गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (15:12 IST)

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आंबेडकरनगर: प्रज्ञा बागुल यांचा वैशिष्टये पूर्ण कथासंग्रह

- पंडित कांबळे, उस्मानाबाद
आंबेडकरी साहित्यामध्ये कथा लेखन करणाऱ्या प्रज्ञा बागुल या 'आंबेडकरनगर या कथासंग्रहामुळे चर्चेत येत आहेत. त्यांनी यापुर्वीही अनेक समीक्षा लेखन, काव्यलेखन, कथालेखन केलेले आहे. स्त्री लेखिकामध्ये हिरा बनसोडे, उर्मिला पवार, कुमुद पावडे,   सुशिला मुलजाधव   प्रज्ञा दया पवार, प्रा. अरूणा लोखंडे, छाया निकम, आशालता कांबळे अशा नामवंत लेखिकेच्या यादीत प्रज्ञा घोडेस्वार यांचे नाव दाखल होत आहे. ही अभिनंदनिय बाब आहे. त्या 'आंबेडकरनगर या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांनी आंबेडकरी साहित्याबरोबरच मराठी - साहित्यात मोलाची भर घातली आहे 'आंबेडकरनगर' या कथासंग्रहामध्ये प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांनी सोळा कथांचा समावेश केलेला आहे. नुकतेच ह्या संग्रहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहे. त्यात आंबेडकरनगर नावाची ही पहिलीच कथा आहे. त्या कथेत लेखिका म्हणतात, शिकलेले मोठे झाले की आंबेडकर नगर विसरतात. संघर्ष  करणारा माणूस नेहमी जिवंत असल्याची खात्री हवी असेल तर आंबेड करनगरात जावे.  बऱ्याच वेळा माणूस बदलत असला तरी मानसिकता तीच आहे. बरेचरदा आंबेडकर नगरमधल्या माणसाला कोणताही आरोप लावून जेरबंद केले जाते. गाव वाळीत टाकते तेव्हा लेखिका म्हणते, आपल्या माणसाने दुकाने टाकले पाहिजे. किमान आपला माणूस चार पट वस्तू महाग तरी देणार नाही. म्हणून आपण स्वावलंबी झाले पाहिजे ही अपेक्षा या कथेतून व्यक्त होते. प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांनी आपल्या कथांमधून चालू घडामोडीचा वेध घेतला आहे. त्या एका सुईच्या टोकावर या कथेत मांडतात. मुलगा होण्यासाठी समविषम तिथी बघावी हे कायद्यात आहे काय ? समाज म्हणजे  प्रयोगशाळा नाही, टाईम हुकला की क्वालिटी खराब अस महाराजांना बोलण शोभत का? असा त्या सवाल करतात‌. आंबेडकरी समाजात हिंदुत्वातील कितीतरी विकृती घुसल्याचे दिसून येते. निळा गणपती कथेतून त्यांनी मांडल्याचे दिसून येते.
 
वस्तूस्थिती जगणारी माणस अल्प अपेक्षा ठेवतात. सामान्य माणसासोबत सत्ताधारी माणसे कशी मुजोरी करतात. ते बाजीरावाच्या रूपाने दाखविले आहे. सिनेमा नटी श्रीदेवी बाथटब मध्ये पडून मरते. बाजीरावाला वाईट वाटते. बाजीराव पाटील पक्का राजकारणी माणूस‌‌. भंगार विकणारा गाडी खाली मेला तरी काही वाटत नाही पण सेलिब्रिटी मेला की खूपच वाईट वाटते. हे विषमतावादी मानसिकतेचे वागणे सामान्य माणूस आणि सत्ताधारी माणूस यातून दाखविले आहे.
 
माणूस हा बुध्दीमान प्राणी असला तरी जनावरात देखील वात्सल्य भावना आहे हे तो विसरला आहे. वानरदेव हनुमान यासही आदिवासी, दलित की सुवर्ण म्हणून वाद होताना दिसून आला माणसाच्या मेंदूला फसविणारा दुसरा तिसरा कोणी नसून माणसाचाच मेंदू आहे, हे माणसाला कसे कळत. वानर म्हणतो माणस अंधभक्त झाली आहेत.  बँकेचे दिवाळे काढून विदेशात पळून जात आहेत. हे देशातील वास्तव चित्र लेखिकेने 'माणसाला माकड आणि माकडातला माणूस या कथेतून मांडले आहे.
 
