सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (18:10 IST)

कोरोना: कोव्हिडमधून बरं झाल्यावरही दुर्लक्ष नको, डॉक्टर काय काळजी घ्यायला सांगताहेत?

सरोज सिंह
"आता बरं वाटतंय? रिपोर्ट निगेटिव्ह आले का?"गेल्या काही दिवसांत तुम्ही हा प्रश्न काही जणांना विचारला असेल किंवा तुम्हालाही कोणीतरी हेच विचारलं असेल.
 
आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दलच्या भावना कदाचित कोणत्याही सरकारी आकडेवारीत तोलता येणार नाहीत. पण तरीही आकड्यांच्याच भाषेत बोलायचं झाल्यास देशात जवळपास दोन कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत. बरं झालेल्यांमध्ये कदाचित तुम्ही स्वतः असू शकता किंवा तुमच्या जवळची माणसं असू शकतात. या सगळ्यांसाठीच ही माहिती आहे. कारण कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाहीये.
 
कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेक लोकांना इतरही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अगदी बारीकसारीक कामं केल्यानंतर थकवा जाणवत आहे, तर काही जणांना श्वास घ्यायला त्रास होतोय. काहीजणांना हृदयाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत, तर काही जणांना इतर काही त्रास जाणवू लागले आहेत
 
त्यामुळेच डॉक्टरांच्या मते कोव्हिडमधून बरं झाल्यानंतरही काळजी घेणं गरजेचं आहे.
 
कोव्हिडच्या काळात तुम्ही स्वतःची जितकी काळजी घेतली असेल, तितकीच काळजी कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर काही आठवडे किंवा अगदी काही महिने घ्यायला हवी. थोडासा निष्काळजीपणाही घातक ठरू शकतो.
 
कोव्हिड19 चा शरीरावर होणारा परिणाम
कोव्हिड19 मुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होतो, हे समजून घेणं आवश्यक आहे.
 
अजूनही अनेक लोकांना कोव्हिड हा सर्दी-तापासारखाच आजार आहे, असं वाटतं. कोव्हिड19 मुळे केवळ फुफ्फुसांवर परिणाम होतो, असाही अनेकांचा समज आहे.
पण असं नाहीये.
 
हा आजार नवीन आहे आणि तो हळूहळू रुग्णाचं शरीर कसं पोखरत जातो, याबद्दल माहिती समोर येत आहे.
 
कोव्हिड19 चा हृदय, मेंदू, स्नायू, धमन्या आणि रक्तवाहिन्या, डोळे तसंच शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच हार्ट अटॅक, डिप्रेशन, थकवा, अंगदुखी, रक्ताच्या गुठळ्या होणं तसंच म्युकोरमायकोसिस असे आजार कोव्हिडमधून बरं झालेल्या रुग्णांमध्ये दिसत आहेत.
 
त्यामुळेच कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर शरीरामध्ये कोणतेही बदल जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
 
सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी बरं झाल्यानंतर काय काळजी घ्यावी?
भारत सरकारच्या मते 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण घरी राहूनच बरे होत आहेत. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र तरीही त्यांनी कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर सतर्क राहण्याची गरज आहे.
 
त्याबद्दल बोलताना सर गंगाराम हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एसपी बायोत्रा सांगतात, "सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पूर्णपणे बरं व्हायला 2 ते 8 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. हा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो.
 
अशक्तपणा, काम केल्यानंतर थकवा येणं, भूक न लागणं, खूप झोप येणं किंवा झोप न लागणं, अंगदुखी, अस्वस्थपणा अशी लक्षणं सौम्य कोव्हिड19 रुग्णांमध्ये बरं झाल्यानंतरही दिसून येतात."
डॉ. एसपी बायोत्रा स्वतः कोव्हिड रुग्णांवर उपचार करत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या आणि कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना ते सल्ला देतात-
 
जर तुम्हाला बरं वाटत असेल, तर निगेटिव्ह रिपोर्टसाठी पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. 14 दिवसांनंतर आयसोलेशनमधून तुम्ही बाहेर येऊ शकता. भारत सरकारनेही यासंबंधी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
बरं होत असताना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. प्रोटीन आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे, कारण या आजारात शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.
जर भूक लागत नसेल, तर थोड्या-थोड्या वेळानं खा आणि भरपूर पाणी प्या.
नियमित योगा आणि प्राणायाम करा. श्वसनाचे व्यायाम करा. एकाचवेळी खूप कामं करू नका.
बरं झाल्यानंतर काही दिवस (15 ते 30) ऑक्सिजन पातळी, ताप, ब्लड प्रेशर, शुगर तपासत राहायला हवी.
गरम किंवा कोमट पाणीच प्या. दिवसातून दोन वेळा वाफ नक्की घ्या. 8-10 तासांची झोप गरजेची आहे. नीट विश्रांती घ्या.
7 दिवसांनंतर डॉक्टरांकडे फॉलो-अपसाठी नक्की जा.
डॉक्टर बायोत्रा यांच्या मते कोव्हिड19 ची सौम्य लक्षणं असलेले रुग्ण 10 ते 15 दिवसांत त्यांची कामं सुरू करू शकतात. हळूहळू दैनंदिन कामं पूर्ववत करू शकतात. डॉक्टरांनी जर काही औषधं-गोळ्या बरं झाल्यानंतरही घ्यायला सांगितली असतील तर ती आवर्जून घ्या. कोणतीही औषधं बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला जर कोणत्या सहव्याधी असतील तर डॉक्टरांनी बरं झाल्यानंतरही घ्यायला सांगितलेली औषधं काळजीपूर्वक घेतली पाहिजेत. अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
 
अशाच पद्धतीच्या काही सूचना भारत सरकारनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामध्येही बरं झाल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला होता.
 
