सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (15:41 IST)

कोरोना : स्टिरॉईडचा अनियंत्रित उपचार धोक्याचा?

मयांक भागवत
कोरोना संसर्गाविरोधातील युद्धात 'स्टिरॉईड' हे डॉक्टरांच्या हाती असलेलं एक महत्त्वाचं शस्त्र मानलं जात आहे. पण, 'स्टिरॉईड' चा अनियंत्रित वापर, दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय.
 
तज्ज्ञ सांगतात, गंभीर स्वरूपाचा कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांचा 'स्टिरॉईड' मुळे जीव वाचतोय. पण, याच्या भरमसाठ वापरामुळे साईड इफेक्ट होण्याचा धोका असतो.
 
"स्टिरॉईड हे एक दुधारी शस्त्र आहे. याचा योग्यवेळी आणि प्रमाणात वापर केला पाहिजे," असं इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
'स्टिरॉईड' च्या अनियंत्रित वापराने संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
 
'स्टिरॉईड' मुळे संसर्ग वाढण्याची शक्यता?
मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल म्हणतात, "कोरोनारुग्णांवर उपचार करताना योग्य वेळेआधी 'स्टिरॉईड' दिल्यास, कोरोनारुग्णांचा संसर्ग अधिक बळावण्याची किंवा गंभीर होण्याची शक्यता असते."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनासंसर्गाच्या पहिल्या पाच-सात दिवसातच काही डॉक्टर्स रुग्णांना 'स्टिरॉईड' देत असल्याचं दिसून आलंय.
 
"संसर्गाच्या पहिल्याकाही दिवसात शरीराची रोगप्रतिकारशक्ती व्हायरसविरोधात लढण्याचा प्रयत्न करत असते. याचवेळी 'स्टिरॉईड' दिल्यास व्हायरसचा गुणाकार (viral replication) होण्याचं प्रमाण वाढतं," असं डॉ. सिंघल म्हणतात.
वेळेआधीच 'स्टिरॉईड' दिल्याने काय झालं?
वेळेआधीच स्टिरॉईड दिल्याचा काय परिणाम होतो, याचं डॉ. सिंघल उदाहरण देतात.
 
13 वर्षांची एक मुलगी कोव्हिड पॉझिटिव्ह होती. तिला एक-दोन दिवस ताप होता, मग बरा झाला. फॅमिली डॉक्टरांना सीटीस्कॅन (HRCT) मध्ये सौम्य संसर्ग आढळून आला. कोणतंही लक्षणं नसताना, डॉक्टरांनी स्टिरॉईड सुरू केलं. काही दिवसांनी ताप वाढल्याने तब्येत बिघडली. सीटीस्कॅनमध्ये संसर्ग वाढल्याचं लक्षात आलं. मग, स्टिरॉईड बंद करून इतर औषधांच्या मदतीने उपचार सुरू करण्यात आले.
 
एक 43 वर्षीय रुग्णालाही संसर्गाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टरांनी स्टिरॉईड दिलं. काही दिवस ताप नियंत्रणात राहीला. पण, औषध बंद करताच ताप पुन्हा वाढला. 13-14 दिवस ताप सतत येत असल्यामुळे ही व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली.
 
तज्ज्ञ सांगतात, या दोनच घटना नाहीत. अशा अनेक घटना आहेत. ज्यात रुग्णांना वेळेआधीच स्टिरॉईड दिल्याने त्रास झालाय.
 
"रुग्णांना स्टिरॉईड केव्हा द्यायचे, डोस किती द्यावा हे डॉक्टरांनी लक्षात घेतलं पाहिजे. दिर्घकाळ स्टिरॉईडचा डोस देऊ नये," असं डॉ. तनु सिंघल पुढे म्हणतात.
रुग्णांना स्टिरॉईड केव्हा द्यावं?
महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, "कोव्हिडविरोधात स्टिरॉईड हे सद्य स्थितीत एकच पॉवरफूल औषध आहे. ज्याने जीव वाचतोय."
 
कोव्हिड-19 विरोधातील उपचारात स्टिरॉईडचा वापर केव्हा करावा? यावर ते चार महत्त्वाचे मुद्दे सांगतात.
 
अत्यंत सौम्य संसर्गात स्टिरॉईड वापरू नये.
ऑक्सिजन लेव्हल 93 पेक्षा कमी असेल तर, आणि रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असल्यास स्टिरॉईड द्यावं.
स्टिरॉईडचा योग्य डोस, योग्य कालावधीकरता देण्यात यावा.
40 MG (मिलीग्रॅम) मिथाईल-प्रिन्डीसोलॉन इंजेक्शन दिवसातून दोन किंवा तीन वेळा किंवा 6 MG (मिलीग्रॅम) डेक्सामिथेसॉन 7 ते 10 दिवस द्यावी.
योग्य वेळेआधीच स्टिरॉईडचा वापर टाळा.
कोव्हिड टास्कफोर्सने एप्रिल 2021 मध्ये, डेक्सामिथेसॉन इंजेक्शनचा मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वापर करण्याची सूचना दिली होती.
 