आपला एक नातू शिवनेरी किल्ल्यावर सेल्फी काढता काढता पडला आणि अपंग झाला कशी काय आजची पिढी अशी निष्काळजी पोकळ विचारांची ? कणखर जगण्याची शिस्त, नियम काहीच नाही. असे आताच्या निष्काळजीपणे वागणार्या मुलांचे भविष्य चिंतेत आहे. सागरचे प्रतिभावर जीवापाड प्रेम पण तिला कारण न सांगताच ब्रेक अपचा निर्णय घेतो. प्रतिभा गरीब घरातील कष्टकरी मुलगी होती. भाजी, पोळी, खानावळ चालवत शिक्षण घेऊन बैंकेत काम करणारी. परंतू सागरला मात्र विदेशात सेटल व्हायचे होते. हा पुरुषी फसवेपणा लेखिकेने  'आॉपरेशन' या कथेतून मांडला आहे. महापुरूषांच्या विचारांचे विसर्जन कधीही होत नाही.   ते विचार प्रवाही असतात. एक इंजेक्शन विचारांचे जीवदान देऊ शकते. आणि एक इंजेक्शन अंधविश्वासाचे मरण देणारे ठरते.  पाटील काकुची नात एका चुकीच्या इंजेक्शनने मरते.  डॅाक्टरला देव मानणारे लोक आहेत. बळी जाणार्या कोंबड्या बकर्या आणि माणसात फरक नसतो. असा विश्वासाचा बैनर लावलेला असतो. पण एकदा इंजेक्शनची चूक होते. ते एक चुकीचे इंजेक्शन या कथेतून समाजात घडणारे वास्तव यातून उजागर झाले आहे. राधा आणि तुकाराम या शेतकर्यांना शेती शिवाय  जगण्याचे साधन नसते. त्यांनी पीकविमा भरलेला असतो.  बँकेच्या अधिकार्याचा फोन येतो. राधा उचलते. राधा बोलण्यापुर्वीच साहेब म्हणतो  तुमचे पीक कर्जाचे काम होईल, तुम्ही रात्री मुक्कामाला या"  शेतकर्याच्या बायकोला शरीर सुखाची मागणी करणारी ही भ्रष्ट अधिकाऱ्याची जात कोणत्या स्तराला पोचते याचे उदाहरण नितीभ्रष्ट पिक या कथेत प्रज्ञा बागुल यांनी रेखाटले आहे.

आजकाल राजकारण्यांचा खोटे बोलणे खोटा जाहीरनामा प्रसिध्द करणे खोट्या घोषणा करणे याला सत्तेत बदल झाला तरी सामान्य माणसाच्या जीवनात बदल होत नाही. कारण घोषणा पूर्ण न करणाऱ्या पक्ष्याच्या सरकारला बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? हाच मोठा प्रश्न आहे. असे लेखिका पुतळे आणि कावळे या कथेतून मांडतात. कारण जनता हे वास्तव सध्या भोगते आहे. ही आजची चिंतनीय बाब आहे. अनिसा इक्बालच्या लग्नाला अठरा वर्षे पुर्ण होतात. मुल होत नाही. बाळाचे स्वागत हेच गरीबाची श्रीमंती आहे.  अनिसाची मुलगी प्रतिकुल परिसस्थितीत शिकते आणि एक दिवस मोठी अधिकारी बनते.  तिला बंगला मिळतो ती आईला बाबासाहेबांचा फोटो दाखविते. या बाबासाहेबांमुळेच  मी या पदावर आहे आपण परिवर्तन मानणारी माणस. परिवर्तनाचे शुध्दीकरण करता येत नाही. ते अगोदरच शुध्द असते. मला आई तू शिकवून मोठ केलीस तूच माझा स्वाभिमान आहेस अशी ही स्त्री प्रधान कथा समानता या कथेमध्ये प्रज्ञा बागुल यांनी रंगविली आहे.
 
