शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

BBC 100 Women 2019: बीबीसीच्या 100 महिलांच्या यादीत यावर्षी 7 भारतीय

2013 पासून BBC 100 Women च्या माध्यमातून जागतिक स्तरावरील महिलांच्या प्रेरणादायी कथा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न बीबीसीकडून केला जातो.
 
गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिलांचा गौरव केला आहे. यामध्ये मेकअप क्षेत्रातील उद्योजक बॉबी ब्राउन, संयुक्त राष्ट्रांच्या उपसचिव अमिना मोहम्मद, सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसूफझाई, अॅथलीट सिमोन बाइल्स, सुपरमॉडेल एलक वेक, संगीतकार अलिसिया कीज आणि ऑलिम्पिक चॅम्पिअन बॉक्सर निकोला अॅडम्स यांचा समावेश आहे.
 
यंदा बीबीसीच्या या पुरस्कार मालिकेचं हे सहावं वर्षं आहे. 'The Female Future' ही 2019 च्या BBC 100 Women ची संकल्पना आहे.
 
जागतिक स्तरावरील 100 महिलांच्या या यादीत 7 भारतीय महिला आहेत.
 
बीबीसीचा कार्यक्रम यावर्षी 22 ऑक्टोबर 2019 रोजी दिल्लीत होणार आहे. यंदा हा कार्यक्रम पहिल्यांदाच भारतात होत आहे.
 
भारतातून पुरस्कार मिळालेल्या महिलांबद्दल सविस्तर जाणून घ्या.
 
1. अरण्या जोहर, कवयित्री
लिंग समानता, मानसिक आरोग्य आणि आपलं शरीर सकारात्मकतेनं स्वीकारणं यासारख्या प्रश्नांवर अरण्या लिहितात.
 
त्यांचा 'अ ब्राउन गर्ल्स गाइट टू ब्युटी' हा यूट्यूबवरचा व्हीडिओ 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. भविष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन :
"महिलांनी जर काम करायला सुरुवात केली तर जागतिक जीडीपीमध्ये 28 ट्रिलियन यूएस डॉलर्सची वाढ होऊ शकते. आपण जगातल्या अर्ध्या लोकांना आणि त्यांच्या क्षमतेला मर्यादा का बरं घालत आहोत? लिंग समानतेवर आधारित जग कसं असेल? आणि आपण या जगापासून किती कोस लांब आहोत?"
 
2. सुष्मिता मोहंती , अंतराळ उद्योजक
अंतराळयान डिझाईन करणाऱ्या सुष्मिता यांनी भारतातलं पहिलं अंतराळ स्टार्ट अप सुरू केलंय. त्या भारताच्या 'अंतराळ महिला' म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
हवामान बदलासंदर्भातील घडामोडींचा अभ्यास आणि निरीक्षण अंतराळातून करण्यासाठी त्या आपल्या व्यवसायाचा वापर करतात. त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन:
"पुढील तीन ते चार पिढ्यांनंतर आपली पृथ्वी राहण्यायोग्य नसेल, अशी भीती मला वाटते. हवामान बदलावर तातडीनं पावलं उचलण्याची जी गरज ग्रेटानं व्यक्त केली आहे, त्याचा आपण गांभीर्यानं विचार करू अशी मला आशा वाटते.''
 
3. वंदना शिवा पर्यावरणवादी कार्यकर्त्या
1970 मध्ये झाडांना मिठ्या मारून झाडे वाचवा सांगणाऱ्या `चिपको' आंदोलनाचा वंदना एक भाग होत्या.
 
आता त्या जागतिक पातळीवरील पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. वंदना शिवा यांना पर्यायी नोबेल शांतता पुरस्कारही मिळाला आहे. त्या महिलांकडे निसर्गाच्या रक्षणकर्त्या म्हणून पाहतात. त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन :
    
"मला आशा आहे, की महिला या जगाचा विनाश थांबवू शकतात. तसंच त्या एक सर्वसामान्य भविष्य तयार करतील."
 
4. नताशा नोएल, योग तज्ज्ञ
नताशा योगिनी आहेत. त्या योग आणि स्वास्थ प्रशिक्षक आहेत.
 
