रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:20 IST)

आभास: उत्कृष्ट काव्यसंग्रह!

abhas book review
ऋचा कर्पे हे नाव मराठी साहित्य क्षेत्रात चांगल्याप्रकारे स्थिरावलेले असे नाव! त्यांच्या नावावर फारशी पुस्तके नसतील परंतु शॉपिजन या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून शेकडो लेखकांना एक सशक्त व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. मराठी विभाग प्रमुख या नात्याने शॉपिजन संस्थेकडून किमान शंभर सर्वांगसुंदर मराठी पुस्तकांचे प्रकाशन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. अनेक मराठी- अमराठी संस्थांशी त्यांचा जवळून संबंध  आहे. एक कल्पक, नियोजनबद्ध कार्यवाहक म्हणून त्यांचा निश्चितच नावलौकिक आहे.
 
नुकताच त्यांचा 'आभास' हा देखणा, आकर्षक, मनमोहक असा कवितासंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. प्रकाशक अर्थातच शॉपिजन साहित्य प्रकाशन संस्था! कोणत्याही पुस्तकाचे प्रथमदर्शनी आकर्षण म्हणजे मुखपृष्ठ! आभास या काव्यसंग्रहाचे अत्यंत विलोभनीय असे मुखपृष्ठ रेखाटले आहे... सारंग क्षिरसागर यांनी. मुखपृष्ठाच्या प्रेमात पडलेला माणूस जेव्हा अंतरंगात शिरतो त्यावेळी काही बाबी वाचकाला खिळवून ठेवतात त्या म्हणजे कागद, अक्षरांचा आकार, सजावट! या सर्व निकषावर आभास हा संग्रह सर्वोत्कृष्ट असा नक्कीच आहे. हे सारे निकष म्हणजे जणू शॉपिजन संस्थेचे ब्रीद आहे.
 
पुस्तकाच्या सुरवातीला शॉपिजनचे प्रमुख उमंग चावडा यांचे मनोगत आहे. कदाचित चावडा यांचे मराठी पुस्तकाला लाभलेले विचार आभाससाठी एकमेव असावेत कारण शॉपिजनकडून प्रकाशित होणाऱ्या मराठी पुस्तकावर मराठी विभाग प्रमुख म्हणून साहजिकच ऋचा यांचे विचार असतात. म्हणूनही आभास संग्रहाचे मोठेपण प्रतीत होते आहे. एवढेच या संग्रहाचे वैशिष्ट्य नाही तर या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभली आहे त्या अंजली राम मोघे ह्या ऋचा कर्पे यांच्या नात्याने काकू तर आहेतच परंतु त्या ऋचा यांच्या मार्गदर्शक, प्रथम वाचक आणि अर्थातच पहिल्या समीक्षकही आहेत. आपल्या मनोगतात ऋचा यांनी अंजली यांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे तो स्वाभाविकच आहे आणि ऋचा यांच्या विनम्र स्वभावाची ओळख देणारा आहे.
 
असे म्हणतात की, आई ही पहिली गुरु असते. ऋचा यांच्या आई सौ. उज्ज्वला कर्पे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष मुलीला योग्य संस्कारित केले. कर्पे कुटुंबीय जरी अनेक वर्षांपासून देवास(मध्यप्रदेश) मध्ये स्थलांतरित झाले असले तरी महाराष्ट्र राज्याशी आणि मराठी भाषेशी त्यांची जुळलेली नाळ खूप घट्ट आहे. तसेच ऋचा यांचा जन्म, शिक्षण जरी मध्यप्रदेशात झाले असले तरीही मराठी भाषेशी ऋचा यांचे घट्ट कायम ठेवण्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा अधोरेखित करण्यासारखा आहे. मराठी भाषेतील साहित्य निर्मितीसाठी त्यांनी लेकीला प्रोत्साहित केले. त्यांनी स्वतः ऋचा या आपल्या कन्येला समोर ठेवून कविता लिहिली आहे. उज्ज्वला कर्पे यांनी ऋचाबद्दल लिहिलेली कविता 'दोन शब्द' या लेकीला दिलेल्या आशीर्वादात्मक लेखात खास वाचकांसाठी दिली आहे. आई पुढे लिहितात, ऋचा यांच्या आजोबा-आजीला, काका-काकूंना साहित्य क्षेत्रात रुची होती. हाच साहित्य निर्मितीचा वारसा ऋचा यशस्वीपणे पुढे चालवित आहेत. आपल्या आईबद्दल ऋचा म्हणतात, आई माझी सर्वात जवळची पहिली मैत्रीण! 
 