श्रध्दा ही आंबेडकरवादी मुलगी डी. एड. चालू असतांना ती गरोदर राहते. श्रध्दा आणि तिच्या नवऱ्याचा संवाद डोहाळे या कथेत मांडला आहे.
 
रायबा आणि रोजान पोटापाण्यासाठी साहेबाच्या घरी बंगल्यावर काम करतात. तिथेच कोपर्यात राहतात. साहेबांचा मुलगा त्यांना डर्टी पिपल म्हणतो. मुल मिटींग मिटींग खेळतांना रायबा म्हणतो "आपली मुल मेंबरसारखी बिझी झाली. मिटींग मिटींग खेळायच आणि काहीच करायच नाही. हे आजचे वास्तव राजकारण रायबा मांडतो. साहेब म्हणतो " तूम्हाला घरे देऊ, सर्व सुविधा देऊ, तूम्ही आम्हाला मतदान करा. म्हणून इलेक्शनच्या दिवशी ते मतदानाला जातात. तोपर्यंत साहेब आऊटहाऊसला कुलूप लावून पसार होतो‌. ही राजकारण्यांची फसवेगिरी भूक या कथेतून प्रज्ञा बागुल यांनी उघड केली आहे. पण जनता कधी सुधारेल ? कारण प्रत्येक माणसाची लोभाची भूक मोठी असते.
 
स्त्री कितीही मोठी असली तरी कर्तबगारी दाखवली तरी देखील ती श्रेष्ठ ठरत नसते. पायाखालची वाहन पायात शोभून दिसावी. त्याप्रमाणे स्त्रीने आपल्या पायरीप्रमाणे वागले पाहिजे. असे जोशी बाईचे किर्तन चालू असते. साठे मँडम प्राध्यापक झाल्या. त्या म्हणतात, जीवन जगण्याची ताकद आंबेडकरी विचारात आहे. मुलीला व मुलाला वेगळी वागणूक चालत नाही. हे नवऱ्या ला सांगते. आपली बायको कधीही आपल्याला विरोध करू शकत नाही. या विचाराला धक्का बसतो. नवऱ्याला धक्का बसतो. नवऱ्याला अटैक येतो. त्याला खरी प्रकाशाची वाट दिसते. ती प्रकाशवाट या कथेतून प्रज्ञा बागुल यांनी दाखवून दिले आहे.
 
सखाराम सुधाला म्हणतो, नदी सागरात मिळाल्यानंतर तिचे अस्तित्व असते काय? तू कितीही मोठी झालीस तरी तू माझ्या सेवेसाठी आहेस. अधिकार पुरूष गाजवितो आणि स्त्रिया फक्त कर्तव्य बजावतात. हे ऐकावे जनाचे करावे मनाचे या कथेतून पुरूषीवृत्ती कशी वरचढ असते हे प्रज्ञा बागुल यांनी कथेतून मांडले आहे. 
 
दिपंकर हौसिंग सोसायटीच्या तथागत निवासमध्ये राहणाऱ्या प्रांजलीची ही कथा आहे. तिचा सासरा गावचा सरपंच असतो. तो बर्यापैकी श्रीमंत असतो. घरी दत्ताचा फोटो, नित्यानंद महाराजांचा फोटो असतो. यांना वडील मानत असल्याचे सांगतो. त्यांच्यामध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व गौतम बूध्दाची मुर्ती असल्याचे सांगतो. गावातील लोकांसोबत सलोख्याचे संबध आहेत. सोबत घेऊन राहायचे म्हणजे काही गोष्टी चालायच्याच. नित्यानंद महाराजांच्या आश्रमाचे उद्घाटन सुनबाई प्रांजलीच्या हस्ते ठेवलेले असते. हे वडीलांना कळताच वडील प्रांजलीला राजाचा हत्ती लंगडत कसा चालतो हे सांगतात. यावरून प्रांजली महाराजांच्या आश्रमाचे उद्घाटन नाकारते. आणि वडीलांना हत्ती आता लंगडत नसल्याचे सांगते. हा लक्षणीय बदल हे सूचक परिवर्तन शरणागत या कथेत अतिशय परिणामकारकपणे आले आहे. 
 
