शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:12 IST)

शिवाईः दर्जेदार साहित्य विशेषांक!

शिवाई! हे नाव ऐतिहासिक आहे कारण हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाईदेवीच्या नावावरुन माता जिजाऊने आपल्या बाळाचे नाव 'शिवाजी' ठेवले आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अलौकिक, उत्तुंग अशी भरारी घेतली. हा सारा इतिहास सांगण्यामागची भूमिका म्हणजे 'शॉपिजन' या साहित्य संस्थेने नुकताच 'शिवाई' हा अत्यंत देखणा, आकर्षक गुढीपाडवा विशेषांक प्रकाशित केला आहे.
 
कोणत्याही पुस्तकाचे यशामध्ये त्या पुस्तकाच्या बाह्यांगाचा महत्त्वापूर्ण वाटा असतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ, कागद, छपाई, अक्षरांचा आकार, वापरलेली चित्रे, सजावट आणि मांडणी या बाबी महत्त्वाच्या असतात. या सर्व दृष्टीने शिवाई हा अंक अत्यंत सुबक, मनमोहक असा झाला आहे. अंक हातात घेतल्याबरोबर या सर्व गोष्टी वाचकाला आकर्षित तर करतातच परंतु अंतर्भूत असलेले साहित्य वाचायला भाग पाडतात. एकदा वाचक शिवाई अंकाच्या अंतरंगात शिरला की मग तो त्या साहित्यात रंगून जातो. पुस्तक हातावेगळे करण्याची इच्छा होतच नाही.

१८२ पानांच्या ह्या अक्षर शिदोरीत काव्यधारा, कथाविश्व, लेख, आरोग्य, व्यक्तीचित्रे, प्रवासवर्णन, नाट्यछटा आणि चविष्ट-पौष्टिक-खमंग-लज्जतदार अशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिलेली मेजवानी वाचकांना खिळवून ठेवते. शॉपिजन मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हा विशेषांक वाचक दरबारी सादर केला आहे. संपूर्ण चमू अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहे.
 
गुढीपाडवा विशेषांक असल्यामुळे पहिलीच कविता 'गुढीपाडवा-शुभेच्छा' आहे. प्रसिद्ध कवी 
डॉ. श्रीकांत औटी हे काव्यमय शुभेच्छा देताना लिहितात...
सोडुनी दुर्गुण, अवघे निश्चित
संकल्पाते मनी करोनी,
पाळु तयांना जीवन भरुनी
वेचु क्षण हे मनी आनंदुनी।
 
गुढीपाडवा! नववर्षाचा पहिला दिवस! नवीन काहीतरी संकल्प करण्याचा दिवस! कवी या कवितेतून अंगी असलेले सारे दुर्गुण सोडून देण्याचे सुचवितात शिवाय केलेले संकल्प जीवनभर पाळण्याचेही आवाहन करतात. फार मोठा आशय या ओळीत सामावलेला आहे कारण आपण आरंभशूर असतो. एखादा निश्चय धुमधडाक्यात करतो पण त्याची अंमलबजावणी करताना मात्र मागेपुढे पाहतो.

'गुढी उभारा गुढी' ही अरविंद ढवळीकर यांची कविताही वाचनीय आणि आगळावेगळा संदेश देणारी आहे. 'आज जाहली वेळ पुन्हा घालण्या साद एवढी, गड्यांनो गुढी उभारा गुढी' अशी शिकवण देणारी कविता निश्चितच आवडणारी आहे. विशाल कन्हेरकरही त्यांच्या कवितेतून भेदाभेदाच्या अमंगल चालीरिती तोडून, दुष्ट विचारांचा त्याग करुन एकतेचा मंगलमय प्रकाश सर्वत्र पसरविण्याचा सुंदर संदेश देतात.
 
मानवी मन हे अत्यंत चंचल असते ते कधीही, कुठेही विहार करते. कवी पांडुरंग कुलकर्णी यांच्या विचारांनी केवळ आकाशापर्यंत धडक मारली नाही तर आकाशात एक 'विचारांची आकाशगंगा' निर्माण केली आहे. चंद्रशेखर कासार यांची स्वागत - नववर्षाचे ही कविताही उत्तम आहे. नववर्षाचे स्वागत करताना काय काय करायचे आहे याचे वर्णन केले आहे. 'शृंगार' म्हटले की, आपल्या मनात वेगळेच विचार येतात. परंतु सायली कुलकर्णी यांनी एका वेगळ्या प्रकारचा 'शृंगार' खास 'शिवाई'च्या वाचकांसाठी आणला आहे. त्यासाठी त्यांची 'शृंगार मनाचे' ही कविता वाचलीच पाहिजे. 'सौभाग्याचे अलंकार' या कवितेतून सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी दागिने आणि आरोग्य यांची अत्यंत योग्य अशी सांगड घातली आहे. तसेच जयश्री जोशी यांनी आयुष्य आणि कल्पनेतील गणित आणि वास्तवातील गणित कधी जुळतच नाही याचे सुरेख वर्णन केले आहे.
 
