भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात?; AIIMS प्रमुखांचे महत्वपूर्ण वक्तव्य
दिल्ली
देशातील करोनाविरोधातील लसीकरण (COVID19 Vaccine) मोहीमेला आता जोर धरू लागला आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू आहेच. पण आता सप्टेंबरपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे संकेत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी दिले आहेत.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, 'करोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. माझ्या माहितीप्रमाणे जायडस कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची ट्रायलही (Bharat Biotech's Covaxin trials for children) लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.'
तसेच, 'भारतात सध्या वयस्कर अशा ४२ कोटी लोकांना करोनाची लस दिली गेली आहे. आतापर्यंत देशभरात जवळजवळ ६ टक्के लोकांना करोनाची लस मिळाली आहे. सरकारने या वर्षाच्या अखेर पर्यंत सर्व वयस्कर लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी जवळजवळ १ कोटी लस दरदिवशी द्यावी लागणार आहे. सध्या दिवसाला फक्त ४० ते ५० लाख कोरोनाची लस नागरिकांना दिली जात आहे. या व्यतिरिक्त २१२१ अखेर पर्यंत १८ वर्षावरील नागरिकांना सुद्धा लस दिली गेली पाहिजे असा ही सरकाराचा विचार आहे.' असंही ते म्हणाले.