शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णसंख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली जाणार

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी अधिका-यांना दिले.
 
रुग्णसंख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली जाणार आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येईल. नारी संस्थेची लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड नियंत्रणासाठी त्याचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॅब 24 तास कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधितांना आयुक्त पाटील यांनी सूचना दिल्या. नारी संस्थेची लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 
कोरोनाबाधित व्यक्तींमार्फत या आजाराचा प्रसार होणार नाही यासाठी कोरोनाबाधित रुग्णाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्येनुसार घर, इमारतीतील काही भाग अथवा संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मास्क न वापरणा-या, थुंकणा-या तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये मार्शल नेमण्यात येणार आहेत.
 
याशिवाय महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांच्या फिरती पथकांद्वारे देखील अशी कारवाई केली जाणार आहे. विनापरवाना लग्न समारंभ वा इतर सोहळ्यांचे आयोजन करणे. तसेच परवानगीपेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास अशा समारंभांच्या आयोजकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आणि महापालिका यांचे संयुक्त भरारी पथक शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यरत असणार आहेत. या भरारी पथकांद्वारे हॉटेल तसेच तत्सम ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करण्यात येणार आहे.