मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:28 IST)

वाचा, कोणाला मिळणार सवलतीचे गुण, कोणता निर्णय झाला ?

who will get the concession points
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षां गायकवाड यांनी दिली आहे. 
 
करोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन २०२१-२२ या वर्षांकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ २०२१-२२ च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.