आभास! हा ऋचा कर्पे यांचा कवितासंग्रह! नानाविध विषयांना वाहिलेल्या एकूण बत्तीस कविता या संग्रहात आहेत. त्यापैकी चार कविता या कविता या विषयी आहेत. कवितेबद्दल कवयित्री यांना कुणी विचारले की, 'तू कविता करते का?' खरेतर असा प्रश्न एखाद्या नवोदित कवीला विचारला तर तो अभिमानाने, 'होय! मी कवी आहे!' असे सांगेल परंतु ऋचा प्रांजळपणे लिहितात,
मी निरुत्तर होते या प्रश्नावर
"तू कविता करतेस का"
मी कविता करते का (असा प्रश्न कवयित्री स्वतःलाच विचारत उत्तर देतात)
मी कोऱ्या शुभ्र कागदावर
माझ्या मनातले विचार मांडते
पाणावलेल्या डोळ्यांनी
साठवलेल्या आठवणी सांगते.
 
मन मानवी शरीराचा अदृश्य असा अवयव असला तरीही संपूर्ण शरीराला हवे तसे नाचवत असते. त्यातच मनाला विचारांनी कवेत घेतले की, मग शरीराची अवस्था काही वेगळीच होते. ऋचा यांनाही मन आणि विचार त्रस्त, अस्वस्थ करतात. त्यावेळी त्यांच्या लेखणीतून सहजसुंदर विचार व्यक्त होतात,
मन म्हणजे काय?
नुसता विचारांचा कल्लोळ
भूत भविष्य वर्तमानाचा
असतो सारा घोळ...
 
सोप्या, सहज परंतु अर्थयुक्त अशा कविता रचण्यात ऋचा यांचा हातखंडा आहे. 'तिला जगू द्या' या आशयगर्भ कवितेची सुरवात कवयित्री मनाला भिडणाऱ्या शब्दांतून करतात,
ती इवलीशी उमलती कळी
नाजूक डहाळीवर नटलेली
सुंदर फूल होऊ द्या न तिला..
हक्क आहे तिला पण
फांदीवर बसून डोलण्याचा
 
थोडा खोलवर विचार केला तर ही कविता थेट स्त्रीभ्रूण हत्येवर हल्ला चढवताना दिसते. यातच कवयित्रीच्या लेखणीचे यश प्रतिपादित होते.
'स्त्री' एक सृष्टी निर्माती! स्त्रीबाबत न लिहिलेला लेखक विरळाच! ऋचा यांची 'स्त्री' कविता स्त्रीची महानता, तिची कर्तव्य दक्षता सिद्ध करणारी आहे. ऋचाचे शब्द...
"स्त्री" शब्दावर कविता लिहिणे
एवढे सोपे आहे का?
कारण स्त्री मात्र एक शब्द नव्हे
तर ती आहे संपूर्ण सृष्टी!
 
आपण भारतीय वेगवेगळे सण, उत्सव आणि दिन मोठ्या हौसेने, उत्साहाने साजरे करतो. मागील काही दशकांपासून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याची पद्धत रुढ होत आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा झाली, लेखन झाले. आभास संग्रहात 'व्हॅलेंटाईन डे' यावर एक वेगळी कविता वाचकांना वाचायला मिळते. यातून एक जाणवते ते हे की, एखाद्या गंभीर विषयावर मार्मिकपणे, सहजपणे, सुलभतेने लिहिण्यात ऋचा सक्षम आहेत. एक 'प्रियकर (आजोबा)' आपल्या 'प्रेयसीला' (आजीला) म्हणतात,
बरं, मग आज तू निवांत बसून माझ्या हातचा चहा घे!
कोबीचं फूल देत म्हणाले, डार्लिंग हैप्पी 'व्हॅलेंटाईन डे'!!

असे म्हणतात की, पहिले प्रेम आणि त्या प्रेमापोटी मिळालेली पहिली भेट अविस्मरणीय असते. पहिली भेट उत्कट असा प्रेमाविष्कार असतो. आजकाल प्रेयसीला किंवा होणाऱ्या पत्नीला मोबाईल भेट देणे ही पद्धत प्रचलित आहे.  आभास या संग्रहातील 'आऊटडेटेड मोबाईल' ही कविता अशाच आशयाची आहे...
असेल तो 'आउट डेटेड' पण मी
जपून ठेवला आहे फार
कारण तोच मोबाईल आहे
माझ्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार...
 
