गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 12 मे 2021 (13:09 IST)

सांगलीच्या आयसेरा बायोलॉजीकडून कोरोनावर प्रभावी औषधाचा दावा

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आयसेरा बायोलॉजी या कंपनीने कोरोनावर इंजेक्शनच्या रुपात प्रभावी औषध तयार केल्याचा दावा केलाय. या कंपनीने तयार केलेल्या अँटिकोविड या इंजेक्शनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यानंतर कंपनीने आता इंजेक्शनची मानवी शरीरावर चाचणी करण्यासाठी आयसीएमआरकडे परवानगी मागितलीय. कंपनीच्या दाव्यानुसार सर्व प्रक्रिया आणि चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यास अँटीकोविड इंजेक्शन कोरोना रुग्णासाठी संजीवनी ठरणार आहे. तसा दावा कंपनीने कालाय. ही कंपनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत रेबीज, सर्पदंश अशा रोगांवरील औषधांचे निर्माण करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनावर शोधण्यात आलेल्या औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.
 
कोरोनाला थोपवण्यासाठी या कंपनीने कोरोनाचे विषाणू घोड्याच्या शरीरामध्ये कृत्रिमरित्या टाकले. तसेच त्यानंतर या घोड्याच्या मदतीने कंपनीने प्रतिजैविके तयार केली. नंतर प्रतिजैवीके असलेल्या घोड्याच्या रक्तातून अँटिसेरा काढला. तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या या कंपनीने ‘अँटिकोविड सीरम’ चे तीन लाख डोस 
तयार केले आहेत. केंद्राच्या परवानगीनंतर महिन्याला 9 लाख डोस तयार करण्याची या कंपनीची तयारी आहे.
 
कंपनीने हे औषध तयार करण्यासाठी जवळपास मागील सहा महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरममधील संशोधकांच्या अभ्यासाचा यासाठी उपयोग केला गेला. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर याच औषधाचे महिल्याला 9 लाख डोस तयार करण्यात येतील. इंजेक्शनच्या रुपात हे औषध रुग्णांना देण्यात येईल. कोरोनाच्या कोणत्याही स्टेनवर हे इंजेक्शन उपयुक्त ठरेल असा दावा कंपनीने केलाय.
 
दरम्यान, आयसेराने तयार केलेल्या इंजेक्शनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली असली तरी मानवी शरीरावर प्रयोग करण्यासाठी आयसीएमआरची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठीची प्रक्रिया नुकतीच सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनीदेखील शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.