कोव्हिडमधून ठीक झालेल्या रुग्णांनी धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला जातोय.
 
डॉक्टर बायोत्रांच्या मते घरी राहून बरं झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. एखादी गोष्ट लक्षात येत नसेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
 
गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांनी काय करावं?
दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पल्मोनोलॉजिस्ट असलेले डॉक्टर देश दीपक सध्या कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार करत आहेत.
 
बीबीसीशी फोनवरून साधलेल्या संवादात त्यांनी म्हटलं, "जे गंभीर रुग्ण कोव्हिडमधून बरे होऊन घरी आले आहेत, त्या सर्वांसाठी एकसारखी गाईडलाइन असू शकत नाही. रुग्णांची रोग प्रतिकारकशक्ती आणि केस-टू-केस प्रतिसादाच्या आधारेच याकडे पहायला हवं."
त्यांच्या मते शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहण्यासाठी द्रव पदार्थांचं सेवन, चांगला आहार आणि थकवा येईल एवढ्या प्रमाणात काम न करणं ही पथ्यं तर गंभीर संसर्गातून बरं झालेल्या रुग्णांनी पाळणं आवश्यक आहे.
 
गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सांगितलं की, ज्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसतात त्यांना बरं होण्यासाठी तीन महिन्यांपर्यंत कालावधी लागू शकतो. जे रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात उपचार घेऊन परतले असतील, त्यांची प्रकृती सुधारण्यास इतरांच्या तुलनेत अधिक वेळ लागू शकतो.
 
मात्र या काळात त्यांनी केवळ अंथरुणावरच पडून राहायला हवं असं नाही. त्यांनी बरं झाल्यावर श्वसनाचे व्यायाम, प्राणायम करून दिवसाची सुरूवात करावी. हळूहळू आपल्या दिनचर्येतील इतर गोष्टी सुरू करायला हरकत नसते.
 
डॉक्टर देश दीपक यांच्या मते, "अशा रुग्णांना मानसिक-सामाजिक आधाराची अधिक गरज असते. विशेषतः वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तिंना. घरी आल्यावरही ऑक्सिजनची पातळी तपासणं किंवा स्वतःला ऑक्सिजन लावणं, वेळच्या वेळी औषधं खाणं- अशा छोट्या छोट्या गोष्टीही मानसिकदृष्ट्या या रुग्णांसाठी त्रासदायक ठरु शकतात.
 
अशा परिस्थितीत कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य महत्त्वाचं ठरत. आवश्यकता वाटल्यास मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन घ्यायलाही हरकत नाही. सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे."
गंभीर संसर्गातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांना घरीसुद्धा काही दिवसांसाठी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असू शकतो. अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्यानं ऑक्सिजनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
 
डॉक्टर देश दीपक सांगतात की, मध्यम ते तीव्र स्वरुपाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णाला काही ना काही त्रास होतोच असं नाही. काही तुरळक रुग्णांमध्येच असे त्रास उद्भवतात.
 
त्याप्रकरणी बोलताना ते सांगतात, "काही रुग्णांना भविष्यात फुफ्फुसाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. काही रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजार दिसून येतात. अशा रुग्णांसाठी कोणत्याही ठराविक सूचना देता येत नाहीत. या रुग्णांनी बरे होताना आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यायला हवेत."
 
जागतिक आरोग्य संघटनेकडूनही यासंबंधी कोणतीही विस्तृत्व मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली नाहीयेत. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात हॉस्पिटलमधून परतलेल्या रुग्णांचा फॉलो अप तसंच लो-डोस अँटीकॉग्युलंट किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
त्याबद्दल बोलताना देश दीपक यांनी म्हटलं की, रुग्णाला बरं झाल्यानंतरही अँटीकॉग्युलंट किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधाची गरज आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावं.
 
याशिवाय काही रुग्णांमध्ये हॉस्पिटलमधून परतल्यावर अशक्तपणाचीही समस्या जाणवते. त्यासाठी त्यांना प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
कोव्हिडमधून बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये औषधांचे साइड इफेक्ट हे काही आठवड्यांनंतर जाणवायला लागतात. काही रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजार होत असल्याचं दिसून येत आहे.
 
त्यामुळेच रुग्णांनी बरं झाल्यानंतरही आपल्या शरीरातील बदलांकडे लक्ष यायला हवं. शिवाय रुग्णालयातून घरी आल्यानंतर 15 दिवसांनी डॉक्टरांना भेटायला जायला हवं. यादरम्यान डॉक्टरांनी कोणती टेस्ट करण्याचा सल्ला दिला, तर ती नक्की करून घ्यायला हवी.
 
मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणंही खूप गरजेचं आहे.