मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (21:03 IST)

कोरोना लॉकडाऊनः 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?

राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. राज्यात लॉकडाऊन घोषित केल्यानेच या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची राज्य सरकारची भूमिका आहे.
 
दरम्यान, मे महिन्यातील 21 दिवस लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पुन्हा लॉकडाऊनबाबत चर्चा होऊ लागली आहे.
 
सध्या राज्यात 16 मे ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की संपणार हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.
 
रुग्णसंख्येत घट
गुरुवारी (20 मे) राज्यात 29 हजार 911 रुग्ण आढळून आले. गेल्या महिन्यात 60-65 हजारांच्या आसपास पोहोचलेली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने खाली येत आता 30 हजारांपेक्षाही खाली आली.
सध्या सुरू असलेलं लॉकडाऊन आणखी 9 दिवस लागू असेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
 
मात्र, तरीही राज्य सरकारने याबाबत अत्यंत सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतं. पुढील दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर मिळवलेलं नियंत्रण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुटू न देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यात ही चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील इतर मंत्र्यांकडून सावध प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून येतं.
 
शुक्रवारी सकाळी तौक्ते पाहणी दौऱ्यानिमित्त रायगडमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
 
या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
"कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे, हे नक्कीच. पण त्यासंदर्भात आताच काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण याचा अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोव्हिड चौपटीने वाढला," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
 
"कोरोना व्हायरस घातक असून आपण निर्बंध शिथील करताना अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र सर्व बाबींचा विचार करूनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल," असंही ठाकरे यांनी म्हटलं.
 
तज्त्रांच्या मते, उद्धव ठाकरे यांची वरील प्रतिक्रिया म्हणजे लॉकडाऊन वाढवला जाण्याचे संकेत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारीही घेतली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन संदर्भात आज प्रतिक्रिया दिली.
 
सध्याचं लॉकडाऊन संपायला अजून 10 दिवस अवकाश आहे. या 10 दिवसांत काय घडतं ते आधी बघू, त्यानंतरच लॉकडाऊन वाढवायचं की उठवायचं याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट मत पवार यांनी नोंदवलं.
 
ही बातमी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.
 
10 दिवसांत काय होतं ते पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ - अजित पवार
 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही CNBC टीव्हीला एक मुलाखत दिली होती.
 
आदित्य ठाकरे यांच्या मते, लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील करोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल.
 
सध्या नागरिकांच्या आरोग्यालाच पहिलं प्राधान्य असेल व त्यानुसारच पुढचा निर्णय होईल, राज्यात सध्या लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र मात्र सुरू आहे. प्रमुख कार्यालये, उद्योगधंदे, आयात-निर्यात यावर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत.
 
केवळ अनावश्यक गोष्टींसाठी जे घराबाहेर पडतात त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी घराबाहेर कधी जाता येणार, असा तुमचा प्रश्न असेल तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतरच, हे त्यावर उत्तर असल्याचे आदित्य म्हणाले आहेत.