मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : गुरूवार, 5 नोव्हेंबर 2015 (16:59 IST)

पुस्तक परिचय: यशोदीप

करिअरच्या वाटा शोधण्यास मदत करणारे उपयुक्त पुस्तक - यशोदीप
 
इयत्ता दहावी-बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे. याचे कारण आवती-भोवतीचे जग झपाट्याने बदलत आहे. 
 
या बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहिला पाहिजे ही प्रत्येक पालकाची काळजी दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या पाल्यास कोणत्या दिशेने घेऊन गेल्यास त्याचे करिअर घडेल याचा विचार आज प्रत्येक पालक करतांना दिसतो आहे. हे एक सुचिन्ह मानले तर समाजाचा ओघ कोणत्या दिशेने चालला आहे हेही चटकन ओळखून येते. अशी करिअर दिशा विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गाला देण्यात मंगेश विठ्ठल कोळी यांनी लिहिलेले हे छोटेखानी पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल असे वाटते.

मंगेश कोळी हे पेशाने पत्रकार आहेत. समाजाला उपयुक्त ठरतील अशी लेखमाला त्यांनी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रातून लिहिली आहे. अशाच प्रकारच्या लेखन मालेतील करिअर विषयांवरील कांही निवडक लेख त्यांनी या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. ते लक्ष देऊन मनापासून वाचणे महत्वपूर्ण ठरेल. अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकडे वळालेला प्रचंड ओघ पाहता हे पुस्तक तुम्हांला कलात्मक जीवनाचा आस्वाद घेता-घेता चार पैसे खिशात टाकायला मदत करणारे आहे. 

पत्रकारिता एक उत्तम करिअर या लेखातून लेखकाने  पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. २१ व्या शतकात विविध इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या सहाय्याने पत्रकारिता किती सोपी आणि आकर्षक करिअर संधी निर्माण झाली आहे. हे अत्यंत सध्या व सोप्या भाषेत सांगितले आहे. तसेच नृत्य हे एक उत्तम करिअर करण्याची जागा आहे. ग्रामीण भागातील कांही पाल्य आणि पालकांना या करिअर संधीबद्दल संकोच वाटण्याची शक्यता  आहे परंतु आज जग ज्या गतीने बदलत आहे. त्या बदलाबरोबर तुम्ही राहिलात तर टिकाल अन्यथा बाहेर पडल अशी परिस्थिती येऊ घातली आहे. अशा परिस्थितीत करिअर निर्माण करायचे असेल तर ग्रामीण, शहरी असा भेद निर्माण करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शिक्षक किंवा ट्रेनर म्हणून या क्षेत्राकडे वळण्यास हरकत नसावी. हे लेखकाचे मत विचारात घेऊन करिअर शोधणे सोपे करण्यास हे पुस्तक नक्कीच मदत करेल.
 
हॉटेल मॅनेजमेंट सारख्या सध्या चालती असण-या कोर्सेसमधून स्वतःचे करिअर खूप चांगल्या प्रकारे शोधता येते. हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सेसमध्ये अनेक लहानमोठे कोर्सेस उपलब्ध असून त्या त्या विभागात आपले कौशल्य दाखवून आपल्या करिअरला आकार देता येतो. हे लेखक मंगेश कोळी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितले आहे.
 
मुळातच पुस्तकाचा आकार आणि आशय छोटेखानी असल्याने करिअरच्या वाटा या पुस्तकात मर्यादित स्वरुपात आल्या आहेत. या पुस्तकात नमूद नसलेल्या अन्य विषयावर देखील लेखकाचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे लेख व पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणजे महत्वाच्या आणि थोदेफात प्रचलित नसलेल्या विषयांवर वाचकांचे आणि उपयुक्तांचे लक्ष वेधणे हा हेतू आहे असे हे पुस्तक वाचतांना लक्षात येते. मंगेश कोळी हे पत्रकारितेत असल्याने जास्तीत जास्त करिअरच्या वाटा शोधण्यास मदत करणारे विषय यापुढे  निश्चितपणे वाचकांना सादर करून समाजाची गरज भरून काढतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
पत्रकार हे जेंव्हा पुस्तक लेखक म्हणून समाजापुढे येत असतात  तेव्हा ते वृत्तपत्र सृष्टीपेक्षाही एक वेगळी सामाजिक बांधिलकी घेऊन येत असतात. हे या पुस्तकातून दिसून येते यातच मंगेश कोळी यांचे कौतुक आहे. महाराष्ट्रातील धडाडीचे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांच्या कवितासागर प्रकाशनाच्या वतीने करिअरच्या वाटा शोधण्यास वाचकांना निश्चितपणे मदत करणारे ‘यशोदीप’ हे आणखी एक समाज उपयुक्त पुस्तक रसिक वाचकांच्यासाठी उपलब्ध झाले आहे; ही अत्यंत आनंदाची बाब असून लेखक व प्रकाशक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप  
शुभेच्छा! 

o   शीर्षक -  यशोदीप 
o    लेखक -  मंगेश विठ्ठल कोळी
o   मूल्य -  मूल्य 75/- रुपये
o    विषय -  व्यक्तिमत्व विकास
o   प्रकाशक - डॉ. सुनील पाटील
o   प्रकाशन - कवितासागर प्रकाशन
o   संपर्क - 02322 - 225500, 09975873569 [email protected], [email protected]