निशिकांत देशपांडे यांची 'अन्याय का मनावर' वाचकाला स्वतःची अवस्था अशीच आहे अशी उतरली आहे. जीवन जगताना कसे कसे बदल होत जातात हे सांगून कवी म्हणतात,
"निशिकांत" का उगा तू बघतोस खोल इतका?
 आतून गाळ सारा, जल स्वच्छ फक्त वरवर
 
'बाईच्या जातीला' सौ. राधिका इंगळे यांची कविताही आशयपूर्ण आणि थोडी वेगळ्या अंगाने आलेली आहे. कवयित्री कवितेचा शेवट करताना म्हणतात,
आणि भोवतालचे जग
फिरताना दिसते
बाईच्या जातीला
फक्त बाईच्या जातीला...
 
सौ. भारती सावंत यांची 'सण नववर्षाचा' ही कविता गुढीपाडव्याचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे. अशा एकापेक्षा एक सुंदर, आशयघन कविता घेऊन शिवाई आपल्या भेटीला आली आहे. डॉ. श्रीकांत औटी ह्यांची 'चला वंदुया' ही कविताही नववर्षाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. काव्यप्रेमी वाचक नक्कीच या कवितांचे स्वागत करतील हे निश्चित!
 
'शिवाई' या विशेषांकात दुसरा भाग आहे तो म्हणजे कथाविश्व! एकूण दहा कथांनी हे कथाविश्व फुलले आहे. पहिलीच कथा आहे... वाटणी! ज्येष्ठ कथालेखक दीपक तांबोळी यांच्या लेखनीतून प्रसवलेली वाटणी कथा हृदयाचा ठाव घेणारी आहे. अंतर्मुख करणारी आहे. कथा विषय तसा नेहमीचाच आहे परंतु लेखकाने त्यात जीव ओतून दिला आहे. गावी असलेल्या इस्टेटीची वाटणी करताना होणारी चर्चा, एकमेकांशी असलेले संबंध हे सारे समोर येत असताना एक कथापात्र का कोण जाणे काही प्रमाणात वाचकांना 'व्हिलन' वाटायला लागते परंतु शेवटी हेच खलनायक पात्र सर्वांना आदरयुक्त वाटते. लेखक असे काय चक्र फिरवतात की, शेवटी वाचक एका वेगळ्याच मनस्थितीत जातो. तो विचार करायला लागतो, 'ते' पात्र घरात कायम घर करुन राहते.।असा अनाकलनीय शेवट करण्यासाठी लेखकाजवळ प्रचंड सामाजिक अनुभव, भरपूर अभ्यास असावा लागतो. विषयात नाविन्य निर्माण करण्याची लेखकाची  हातोटी वाखाणण्याजोगी आहे. 
 
या विशेषांकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अधूनमधून संपादिका ऋचा कर्पे यांच्या गुढी नात्याची, ती..., ह्या लघुकथा, प्रगती दाभोळकर यांची 'एका डायनिंग टेबलच्या भावना,  मयुरेश देशपांडे यांचे 'अलक', ऋचामायी यांच्या लघुकथा, अर्चना पंडित यांचा 'गुढीपाडवा नीट बोल गाढवा, दीपक कर्पे यांची 'होळी' लघुकथा इत्यादी साहित्यिक मेजवानीने विशेषांकाची लज्जत, गोडवा आणि आकर्षकता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे.
 
'शुभ्र सुवास' ही डॉ. वसुधा गाडगीळ यांची गुढीपाडव्याचा आणि एकत्रित कुटुंबाचा गोडवा वाढविणारी आहे. गुढीपाडव्याला सारे कुटुंब कशी तयारी करते याचे सुरेख वर्णन यात आले आहे. ते वाचनीय आहे.
 