डॉ. जोशी पुढे सांगतात, "रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल आणि रुग्णालयात बेड मिळत नसेल. तर, त्या एक-दोन दिवसात स्टिरॉईड वापरायला हरकत नाही."
तज्ज्ञांचं मत काय?
कोरोना संसर्गाचा एक साईड इफेक्ट म्हणजे फफ्फुसांमध्ये सूज (inflammation) येते. परिणामी उपचार करण्यासाठी डॉक्टर डेक्सामिथेसॉन नावाचं स्टिरॉईड वापरतात.
 
मुंबईच्या नानावटी रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ अब्दुल समद अन्सारी म्हणतात, "कोरोनासंसर्गामुळे सूज आल्यानंतर होणारा संसर्ग कमी करण्यासाठी स्टिरॉईड प्रभावी आहे. पण, याचा वापर जबाबदारीने, योग्यवेळी आणि व्हायरसची वाढ रोखण्यासाठी करण्यात आला पाहिजे."
 
ते पुढे सांगतात, "स्टिरॉईडचा वापर 2 मिलिग्रॅमपेक्षा जास्त असू नये. शक्यतो 1 मिलिग्रॅम ठेवण्यात यावा. उदाहरणार्थ, रुग्णाचं वजन 60 किलो असेल तर डोस 120 मिलिग्रॅमपेक्षा कमी, खरंतर 60 मिलिग्रॅम असावा."
 
तज्ज्ञ सांगतात, कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रंचड वाढलीये. त्यामुळे स्टिरॉईडचा अनियंत्रित वापर पाहायला मिळतोय.
स्टिरॉईड अचानक बंद करू नये
डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्टिरॉईडचा डोस हळूहळू कमी करत न्यावा. अचानक बंद करू नये."
 
तर, "रुग्णाची स्थिती सुधारत नसेल तर, दुसऱ्या उपचारपद्धतीचा वापर करावा," असं डॉ. अन्सारी म्हणतात.
 
मधुमेही रुग्णांवर स्टिरॉईडचे होणारे परिणाम?
स्टिरॉईडच्या अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापरामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांमध्ये काळ्या बुरशीमुळे होणारा 'म्युकरमायकॉसिस' आजार प्रंचड वाढलाय. मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या महानगरात काळ्या बुरशीमुळे नाक आणि डोळ्यांच्या संसर्गाचं प्रमाण प्रचंड वाढलंय.
 
सर जे.जे. समुह रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख सांगतात, "म्युकरमायकॉसिसमुळे रुग्णालयात येणाऱ्यांमध्ये मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे."
 
डॉ. शशांक जोशी पुढे म्हणतात, "स्टिरॉईडमुळे रोगप्रतिकाशक्ती कमी होते आणि शरीरातील साखर वाढते. ज्यांना मधुमेह नसतो त्यांचीसुद्धा साखर वाढते."
 
मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. राहुल बक्षी मधूमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कोव्हिड-19 उपचारात स्टिरॉईड देण्यात आलेले 50 ते 60 रुग्ण ते दररोज तपासत आहेत.
 
ते म्हणतात, "स्टिरॉईडचा शरीरातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम होतो. शरीरातील साखरेचं प्रमाण योग्य नियंत्रणात नसेल, तर, गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते."
 
भारताला जगभरातील मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. देशात 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेही रुग्णांना कोव्हिडमध्ये स्टिरॉईडचा हाय डोस देताना डॉक्टरांनी त्यानंतर होणाऱ्या संसर्गावर लक्ष ठेवलं पाहिजे.
 
डॉ. अन्सारी म्हणतात, स्टिरॉईडच्या अनियंत्रित वापराने ज्यांचा मधुमेह बॉर्डरवर असतो. त्यांच्यात बुरशीमुळे होणारे आजार वाढू शकतात.
स्टिरॉईडच्या वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना
सप्टेंबर 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर आणि अत्यव्यस्थ (क्रिटिकल) कोव्हिड रुग्णांना स्टिरॉईड देण्याची शिफारस केली होती.
 
गंभीर संसर्ग नसलेल्या रुग्णांवर स्टिरॉईड देण्यात येऊ नये.
7 ते 10 दिवस दिवसातून ते एकदाच देण्यात यावं.
स्टिरॉईडमुळे क्रिटिकल असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर 8.7 टक्के कमी झाला, तर इतर रुग्णांचा मृत्यूदर 6.7 टक्क्यांनी कमी झाला आहे.
यूकेच्या रिकव्हरी ट्रायलचे परिणाम काय?
कोरोनारुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी स्टिरॉईड उपयुक्त आहे का नाही. हे शोधण्यासाठी यूकेमध्ये रिकव्हरी ट्रायल करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, डेक्सामिथेसॉनचे मृत्यूदर रोखण्यात प्रभावी परिणाम दिसून आले होते.
 
व्हेन्टिलेटरवर असलेल्या कोरोनारुग्णांचे मृत्यू एक तृतीअंशाने कमी झाले. तर, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर 20 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं.
 
डॉ. तनु सिंघल म्हणतात, "यूकेतील रिकव्हरी ट्रायलमध्ये ऑक्सिजनची गरज नसलेल्या कोरोनारुग्णांना स्टिरॉईड दिल्यानंतर त्यांच्या मृत्यूदर जास्त असल्याचं दिसून आलं होतं."