासकीय निर्णयावर साधक-बाधक विचार लेखक मांडतात तेव्हा त्यांच्या दूरगामी परिणामांची जाणीव त्यांना झालेली दिसते.
 
चांगला लेखक हा आधी चांगला वाचक असावा लागतो. तो ग्रंथप्रेमी असेल तरच आपले मनोगत समर्थपणे मांडू शकतो. कारण मुद्रण संस्कार होण्याआधी त्याच्यावर वाचन संस्कार झालेले असतात. प्रस्तुत लेखक ही कसोटी यशस्वीपणे पार करून आले आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येईल असे दोन लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. ग्रंथांली वाचक चळवळीत सक्रिय सहभाग असल्यामुळे वाचनालये साहित्य संवादाची केंद्रे व्हावीत असा आग्रह धरू शकतात. पुस्तकांच्या सहवासातले ते दिवस त्यांना आठवत राहतात. त्यांना ते क्षण रुपेरी वाटतात. ही सगळी पुस्तके सगळे ग्रंथ अर्थातच मराठीतच आहेत. आणि म्हणून दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात या शासकीय निर्णयाचा आढावा लेखक सहज घेउन जातो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह धरू शकतो.
 
लेखकाची भाषेवरची पकड सुंदर आहे. योग्य आणि अचूक शब्दासाठी ते अडत नाहीत. ओघवती भाषा परिणामकारक शब्दकळा वाचकाला गुंतवून ठेवते. मग तो लेख कवितेवरचा असो की पर्यावरणाचा असो किंवा बँकेवरचा असो, खोलवर अभ्यासामुळे असा परिणाम साधता येतो.
 
संग्रहाचे मुखपृष्ठ त्याला योग्य असेच आहे .प्रत्येकाने हा लेख संग्रह जरूर वाचावा असे आग्रहाने सांगावेसे वाटते. लेखनाचे स्वरूप जरी प्रासंगिक असले तरी विषय मात्र सार्वजनिक, सार्वकालिक, आहेत. लेखकाची लेखणी बहुप्रसवा राहावी, विविध विषय त्यांनी हाताळावेत, समाजातील दंभावर प्रहार करावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !
 
"सारांश"【लेख संग्रह】
लेखक-दिलीप देशपांडे
शॉपिज़न प्रकाशन
मुल्य.१८४/-
पुस्तकासाठी संपर्क
मोबा- ९९२६५७६४५५/८९९९५६६९१७
 
-प्रसाद दत्त पाठक
【डोंबिवली 】
मोबा.९८१९११२८०५