प्रत्येक कथेचा शेवट हा नवीन कथेचा आरंभ असतो, तसेच जवळपास प्रत्येक कथेमध्ये मग ती लघुकथा असो की दीर्घकथा असो त्यात कादंबरीची बीजे असतात. 'वाळूवरची अक्षरं' ही मनाला भिडणारी, नात्या-नात्यातील संबंध, गोडवा, कडवटपणा, दुरावा, कर्तव्य अशा विविध भावनांना गुंफणारी ही कथा आसावरी वाईकर यांनी अत्यंत चपखलपणे रेखाटली आहे. ह्या विषयाचा आवाका, मांडणी, लेखिकेजवळ असलेली अनुभवाची शिदोरी पाहता हा विषय कादंबरीचा आहे. माझ्या या मताशी शिवाईचे अनेक वाचक सहमत होतील हे निश्चित! 
 
स्मिता भलमे यांची 'वारस' ही कथा वेगळ्या विश्वात नेणारी आहे. विषयाचा आवाका खूप मोठा आहे. तो कथेत सामावताना लेखिकेची धावपळ झाली असल्याचे जाणवते. दोन सवतींच्या जीवनावर आधारलेली कथा भावना हेलावून टाकणारी आहे. माझे प्रामाणिक मत आहे स्मिता भलमे यांनी ह्या कथेचे रुपांतर कादंबरीत करावे. फार जबरदस्त कादंबरी होईल हे निश्चित.
 
व्हि.आर.एस. अर्थात स्वेच्छानिवृत्ती! एकत्र कुटुंब आणि त्यातही सासू-सासऱ्यांच्या घरातील उपस्थितीचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने मनावर ठसविणारी ही कथा वाचनीय आहे, अनुकरणीय आहे. कथा छान रंगवली आहे.
 
सौ. समृद्धी कुलकर्णी यांची कथा अनमोल भेट! ही कथाही वेगळ्या धाटणीची आहे. विषयाचा आवाकाही मोठा आहे. आजीचे महत्त्व, तिची शिकवण आणि शेवटी आजीकडून एक सुंदर भेट यासाठी  ही कथा वाचायलाच हवी.
 
सौ. राजश्री भावार्थी यांची 'घे भरारी' ही कथा अनेक भाव-भावनांना घेऊन वाचक भेटीला आली आहे. या कथेत एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करताना सासू म्हणजेच 'सावली सुखाची' ही बाबही ठळकपणे स्पष्ट झाली आहे. सासू-सुनेच्या नात्याचे वेगळे कंगोरे या कथेतून जाणवतात. सारे काही व्यवस्थित चाललेले असताना कथानक अचानक एक वेगळे वळण घेते. काय होतो शेवट? तो तसा कुणामुळे होतो? यांची भावार्थी यांची भावगर्भ कथा वाचायलाच हवी.
 
डॉ. श्रीनिवास आठल्ये! साहित्य प्रांतातील एक प्रमुख व्यक्ती! त्यांची 'शार्दूल म्हणतात मला!' ही कथा या विशेषांकाचे आकर्षण ठरावी. परदेशात नोकरीसाठी गेलेल्या मुलाच्या आईची एकाकी स्थिती खूप छान व्यक्त झाली आहे. परंतु ह्या एकाकीपणातही त्यांनी केलेले कार्य अनेकांना लाजवेल असेच आहे. दुःखी मनाला आनंदी आणि परोपकाराकडे वळविण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. 
 
साहित्याच्या मांदियाळीत अस्मादिकाचीही 'बापः हसू आणि आसू' ही कथा आहे. त्याबद्दल मी काय बोलावे? 
 
विलास कोळी ह्यांच्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सोबतच्या आठवणी, तसेच दीपक कर्पे ह्यांच्या पद्मभूषण कुमार गंधर्व सोबतच्या आठवणी "व्यक्तीचित्रे" ह्या विभागात आहे. 
 
"कबीरा उभा बाजारात", ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर ह्यांच्या विस्तृत लेख पण अतिशय माहितीपूर्ण आहे.
 
एकंदरीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऋचा कर्पे यांनी संपादित केलेला आणि शॉपिजन या संस्थेने प्रकाशित केलेला 'शिवाई' हा विशेषांक कविता, कथा, लघुकथा, लेख, व्यक्तीचित्रे, प्रवासवर्णन, नाट्यछटा, आणि रेसिपी असा विविधांगी चविष्ट, पौष्टिक, खमंग, लज्जतदार आणि  'जो जे वांछिल तो तें लाहो' असा सर्वोत्कृष्ट, सर्वांगसुंदर खजिना आहे हे निश्चित! संपादिका ऋचा कर्पे, शॉपिजन परिवार, शिवाई अंकातील सर्व साहित्यिक यांचे मनापासून अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा!!
 
नागेश सू. शेवाळकर
पुणे (९४२३१३९०७१)