मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:45 IST)

सातारा, रत्नागिरी, सांगलीसह अन्य जिल्हे व तालुक्यात भूकंपाचे दोन धक्के

सातारा, रत्नागिरी, सांगलीसह अन्य जिल्हे व तालुक्यात आज  दुपारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० व २.८ इतकी होती. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. पाटण तालुक्यात यातून प्रथमदर्शनी कोणतीही हानी झाली नाही, अशी माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिली. 
 
मंगळवारी  दुपारी ३.२१ वाजता पहिला ३.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली १६ किलोमीटर अंतरावर होती. त्यानंतर काही मिनिटांत दुपारी ३.३३ वाजता दुसरा २.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावरच होता. त्याची खोली १५ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंप मापन केंद्र कोयनानगर येथून देण्यात आली. 
 
या दोन्ही भूकंपांची खोली अधिक असल्याने रिश्टर स्केलवरील त्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले. हे भूकंपांचे धक्के पाटण, कराड, सातारा, चिपळूण तालुक्यांसह वारणा खोर्‍यातही जाणवले. या भूकंपांचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या शिवाय पाटण तालुक्यात सर्वत्र या भूकंपांचे धक्के जाणवले असले तरी प्राथमिक माहितीनूसार कोठेही हानी झालेली नाही.