'आठवणींची दारं' ही उत्कट, तरल भावनांनी ओतप्रोत कविता थेट हृदयाचा ठाव घेते. या भावस्पर्शी कवितेच्या काही ओळी अशा...
पुन्हा एक नवीन पहाट उगवली
पुन्हा तुझी उणीव भासली...
पुन्हा आठवले तुझे ते डोळे सखोल
तू जवळ ये आणि एक शब्द तरी बोल..
पुन्हा माझी पहाट जिवंत करुन जा
नाही तर
तुझ्या आठवणींची दारं तूच लावून जा...
 
संसार फार कमी जणांना चुकवता आला असावा! सुख-दुःखांचा खेळ म्हणजे संसार! हाच धागा पकडून कवयित्री लिहितात...
ऊन सावलीचा 
हा खेळ खेळतांना
कधी खळखळून हसणे
कधी वाट आसवांना

आजोबांचे घर ही सिमेंटच्या जंगलात तशी कविकल्पना! मात्र, ज्यांनी कधीकाळी आजोबांचे घर, तिथल्या गमतीजमती, तिथले रुसवेफुगवे अनुभवले आहेत ते सारे आठवले की, त्यांच्या भावनांना ओलावा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ऋचा यांनी आजोबाच्या घरी खूप धिंगामस्ती केली आहे म्हणून त्यांचे अनुभवाचे बोल 'माझ्या आजोबांच्या घरी' या कवितेतून आपसूकच उमटतात. त्या लिहितात...
दिस गेले वर्षे सरली
आठवणींच्या लहरी
मन जातं अजूनही
माझ्या आजोबांच्या घरी...

आबालवृद्धांना, साहित्यिकांना आवडणारा आवडणारा महिना म्हणजे श्रावण! लहानपणी ऐकलेली 'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे' य कवितेची आठवण करुन देणारी 'श्रावण' ही वाचनीय आणि सर्वांना आवडेल अशी कविता आभास संग्रहात आहे...
बरसत्या श्रावण धारा, सखी माहेरीया जाते
नारळी पोर्णिमेचा सण भावंडांचे पवित्र नाते.
 
'अंदमान' हिंदू मानवाच्या मनातील एक महत्त्वाचा भाग! अंदमान आणि वीर सावरकर हे एक अद्भुत असे नाते आहे. अंदमान म्हटले की, आठवतात वीर सावरकरांना मिळालेल्या मरणप्राय यातना! हा धागा पकडून कवयित्री व्यक्त होतात...
नर्काच्या भोगुनी यातना वीर हुतात्मे जाहले
म्हणूनी आज आम्ही येथे स्वर्गसुख अनुभवले।
 
खरेतर ऋचा कर्पे यांची प्रत्येक कविता भावस्पर्शी, हृदयाला भिडणारी आहे. काही कविता निश्चित गेय आहेत. विविध भावभावनांचे मिश्रण असलेल्या कविता साध्या, सरळ भाषेत लिहिलेल्या आहेत. ओढूनताणून आणलेले शब्द कुठेही बसवलेले नाहीत. एक उत्कृष्ट असा काव्याविष्कार वाचायला मिळाल्याचे समाधान वाचकाला निश्चितपणे मिळते. कवयित्री ऋचा कर्पे यांच्या लेखनीला विविध विषयांचा सोस आहे. महाराष्ट्राशी तसा फारसा संबंध नसतानाही त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्त्व जाणवल्याशिवाय राहत नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. ऋचा कर्पे यांच्या आगामी साहित्य लेखनास अनंत शुभेच्छा! त्यांच्या लेखनीतून अधिकाधिक साहित्य प्रसवावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शॉपिजनच्या माध्यमातून मराठी भाषा साहित्य प्रसार व्हावा ही सदिच्छा!
 
आभास :- कविता संग्रह
कवयित्री:- ऋचा दीपक कर्पे
(९९२६५७६४५५)
प्रकाशक:- शॉपिजन. इन अहमदाबाद (गुजरात)
मुखपृष्ठ:- सारंग क्षीरसागर
पृष्ठसंख्या:- ६१
किंमत:- १५०/-
आस्वादक:- नागेश सू. शेवाळकर (पुणे)
(९४२३१३९०७१)