शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (22:49 IST)

कोरोना नवे निर्बंध: आता पूर्ण महाराष्ट्रात कठोर नियम, डेल्टा प्लसमुळे केले बदल

राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णांमध्ये 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियमावलीमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत.
 
आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वर ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
 
याआधी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार 5 गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती.
 
कोरोनाचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट काळजीचं कारण असल्याचं सरकारनं या नव्या आदेशात नमूद केलंय.
 
सरकारनं म्हटलंय,
 
या नव्या व्हेरियंटची प्रसार करण्याची क्षमता अधिक आहे.
त्यांचा फुप्फुसावर अधिक परिणाम होतोय.
या व्हायरसमुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात घट होतेय.
नवीन आदेशानुसार, आर-टीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून मिळालेल्या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर पाहून निर्बंध किती वाढवायचे याचा विचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
 
तसंच, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली असले तिथे थेट निर्बंध वाढवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावेत यासाठी त्यांनी राज्य प्रशासनाच्या आदेशांची वाट पाहू नये, असंही म्हटलं आहे.
 
जिल्हा स्तरावर सूचना
आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावी, यासाठी जनजागृती करावी.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
 
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवावं.
 
मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या RT-PCR चाचण्या करणे.
 
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणे.
 
गर्दी होईल असे कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
 
कंटेनमेंट झोन तयार करताना ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याच ठिकाणी निर्बंध लावता येतील, याचा विचार करावा.
 
'डेल्टा प्लस'मुळे निर्बंध लागणार नाहीत - राजेश टोपे
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध लागणार नाहीत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे आजपर्यंत 21 रुग्ण आढळले आहेत. याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले नाहीत. रुग्णांचा शोध मात्र प्रशासन घेत आहे. संपूर्ण 36 जिल्ह्यात महिन्याला 100 सॅम्पल घेत आहोत, त्याचा बारकाईनं अभ्यास करत आहोत. या 21 रुग्णांपैकी 80 वर्षांचा एक रुग्ण ज्याला सहव्याधी होत्या, त्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे. बाकीचे पेशंट स्थिर आहेत, बरेचसे पेशंट बरे होऊन घरीसुद्धा गेलेत.
 
"त्यामुळे घाबरण्यासारखा विषय अजिबात नाहीये. कोणतेही निर्बंध लावण्याचं सध्या काही कारण नाही. सध्या कोव्हिडच्या अनुषांगिक वर्तणूक आपण पाळली, तर अडचणीचा कुठलाही विषय राहणार नाही."
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंट' धोक्याचा आहे?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'डेल्टा प्लस' व्हेरियंट' चिंतेचा मानला जातोय. हा व्हायरस रोगप्रतिकार शक्तीला चकवणारा असू शकतो.
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटला केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' घोषित केलंय. त्यामुळे, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने 'डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या तपासणीसाठी गोळा करण्याचा निर्णय घेतलाय.
 
महाराष्ट्रात 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 पर्यंत पोहोचली आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.