राजकारणात सगळ महत्वाच असत. धर्म, जात, पैसा ही हत्यार सोबत असावी लागतात. प्रा. अस्मिता व साध्वी यांच्यातील हा संवाद बाईमाणूस ते बाईसाहेब या कथेत मार्मिकपणे व्यक्त झाला आहे. 
 
आंबेडकरनगर या कथासंग्रहामध्ये म्हणी, वाक्यप्रचार, सुविचारासारखी वाक्ये खूप प्रमाणात असल्यामुळे कथेची परिणामकता साधली आहे. त्या मनाची पकड घेतात. अनेक कथा चालू घडामोडीचा वेध घेऊन व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या आहेत. विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या आहेत. 
 
अगदी रोजच्या जीवन व्यवहारात घडणाऱ्या प्रसंगातून प्रज्ञा बागुल यांच्या कथा चिंतनीय आणि प्रबोधनात्मक रूप धारण करतात. या कथा आवाहक व प्रभावी आहेत. कथा आकाराने लघू असल्या तरी आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर आंबेडकरी मूल्यमापन जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. प्रतिके, प्रतिमा, म्हणी, वाक्यप्रचार, अलंकारिक भाषेसोबत विचारगर्भ आशय ही साहित्यमूल्ये लिखाणात गांभीर्य तसेच आशयघनता निर्माण करतात असे प्रस्तावनेत डॅा. आशा थोरात म्हणतात. दलित स्त्री क्रांतीप्रवण बनून बुध्दीप्रामाण्यवादी बनली. अंधश्रध्दा, सनातनी विचारांवरती तुटून पडते‌. एवढेच नव्हे तर ती राजकीय नेतृत्व ही खंबीरपणे करते. स्वतःचे निर्णय स्वतः घेते. हे लेखिकेने आपल्या कथांमधून अचूकपणे प्रतिबिंबित केले आहे. असे अभिप्रायात डॅा. छाया निकम लिहीतात. 
 
प्रज्ञा घोडेस्वार बागुल यांनी चित्रित केलेल्या या सर्व स्त्रिया सामाजिक बांधीलकी मानणार्या बुध्द आणि बाबासाहेबांचे आदर्श घेऊन जगणाऱ्या आहेत. आंबेडकरी भारत बनविण्याचे स्वप्न घेऊन वावरणाऱ्या जागृत स्त्रिया आहेत. कथनात्मक शैली आहे. 

सामान्य माणूस आणि सत्ताधारी माणूस या कथेत ही शैली प्रभावीपणे दिसून येते. असे डॅा. इंदिरा आठवले लिहीतात. भाकरीला आणि शिक्षणाला समान महत्व देऊन आम्हाला वडीलांनी घडविले. आज स्वार्थ हाच मोठा शत्रू आहे. अज्ञान हा त्याहीपेक्षा मोठा शत्रू आहे. असे लेखिका आपल्या जडणघडणीबाबत मनोगत लिहीते. 

या कथेच्या संदर्भात डॅा. आशा थोरात, डॅा. छाया निकम, डॅा. इंदिरा आठवले यांनी मांडलेले विचार हे लेखिका प्रज्ञा बागुल यांना प्रेरणा देणारे आहेत. ती प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे चालत रहावे. तसेच प्रज्ञा बागुल यांनी अनेक नवीन विषय घेऊन कथालेखन करावे. मराठी साहित्य समृध्द करावे ही अपेक्षा ठेवत त्यांच्या साहित्यकृतीस शुभेच्छा देतो. 
 
आंबेडकरनगर कथासंग्रह
लेखिका प्रज्ञा घोडेस्वार बागुल
प्रकाशक शॉपीजन पब्लिकेशन हाऊस अहमदाबाद
पृ.85 किंमत 165₹
संपर्क: 9926576455
लेखिका संपर्क: 8080453480
समिक्षक 
पंडित कांबळे
शिक्षक
उस्मानाबाद
9421356829