मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

कोरोना फायटर्स: भविष्याच्या गर्भातून

(भविष्यात आपण कोरोनाच्या संकटातून मुक्त होणार आहोत. म्हणून भविष्याच्या दृष्टिकोनातून केलेले हे आवाहन. जग कोरोनामुक्त झाल्यावर आपण जगाला हे ओरडून सांगायला हवं)

मी आणि तुम्ही आपण सगळेच कोरोना फायटर्स आहोत. आज जगावरचं कोरोनाचं संकट संपुष्टात आलंय. कोरोनाच्या महामारीत आपण आपल्या ओळखीतल्या किंवा अनोळखी व्यक्तींना गमावून बसलोय. महाभारताच युद्ध संपल्यानंतर जे लोक जिवंत राहिले त्यांचं पुढे काय झालं असेल? आपली परिस्थिती कौरव किंवा पांडवांसारखी नाही. चिरंजीव होऊन मरणाची प्रतीक्षा करणाऱ्या अश्वत्थाम्यासारखी तर मुळीच नाही. मुळात आपण जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे गेलो आहोत. माझे मरण पाहिले म्यां डोळा असं म्हणण्याची सिद्धता आपल्यात आलेली आहे.

आपण आता एक नवे मानव आहोत. कदाचित कम्युनिजममध्ये सांगितलेले नवे मानव, कदाचित इस्लामनुसार कोरोना हीच कायमत होती आणि त्यातून बचावलेले नवे मानव, कदाचित दुःखाचा खरा अर्थ कळून आपल्यातल बुद्धतत्व जागृत झालेला नवा मानव, कदाचित हिंदू धर्मानुसार सत्याचा शोध घेणारा नवा मानव... 

होय, हा नवा मानव आहे... भूतकाळाच्या उदरात भयंकर अंधार आहे... आपण मात्र प्रकाशाचे उपासक आहोत. या महामारीमुळे आपले प्रचंड नुकसान झाले असते तरी खपल्या काढून पुन्हा पुनः रडण्यात काय अर्थ आहे? रडायचे तेव्हा रडून झाले आहे... आता या अश्रूंच्या महासागरात आपण आपले दुःख विसर्जित करू आणि भविष्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी वर्तमानाचा रामसेतू उभारू. आपण आपल्या जखमांच्या दगडावर श्रीराम लिहून सेतू उभारणार आहोत... आपण कोरोनारूपी रावणाचा वध केव्हाच केला आहे. आता फक्त आपल्याला आपल्या उत्कर्षाची सीता सुखरूप आणायची आहे...

भगिनी आणि बांधवांनो, निराशा झटकून आपल्याला उमेदीने कामाला लागायचे आहे. जात, पंथ, राज्य, देश या सगळ्या बेड्या मोडून माणूस म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे. परमशक्तिमान भगवंत यांचा वसुदैव कुटुंबकम हा संदेश आपल्याला रुजवायचा आहे. नव्हे नव्हे, एखाद्या प्रेषिताप्रमाणे आपल्याला झपाटून जाऊन काम करायचं आहे. माणसासाठी मानवतेच्या भल्यासाठी... 

आपण आजही या बेड्या मोडू नाही शकलो तर आपण या मृत्यूच्या थैमानातून काहीच शिकलो नाही असा याचा अर्थ होईल. आपण मानवतेपासून कोट्यवधी मैल दूर होत असा याचा अर्थ होईल. हा महारोग माणसाला एकत्र आणण्यासाठी आला होता अस आपण मानुया. वाईटातुन जे जे चांगलं निघेल एवढं आपण पाहूया.

मानवतेच्या भल्यासाठी माऊलींनी कित्येक वर्षांपूर्वी पसायदान मागितले होते. कोरोनाच्या लढ्यात भारताने जगाचे नेतृत्व केल्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. या पसायदानाचे अमृत आता जगाला पाजण्याची वेळ येऊन ठेपली आहे. चला मानवजातीच्या कल्याणासाठी, जगाच्या उत्कर्षासाठी माणूस म्हणून एकत्र येऊया... ज्या ज्या चुका झाल्या त्या सुधारूया आणि उज्वल भविष्याकडे वाटचाल करूया. जग आपल्याकडे आशेने पाहतय. मूर्च्छित पडलेल्या जगाला आपण हनुमंताप्रमाणे संजीवनी दिली आहे. आता जगाला अमृत पाजण्याची गरज आहे... चला तर कोरोना फायटर्स... चला उठा नव्या मानवांनो, जगाला एकसंधतेचे, मानवतेचे, अध्यात्माचे, विकेकाचे, पसायदानाचे अमृत पाजूया... आपण जगुया आणि दुसऱ्यांना जगवूया...

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री