वयाच्या तिसऱ्या वर्षी आईला गमावणाऱ्या आणि बालपणात लैंगिक शोषणाची बळी ठरलेल्या नताशाचं बालपण अतिशय क्लेशकारक होतं. त्याबद्दल त्यांनी सामाजिक माध्यमांवर चर्चाही केली आहे. त्या स्वतः आपल्या शरीराला सकारात्मकतेने कसं स्वीकारायचं याबद्दल प्रशिक्षण देतात.
 
त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन:
   
"प्रत्येक माणसासाठी सशक्त असलेल्या जगात आपण राहू, अशी आशा मला वाटते. प्रत्येकाला समान संधी आणि समान मूलभूत स्वातंत्र्य असेल. प्रत्येकजण आपला भावनांक (EQ) आणि बुद्ध्यांक (IQ) वाढण्यासाठी प्रयत्न करेल. यामुळं सशक्त आणि विवेकबुद्धी जागृत असलेली माणसं तयार होतील."
 
5. प्रगती सिंग, डॉक्टर
डॉक्टर झालेल्या प्रगती सिंग यांनी अलैंगिकतेविषयी संशोधन करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक महिलांनी त्यांना आपल्याला शारीरिक संबंधात रस नसल्याचं आणि तरीही लग्नाला लग्नाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं.
 
यानंतर त्यांनी अलैंगिक नातेसंबंधांची इच्छा असणाऱ्या लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. प्रगती सध्या Indian Aces ही अलैंगिक लोकांसाठीची ऑनलाइन कम्युनिटी संस्था चालवतात.
 
त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन :
   
"स्त्रीत्वाची वैशिष्ट्यं न लादता आता स्त्रीवाद अधिक मजबूत आणि सहानुभूतीशील करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे आहेत."
 
6. सुभलक्ष्मी नंदी, लिंग समानता तज्ज्ञ
International Centre for Research on Women या संस्थेच्या माध्यमातून त्या आशियामध्ये लिंग समानता वाढवण्यासाठी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयत्न केला आहे.
 
महिला शेतकऱ्यांचे हक्क, महिलांविरोधातली हिंसा आणि महिला शिक्षणाला चालना यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी प्रामुख्यानं काम केलं आहे.
 
त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन:
   
"भविष्यात महिला नक्कीच दुय्यम राहणार नाहीत. महिला शेतात, जंगलात, कारखान्यात, रस्त्यांवर किंवा घरात जे काम करतात - त्या सगळ्या कामाला मान्यता मिळालेली असेल आणि त्या सक्षम असतील. महिला स्वतः संघटित असतील आणि आपलं काम अधिक चोख करू शकतील. संपूर्ण अर्थव्य़वस्था आणि समाजावर त्यांचं वर्चस्व असेल."
 
7. प्रविणा अहंजर, मानवाधिकार कार्यकर्त्या
प्रविणा काश्मीरच्या 'आयर्न लेडी' म्हणून प्रसिद्ध आहेत. 1990 साली त्यांचा पौगंडावस्थेतील मुलगा नाहीसा झाला. हा तोच काळ होता ज्यावेळी काश्मीरमध्ये भारत सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता.
 
या काळात अशी हजारो मुलं नाहीशी झाली होती. त्या सर्व पालकांना एकत्रित करून प्रविणा यांनी Association of Parents of Disappeared Persons (APDP) स्थापना केली. आपला मुलगा पुन्हा आपल्याला भेटेल अशी आशा त्या अजून बाळगून आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या मुलाला जाऊन 30 वर्षं पूर्ण झाली.
 
त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन:
     
``माझ्या मुलाच्या नाहीसं होण्याच्या दुःखानं मला न्यायासाठी संघर्ष करायला प्रवृत्त केलं. जग सुंदर असावं, खास करून महिलांसाठी ते उत्तम असावं. ते तसं करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. आजच्या जगात महिलांच्या प्रश्नाला विशेषतः कठीण आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना महत्त्व दिलं जातंय.''